यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २२

२२. संगीताचा रसिक श्रोता ! (पं. भीमसेन जोशी)

यशवंतराव चव्हाण - मोठा रसिक, उमदा माणूस.  राजकारणाच्या क्षेत्रातले मोठे कमालीचे मुत्सद्दी.  त्यांच्या मनाचे व्यवहार, त्यांच्या मनासाठी घटना घडल्यानंतरच कळायचे.  स्वतः अभ्यासू, विचारवंत असल्यानं मनाशी योजलेले आडाखे बरोबर जुळायचे.

त्यांचा माझा निकटचा परिचय झाला तो, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा.  संगीताच्या क्षेत्रातील माझं नाव ते ऐकून होते.  त्यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी माझं गाणं ऐकलं होते.  परंतु प्रत्यक्ष परिचय झालेला नव्हता.  यशवंतराव हे कराडचे.  त्यांचे शिक्षण कराडला झालं.  राजकीय कार्यकर्ते म्हणून प्रारंभी कराड, सातारा भागातच त्यांनी काम केले. १९४२ च्या भारत छोडो चळवळीत, भूमिगत अवस्थेत राहून सातारा जिल्ह्यात त्यांनी केलेल्या क्रांतिकार्याच्या कथा, कार्यकर्ता म्हणून काम करण्याची, लोकसंग्रह करण्याची शैली मी ऐकून होतो.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतूहल मनात साठत राहिलं होतं.

ओगलेवाडीचे श्री. व्यंकटराव ओगले यांची माझी मैत्री होती.  कराड येथील लक्ष्मी प्रिंटिंग प्रेसचे श्री. तमण्णा विंगकर हेही माझे मित्र.  ओगलेवाडीच्या ग्लास फॅक्टरीत व्यंकटरावांच्या पुढाकाराने माझे गाण्याचे कार्यक्रम होत असत.  कधी गणेशात्सवाच्या निमित्ताने तर कधी केवळ गाणं ऐकायचंय म्हणून कार्यक्रम व्हायचे.  स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतरचा तो काळ होता.  कार्यकर्ता म्हणून त्या भागात स्थिरावलेले यशवंतराव चव्हाण मुंबईपर्यंत, आमदार बनून पोहोचले होते.  परंतु त्यांचे बहुतेक कुटुंबीय कराडात होते.  त्यांच्या पत्‍नी सौ. वेणूताई चव्हाण यांची प्रकृती ठीक नसायची.  म्हणून त्यांचाही मुक्काम कराडलाच अधिक काळ असायचा.  व्यंकटराव ओगले, तमण्णा यांच्याबरोबरच्या गप्पांतून मला हे कळायचे.  त्या काळात यशवंतरावांचीही कराडला सारखी ये-जा सुरू असायची.  ते कराडात असले आणि त्याच वेळी व्यंकटराव ओगले यांनी गाण्याची बैठक जमविली असली तर कराडकर रसिकजण, ओगलेवाडीला येत असत.  त्या रसिकांमध्ये यशवंतराव असायचेच.  परंतु हे आम्हाला नंतर माहिती व्हावयाचे.  यशवंतराव कराडला आले की, त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा, माणसांचा घोळका जमायचा.  त्यातून वाट काढून त्यांना यावे लागे.  गाण्याचे ते षोकी होते परंतु आपल्याबरोबर कार्यकर्त्यांचा थवा घेऊन एखाद्या बैठकीला जाऊन बसावे हे त्यांच्या मनाला रुचत नसावे.  त्यामुळे गायन ऐकता येईल एवढ्या अंतरावर थांबूनच ते गाण्याचा आस्वाद घेत असत.  व्यंकटरावांना हे नंतर समजावयाचे आणि त्यांच्या संबंधात मग गप्पा सुरू व्हायच्या.  

