यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २०-१

पुढच्या काळात या ना त्या कारणाने मला दिल्लीला जावे लागले, सरकार दरबारची कामे पुढे सरकायची असतील तर दिल्लीकरांना सलाम करावाच लागतो.  अशा वेळी यशवंतराव हेच हक्काचे ठिकाण होते.

श्री. मोहन रानडे आणि डॉ. मस्करेहन्स या स्वातंत्र्य वीरांची पोर्तुगालमधील तुरुंगातून मुक्तता करवून घेण्यासाठी मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चळवळ सुरू केली होती.  त्या वेळी मला त्यासाठी अनेक वेळा दिल्लीला जावे लागत होते.  परराष्ट्र संबंध कार्यालय, अनेक मंत्री, प्रधानमंत्री इंदिरा गांधी, राष्ट्राध्यक्ष राधाकृष्णन् आणि झाकीर हुसेन इतर पक्षांचे विविध नेते याबरोबरच त्या वेळी गृहमंत्री असलेल्या यशवंतरावांचीही भेट मला दोन-तीन वेळा घ्यावी लागली.  त्यांपैकी एका भेटीच्या वेळी त्यांनी मुंबईचे कार्डिनल ग्रेशस यांना पोपला या संबंधात पोर्तुगालबरोबर मध्यस्थी करायची विनंती करावी असं सुचवलं.  त्यांनी मान्य केलं.  माझं काम झालं.  मी जायला उठलो तेव्हा यशवंतरावांनी मला थांबवलं आणि म्हणाले, ''आपल्याला अनेक दिवसांत गप्पा मारायला मिळाल्या नाहीत.  बाहेर अनेक लोक थांबले आहेत हे मला माहीत आहे पण हे रोजचंच आहे.''  त्यांनी श्री. डोंगर्‍यांना बोलावून सांगितलं की अर्धा तास कुणाला आत पाठवू नका.  आमच्या मोकळेपणानं गप्पा झाल्या.  त्यात ते म्हणाले, ''सुशीर, तुमच्या पुष्कळ रेकॉर्डस माझ्याकडे आहेत, मी अनेक वेळा त्या ऐकतो.  पण ज्या वेळी अतिशय गंभीर किंवा चिंतेत असतो त्या वेळी तुम्ही गायलेलं 'डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे' ही रेकॉर्ड लावतो आणि ते ऐकून मला विरंगुळा मिळतो.''  मी चटकन म्हटलं, ''यशवंतराव, तुम्हाला हे गाणं वारंवार ऐकावं लागत असेल.'' यशवंतराव दिलखुलास हसले.

पाकिस्तानचा आपण पराभव केल्यानंतर विजयी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव प्रथम मुंबईत आले त्या वेळी त्यांचं शिवाजी उद्यानावर दैवदुर्लभ असं स्वागत झालं.  सगळी मुंबई त्यांच्या दर्शनासाठी लोटली होती.  त्या सभेच्या सूत्रधारामध्ये प्रामुख्यानं पद्मश्री पु.ल.देशपांडे होते.  यशवंतराव येण्यापूर्वी मी एक पद्य म्हटले होते.  सभेला सुरुवात झाली.  मी स्टेज पुढंच खाली बसलो होतो.  सुरुवातीला काही वक्तयांची भाषणं चालू होती त्या वेळी मी एका कागदावर काही मजकूर लिहिला आणि पु.लं. ना तो कागद यशवंतरावांच्या हातात द्यायला सांगितलं.  मी लिहिलं होतं की ''लहानापासून थोरापर्यंत सर्व नेते बोलताना हिंदू शीख असा उल्लेख करतात, त्यामुळे मुसलमान, ख्रिश्चनांप्रमाणे शीख हे हिंदूंपेक्षा वेगळे आहेत असं लोकांच्या मनावर निष्कारण बिंबतं.  विश्वहिंदू परिषदेच्या स्थापनेसाठी स्वामी चिन्मयानंदांच्या पवई आश्रमात जी पहिली बैठक झाली त्याला मी उपस्थित होतो.  सुरुवातीचं संस्कृत पद्यं मीच गायलो होतो.  त्या वेळी त्या संस्थेचं नाव काय असावं अशी चर्चा चालू असता शिखांचे त्या वेळचे श्रेष्ठ नेते मास्टर तारासिंग स्पष्टपणे म्हणाले की, 'विश्वहिंदू परिषद' हेच नाव योग्य आहे कारण बौद्ध, जैन, शीख हे सारे हिंदूच आहेत, त्यामुळे आपण या वेळी आपल्या भाषणात हिंदू आणि शीख असा उच्चार कृपा करून करू नये ही नम्र विनंती.

तो कागद यशवंतरावांनी वाचला आणि एक सुखद प्रत्यय त्या दिवशीच्या त्यांच्या भाषणात आला.  हिंदू आणि शीख असा उल्लेख त्यांच्या त्या भाषणात त्यांनी चुकूनही केला नाही.

यशवंतरावांचं मन खर्‍या राष्ट्रीय विचारांशी सांगड घालण्याचा प्रयत्‍न काही वेळा कसं करत होतं त्याची ही मूर्तिमंत साक्ष आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org