यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २२-४

समघात, संयमी आणि समृद्ध मन असलेल्या यशवंतरावांना साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या जन्मशताब्दीला अध्यक्ष म्हणून पुणे येथे पाचारण करण्यात आले आणि ते त्यांनी कर्तव्यभावनेनं स्वीकारलेही !  यशवंतरावांचं साहित्यिक कर्तृत्व त्या अध्यक्षपदाला पुरेसं नाही, असंही त्या वेळी काही तथाकथित साहित्यिक मंडळींना वाटत होतं.  परंतु त्यांना बोलावण्याचा निर्धार पक्का झाला होता.  श्री. मनोहर महादेव केळकरांनी त्यांना समग्र केळकर वाङ्‌मयाचे ग्रंथ पूर्वीच भेट म्हणून दिले होते.  ते त्यांनी चांगलेच अभ्यासले होते हे आम्ही मंडळी जाणून होतो.

केळकर जन्मशताब्दीचा समारंभ पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात होता.  यशवंतरावांना घेऊन येण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा ते म्हणाले, ''मी कधी व्याख्यानाची टिपणं काढत नाही.  पण आज काढलेली आहेत.  कारण फार मोठ्या साहित्यकारावर आज बोलायचं आहे, तेही पुण्यात आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत.  जवळ टिपणं असलेली बरी !''

प्रत्यक्षात मात्र त्या दिवशी ती टिपणं समोर न ठेवताच त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणातील प्रत्येक शब्दाशब्दातून केळकरांचे साहित्यिक रूप दिसत होतं.  ज्या तथाकथित साहित्यिकांना यशवंतरावांची साहित्यिक उंची पुरेशी वाटली नव्हती त्यांनाही ती त्यांची उंची प्रतीत झाली.  त्यांनी प्रांजळपणानं तशी नंतर कबुलीही दिली.    

केळकर जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्या दिवशी दहाबारा वुद्ध साहित्यिकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  काही साहित्यिकांना आपल्या जागेवरून धड उठताही येत नव्हतं.  यशवंतराव स्वतः त्या वृक्ष साहित्यिकांजवळ गेले आणि त्यांना शाल-श्रीफल देऊन त्यांचा जागीच सत्कार केला.  स्वतःच्या ठायी साहित्याविषयी आणि साहित्यिकांविषयी अपार आस्था असल्याशिवाय असं कधी घडणार नाही.  

त्याच दिवशी त्यांनी आणखी एक साहित्यिक सत्कृत्य केलं.  प्रा. दे. द. वाडेकर यांचा मराठी तत्त्वज्ञान कोश द्रव्याभावी खुंटून पडला होता.  वाडेकरांची आणि यशवंतरावांची या समारंभानंतर भेट घडवून आणण्यात आली.  प्रा. वाडेकरांनी तत्त्वज्ञान कोशाच्या कार्याची माहिती त्यांना सांगितली आणि द्रव्याभावी हे एक मोठं कार्य खोळंबून राहिलं असल्यानं या संबंधात आर्थिक साहाय्य कसं उपलब्ध होऊ शकेल हे पाहावं अशी विनंती केली.  तुमच्यावर आमची सारी मदार आहे असंही सांगितलं.  यशवंतरावजींनी हे सारं ऐकलं आणि ''पाहूया काय करता येतं ते'' असं मोघम आश्वासन दिलं.  आणि आश्चर्य असं की पुढं थोड्याच दिवसांत तत्त्वज्ञान कोशासाठी पंचाऐशी हजार रुपये उपलब्ध झाले.  हे कसं घडलं ते फक्त यशवंतराव जाणोत !  आम्हा मध्यस्थांना वाडेकरांनी त्याबद्दल धन्यवाद दिले.  पण हे सारं कर्तुक साहित्यप्रेमी साहित्यिक यशवंतरावजींचं होतं.

'समग्र टिळक साहित्या'चा प्रकाशन समारंभ १९७६ साली टिळक स्मारक मंदिरात झाला.  इंदिराजींबरोबर यशवंतरावजी त्या समारंभाला उपस्थित होते.  त्या दिवशी यशवंतरावजींनी केलेलं भाषण आठवणीत राहल असंच होतं.  अंगात साहित्यिक गुण पुरते भिनल्याशिवाय थोर साहित्याची अशा तर्‍हेची साक्षेपी समालोचना सुतराम साधणार नाही.  

या माणसानं साहित्यावर आणि तदनुषंगानं साहित्यिकावर पराकाष्ठेचं प्रेम केलं.  चीनच्या आक्रमणाच्या वेळी लडाखचा भाग फार गाजला होता.  साहित्यिकांनी तो भाग बघून यावा, असं या संरक्षणमंत्र्यानं ठरवलं.  लगेच पु.ल.देशपांडे, पु. भा. भावे. ग. दि.माडगूळकर आणि वसंत सबनीस या महाराष्ट्रातील साहित्यकारांना लडाखला खास विमानाने पाठविण्याची व्यवस्था केली.  राष्ट्राच्या राजकारणाशी साहित्यिकांचा घनिष्ठ संबंध असतो, हीच गोष्ट त्या वेळी यशवंतरावजींनी दर्शवून दिली.  ग.दि.माडगूळकरांना विधान परिषदेत सामावून घेण्याचा हेतूही तोच !  राजकारण आणि साहित्य यांच्या पाट्या वेगळ्या असूच शकणार नाहीत, अशी त्यांची नेहमी सांगी असे.

कोणतीही साहित्यिक कृती निर्माण करताना लेखकानं त्या त्या परिस्थितीचं, त्या त्या ठिकाणांचं जवळून निरीक्षण केले पाहिजे, असं ते नेहमी कटाक्षानं सांगत.  शास्त्रीजींवर कादंबरी लिहिण्याचा संकल्प प्रस्तुत लेखकानं सोडला, त्यावेळी यशवंतरावजींनी लेखकाची रशियात ताश्कंदला जाण्यासाठी आवश्यक ती सोय केली.  त्यानंतर 'हिरोशिमा'वर कादंबरी लिहिण्याचा संकल्प प्रस्तुत लेखकानं केला.  लेखकाला जपानचं निमंत्रण मिळवून देण्यात यशवंतरावजींनी तत्परतेनं पुढाकार घेतला.  अशा गोष्टी पार पाडण्यात त्यांचं साहित्यिकांवर प्रेम असेलही !  परंतु खरंखुरं प्रेम साहित्यावर असे.  मराठी साहित्य मोठं झालं पाहिजे. ते साहित्य निर्माण करणार्‍या साहित्यकारांना आपल्या साहित्याच्या कक्षा विशाल करण्यासाठी हरएक प्रकारची संधी प्राप्‍त झाली पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोण असे.  साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती याच सदहेतूनं त्यांनी केली.  त्या मंडळाच्या प्रपंचाकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिलं.  मंडळाच्या अडीअडचणी निवारण केल्या.  अर्थात अशा प्रसंगी माणसं उभी करावी लागतात ती विश्वासातली, अनुभवातली.  तेही त्यांनी केलं.  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर त्यांनी जो विश्वास टाकला तो सर्वार्थानं सार्थ ठरला.  विश्वकोशाचं अवाढव्य कार्य बघून यशवंतरावजींना खरोखरच समाधान वाटत असे, ते तसं बोलूनही दाखवीत असत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org