मुख्यमंत्री बनून ते मुंबईत खर्‍या अर्थाने सत्ताधारी बनल्यानंतर त्यांचा माझा परिचय झाला तो त्यांनीच आयोजित केलेल्या एका मैफलीमुळे होय.  संगीतात रस घेणारे असल्याने मुंबईत सूरसिंगार या संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता.  मला वाटते १९६१ साल असावे.  खॉ. बडे गुलामअली खाँसाहेब ट्यूमरने आजारी होते.  त्यांच्यावर उपचार करावे लागणार असल्याने त्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली.  यशवंतराव कलेचे आणि कलावंतांचे चहाते.  त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि खाँ. बडेगुलामअलींच्या मदतीसाठी म्हणून संगीताच्या मैफलीचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले.  या कार्यक्रमासाठी त्यांनी तीन कलाकारांची निवड केली.  ए. पं. निखिल बॅनर्जी यांचे सतारवादन, दुसरे सितारादेवी यांचं कथ्थक नृत्य आणि तिसरे पं. भीमसेन जोशी यांचे गायन.  मुंबईत रंगभवनामध्ये हा कार्यक्रम झाला आणि त्याच्या उत्पन्नातून चाळीस हजारांवर रुपयांची रक्कम खाँ. बडेगुलामअली यांना वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध करून दिली.  याच कार्यक्रमाच्या वेळी यशवंतरावांनी मला एक तंबोर्‍याची प्रतिमा भेट म्हणून दिली.  ती आठवण आजअखेर मी जपून ठेवली आहे.  कलावंतांना यशवंतरावांचं असं सहकार्य असायचं पण त्याचा त्यांनी कधी बभ्रा केला नाही.  बभ्रा होऊ दिला नाही !  

महाराष्ट्र, कलेनं आणि कलाकारांनी समृद्ध बनावा यासाठी विविधांगी प्रयत्‍न करणारांमध्ये यशवंतरावांचं नाव अग्रक्रमानं नोंदवावं लागेल.  कलेच्या आणि कलावंतांच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले.  उपक्रमांना गती दिली.  सुविधा निर्माण करून दिल्या, कायद्याचे अडसर दूर केले.  कलाकारांना सन्मानाची वागणूक दिली.  कधी स्वतः कलावंतांपर्यंत पोहोचले तर कधी कलावंतांना सन्मानाने आमंत्रित करून जवळीक साधली.  कलावंतांच्या कलाकाराच्या बाबतीत त्यांच्या मनात प्रांतभेद, जातिभेद नसायचा.  माझे संगीतातले गुरू सवाई गंधर्व, त्याशिवाय मल्लिकार्जुन मन्सूर, गंगुबाई हनगळ, कुमार गंधर्व आदी आम्ही मंडळी मूळची कर्नाटकातली.  जोत्स्ना भोळे या कर्नाटकाला लागूनच असलेल्या गोवा प्रांताच्या.  धारवाड, गदग, हुबळी, गोवा, अशा या शंभर मैलांच्या परिसराबद्दल यशवंतरावांना भारी कुतूहल होतं.  अव्वल दर्जाच्या कलावंतांना जन्म देणारी ही सुपीक भूमी परमेश्वराने खास निर्माण केली असली पाहिजे असं कधी कधी गप्पांच्या ओघात म्हणावयाचे.  या भूमीनं अनेक कलाकार आणि कर्तृत्ववान माणसं देशाला पुरविली असंही सांगायचे.  पुढे ते संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत पोहोचल्यावर मोठ्या हुद्दयापर्यंत पोहोचलेल्या कर्नाटकातल्या अधिकार्‍यांशी त्यांच्या भेटी-गाठी होऊ लागल्या.  त्याचाही उल्लेख ते माझ्याशी बोलताना करावयाचे.  पुढं अशीही पुस्ती जोडलेली असायची की, कर्तृत्ववान माणूस, मग तो कुठल्याही प्रांतीचा असो, त्याला मी देशाचं भूषण मानतो. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org