यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch १९-१

एक परराष्ट्रमंत्री, सार्वभौम नेता आपल्याकडे राजकीय प्रणालीत कसा असतो वागतो हे नवीन नाही.  एवढं निर्भर, निर्मळ, काहीही संबंध नसताना प्रेम करायला मन आभाळाएवढं, फार परिपूर्ण लागतं.  नंतर दहा वर्षांत मी आणखी अनेक लोक चव्हाणसाहेबांच्या घरातले झालो.  कवितेच्या निमित्तानं जवळ आलो.  गेली दहा वर्षं एका कुटुंबातले असल्यागत जगलो, प्रेम केले.  कविता, साहित्य ह्याशिवाय व्यवहारातलं ज, माझे शेतीचे प्रश्न, कुटुंबातले प्रश्न, माणसं त्यांची झाली.

त्यांच्यात माझ्यात सर्वार्थाने फार मोठे अंतर, ते अंतर मोडून ते सातत्याने माझ्या जवळ राहिले.  हे वाटतं तितकं सोपं नाही.  एका उन्हाळ्यात बद्रिनारायणाच्या दर्शनानंतर माझे आई-वडील, चव्हाणसाहेबांकडे दिल्लीत मुलाची ओळख आहे, भेटून यावं म्हणून गेले.  लाल पगडीचं मुंडासं, धोतर, आईचं नऊवारी लुगडं-चोळी.  लिहिणंवाचणं नाव माहीत नाही.  पोलिस, पहारेकरी, सर्वत्र आडवा-अडवी, त्रास, पण चव्हाणसाहेबांचा आनंद किती सांगावा.  माझ्या कवीचे आई-वडील माझ्या घरी आले !  त्यांनी थांबवून घेतलं, दिल्ली दाखविली, इंदिरा गांधी, राष्ट्रपती व अनेकांच्या भेटीची वडिलांची व सोबत्यांची इच्छा होती.  सगळं काही केलं.  हे फक्त तेच करू शकत होते.

नंतर माझे वडील वारल्यावर दिवसावर घरी पळसखेडला आले.  मुख्यमंत्री इत्यादी आले याचा मला मोठेपणा वाटत नाही.  दरम्यान त्यांना माझे काही प्रश्न माहीत झाले.  मी एकाकी, उदास.  पत्रं त्यांना मोकळेपणानं पाठवायचो.  भेटीत त्यावर ते आवर्जून विचारीत.  वयाचं, मोठेपणाचं अंतर, नंतर नव्हतंच.  माझ्या घरातले ते वडील माणूस म्हणून अंतःकरणाने होते.  वडील वारलेले.  मी सगळ्यात मोठा, धाकटी भावंडे, बहिणी, दोन मातोश्री, घरकुलातील भांडणं, अडचणी, पेच, भयाणता व त्यात माझी म्हणून जबाबदारी, भार, त्यांना माहीत होता.  घरातला माणूस म्हणून, त्यांनी तो सोडवला.  त्यांचा धाक दबाव घरच्यांची डोकी शुद्ध करून गेला.  आज प्रश्न नाहीत असं नाही.  परंतु त्यांनी संपूर्ण गुंतागुंत काढूनच टाकली.  हे खरं तर त्यांच्या आमच्या वयाच्या, मोठेपणाच्या हिशेबात बसत नाही.  परंतु आमच्यात हे असं नातं राहिलं.  माझी कविता राहावी यासाठी हेही त्यांना जरुरीचं वाटलं होतं.

खरं तर शरदराव किंवा त्यांच्या इतक्याच जवळच्या आपल्या समवयस्क सहकार्‍यांना सांगितलं नाही ते मी त्यांना सांगितलं.

