यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २२-१

महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि नंतरच्या पंधरा-वीस वर्षांत त्यांनी संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी सन्मानाची सत्तेची पदे भूषविली, परंतु या सर्व काळात त्यांना अधिकाराचा, सत्तेचा गर्व झालेला मी कधी पाहिला नाही.  गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी नेहमीच देशभर भ्रमंती सुरू राहिली.  केंद्रीय जबाबदार मंत्री म्हणून कामाच्या निमित्तानं आणि समारंभाच्या निमित्तानं यशवंतरावांचीही भारतभर भ्रमंती सुरू असे.  अशा दौर्‍यात माझ्या-त्यांच्या भेटीचं हमखास ठिकाण म्हणजे विमानतळ !  आम्हा दोघांपैकी कोणीतरी येण्याच्या किंवा जाण्याच्या तयारीत असावयाचे.  पण भेट व्हायचीच.  बोलणंही व्हायचं.  त्यांच्याभोवती अधिकार्‍यांचा, संरक्षकांचा, स्थानिक पुढार्‍यांचा गोतावळा असला तरी त्यांची नजर फिरती असावयाची.  हव्या असलेल्या माणसाला शोधून काढण्यात ते तरबेज होते.

कलकत्ता विमानतळावर एकदा असेच घडले.  यशवंतराव त्या वेळी संरक्षणमंत्री होते.  आसामला जाण्यासाठी ते कलकत्ता विमानतळावर आले होते.  सकाळी १० ची वेळ असावी.  कलकत्त्यातील गाणे संपवून मी परतीच्या मार्गावर विमानतळावर आलो होतो.  विमानतळावर संरक्षणमंत्री उपस्थित असल्यानं बंदोबस्त कडक होता.  मंत्र्यांच्या विमानाचं उड्डाण होईपर्यंत इतरेजनांनी कंपाउंडच्या बाहेर थांबले पाहिजे अशी सक्ती होती.  संरक्षणमंत्री मला ओळखतात, मला आत जाऊ द्या असे सुरक्षा अधिकार्‍याला मी सांगितले.  परंतु तो हुकुमाचा ताबेदार.  त्याने मला बाहेरच रोखून ठेवले.  इतर प्रवासी उभे होते त्यातच कंपाऊंडला खेटून मी उभा राहिलो.  कसे काय कोणास ठाऊक; परंतु यशवंतरावांनी दुरून मला पाहिले आणि आश्चर्य असे की ते स्वतःच कंपाऊंडपर्यंत, मी उभा होतो तेथपर्यंत, चालत आले.  लष्करी व अन्य अधिकार्‍यांची तारांबळ उडाली.  साहेबांच्या बरोबर मी अलगद विमानतळावर गेलो.  त्यांनी सर्वांची ओळख करून दिली.  माझी आस्थेनं चौकशी केली.  संरक्षणमंत्री स्वतः एवढ्या सलगीनं आणि आपुलकीनं बोलत आहेत असं पाहून सर्वजण चपापले.  पण तेव्हापासून पुढे केव्हाही, कलकत्ता विमानतळावर मला कोणी कसलाही प्रतिबंध केला नाही.  सन्मानानेच वागविले.

माझ्या सार्वजनिक किंवा खाजगी गाण्याच्या बैठकींना यशवंतरावांची आणि त्यांच्या पत्‍नी सौ. वेणूताई यांची अनेकदा उपस्थिती असायची.  मुंबईत किंवा दिल्लीत 'संतवाणी' चा कार्यक्रम असेल आणि यशवंतराव कुठे अन्यत्र दौर्‍यावर असले, कामात व्यग्र असले तरी सौ. वेणूताईंची उपस्थिती निश्चित असावयाची.  स्वतः यशवंतराव येणार असले आणि अन्य काही कामामुळे त्यांना वेळेवर पोहोचणे शक्य होणार नसले तर संयोजकांकडे निरोप यायचा की भीमसेनचं गाणं मी पोहोचल्याशिवाय सुरू करू नका.  अशा वेळी अन्य गायकांचं गायन संयोजक अगोदर सुरू करीत असत.

यशवंतराव उपस्थित असलेल्या कितीतरी मैफिलींची याद माझ्या मनात ताजी आहे.  त्यात नागपूरचा किस्सा नमूद करण्यासारखा आहे.  महाराष्ट्र असेंब्ली अधिवेशनला जोडूनच नागपूर येथे महाराष्ट्र राज्यानं सुरू केलेला संगीत महोत्सव आयोजित केला होता.  सूरश्री केसरबाई यांना आणि मला त्यासाठी बोलाविले होते.  केसरबाईंना कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला वेळ लागायचा.  मी वेळेवर पोहोचलो.  परंतु असेंब्लीच्या कामाच्या गडबडीत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून-यशवंतरावांकडून निरोप आला की, मी येईपर्यंत कार्यक्रम सुरू करू नका.  त्यांना फार तर अर्धा तास उशीर झाला असेल.  ते पोहोचताच मी कार्यक्रम सुरू केला.  त्या संगीत महोत्सवाच्या ठिकाणी मला एक गोष्ट खटकली ती अशी की, पुढच्या बाजूला बसलेले काही श्रोते वगळता मागच्या बाजूला जे श्रोते होते ते कोणी कोंडाळं करून बसले होते, कोणी आडवे पसरले होते, कोणी एका अंगावर कलले होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, धाडस करून मी ध्वनिक्षेपकावरून माझी व्यथा सांगितली.  मी सांगितलं की, संगीत ही कला आहे, शास्त्र आहे.  या कलेचा आस्वा कसा घ्यावा याची आपल काही संस्कृती आहे.  गायन ऐकण्यासाठी कसे बसायचे याच्या काही पद्धती आहेत.  त्याचे या ठिकाणी पालन झालेले बरे.  माझं हे बोलणं ऐकताच यशवंतराव ताडकन उठले आणि त्यांनी श्रोत्यांना खडसावलं, ''मैफलीची म्हणून काही एक शिस्त असते.  ती पाळता येत नसेल तर घरी जा आणि झोपा.  आडवं पसरण्याची जागा घर आहे, मैफिलीचं पटांगण नव्हे.''  त्यांनी स्वतःच असे खडसावल्यामुळे सारेजण सावरून बसले.  माझं गाणं संपत आलं तेव्हा यशवंतरावांनी एक भजन म्हणण्याची फर्माइश केली.  ते हिंदी भजन त्यांच्या अतिशय आवडीचं होतं.  भैरवी रागातलं ते भजन मी गायलो.  परंतु त्यामुळे केसरबाईंना घुस्सा आला.  बैठक संपवून मी बाहेर येताच केसरबाई रागानं म्हणाल्या, ''भैरवीशिवाय दुसर्‍या रागात तुला भजन येत नाही का ?''  मला एकच राग आणि एकच भजन येतं असं सांगून मी दूर झालो.  यशवंतरावांना हेच हिंदी भजन आवडतं हे त्यांना सांगण्यात काही अर्थ नव्हता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org