यशवंतरावांच्या आस्थेवाईकपणाची आणखी एक आठवण आहे.  माझ्या तालुक्यातील वयोवुद्ध स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ गोडबोले महाराष्ट्र मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना त्यांच्या पारतंत्र्यातल्या जेलमधल्या कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन दोन-तीन वर्षं भेटत राहिले.  फारच विकल आर्थिक स्थिती.  मानधन तर सोडाच पण साधे शासनाचे प्रशस्तिपत्रही त्यांना मिळाले नाही.  माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना चिठ्ठी देऊन यशवंतरावजींकडे पाठविले.  दिल्लीला ते सर्व ऐकून, पाहून यशवंतराव फार व्यथित झाले.  ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी यातना भोगल्या त्यांची ही स्थिती पाहून त्यांनी खेद व्यक्त केला.  त्यांना लगेचच पाच दिवसांसाठी परदेशात जायचे होते.  परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांना भेटून सांगितले असा एक स्वातंत्र्य सैनिक हैदराबाद संस्थानात होता.  एका एका मोठ्या कवीनं त्यांना पाठविलेलं आहे.  चुकीच्या किंवा फालतू माणसाला ते कधीच पाठविणार नाहीत.  आपण संबंधित मंत्रालयातील माणसांना सांगून त्यांना मानधन व ताम्रपट इत्यादींची इथल्या भेटीतच व्यवस्था करा, इत्यादी.  तसे आदेश स्वतःच्या दिल्लीतल्या खास लोकांना दिले.  इंदिराजींनी हरिभाऊ गोडबोले ह्यांना बोलवून जवळपास तेरा मिनिटे चर्चा करून हैदराबाद पोलिस ऍक्शन स्थिती इत्यादीविषयी चर्चा केली.  आस्था दाखविली व ताम्रपट, सन्मान इ. बहाल केले गेले.  दिल्लीत त्यांची विशेष काळजी घेतली.  १९७५ ची ही गोष्ट आहे.  तेव्हा मी नुकताच एक छोटा सामान्य कवी, नुकताच परिचय झालेला.  परंतु कवितेच्या व कवीच्या नितांत प्रेमापोटी यशवंतराव चव्हाणांनी किती किंमत दिली !  तीही एका साध्या चिठ्ठीवर.

आणखी एक जुनी आठवण आहे.  माझा परिचय नव्हता.  सभेत मी एक श्रोता म्हणून बसलो होतो.  ही १९७२ ची गोष्ट असेल.  केंद्रामध्ये चव्हाणसाहेब मंत्री होते.  महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी जालन्याला सभा होती.  सभेपूर्वी तिथले जवळपासचे खेड्यातले शाहीर करमणूक, रंजन इत्यादी करीत होते.  चव्हाणसाहेब व्यासपीठावर आले तेव्हा ढोलीवर जबरदस्त थाप मारून तो खेड्यातला शाहीर सुंदर गाणं म्हणत होता.  त्याच्या शब्दांत सामर्थ्य व बाज होता.  त्याला थांबवून सभेस सुरुवात करण्याचे आदेश काँग्रेस कमिटीने दिले.  त्यांना चव्हाणसाहेबांनी सांगितलं भाषण नंतर करणारच आहोत.  भाषणवाल्यांपेक्षा तो अधिक चांगले व प्रभावीपणे सांगतो आहे.  त्याला आणखी म्हणू द्या.  प्रचंड टाळ्यांचा कडकडाट.  मग काय शाहीरानं पटका नीट बांधला व त्यालाही स्फुरण आलं व त्यानं खर्‍या मराठमोळ्या मातीचं शब्दाचं गाणं गावरान पद्धतीनं म्हटलं.  त्याची वारंवार चव्हाणसाहेबांनी नंतर आठवण ठेवली.  सभेनंतर त्याला बोलावून घेऊन विचारलं.  धन्यवाद दिले.  सभेत त्याचा उल्लेख केला.  मग त्यांनी लोकसाहित्याचं स्वतंत्र दालन महाराष्ट्रात केलं, त्याचं संवर्धन वाढ व्हावी म्हणून धडपडावं, कला लोककला ह्यासाठी वेगळं काही करावं, शाहीरासाठीची अकादमी व्हावी, त्यांच्या लयींची, रांगड्या प्रादेशिक बोलींचं रेकॉर्डिंग जवळ ठेवावं, संशोधन व्हावं म्हणून सतत संबंधित साहित्यिक संशोधकांशी बोलावं, साहित्य संस्कृती मंडळ आणखी याची कार्यकक्षा वाढावी, नव्या महाराष्ट्रातल्या विशेषतः त्यांनी साहित्याकडे बघावं असं चव्हाणसाहेबांनी सातत्याने ते जातील त्या ठिकाणी सांगितलं.  आतप्रोत प्रेम व रसिकता त्यांचे ठिकाणी पाहिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org