यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch १८-१

यशवंतराव जेवढे केवढे मोठे झाले त्यापेक्षा अधिक मोठे व्हावेत अशी इच्छा धरणारे अनेक होते.  ते योग्यही होतं.  तसं अधिक मोठं व्हावं यासाठी त्यांनी धोका पत्करून मोठी झेप घ्यावी असं म्हणणारे आणि सुचविणारेही अनेक होते.  धोका पत्करण्याचा किंवा झेप घेण्याचा निर्णय उघडपणे करीत नाहीत असं दिसताच धूर्तपणानं संधीची ते वाट पाहात बसणारे आहेत असा त्याचा अर्थ लावला गेला.  राजकीय क्षेत्रात समन्वय साधून काँग्रेस पक्ष एकसंध राखण्याच्या त्यांच्या प्रयत्‍नाच्या वेळी हितसंबंधीयांनी त्यांनाच कुंपणावर बसविलं.  

हे सर्व पाहिलं म्हणजे यशवंतरावांच्या मनाचा, कृतीचा आणि निर्णयाचा शोध घेणं, अन्वयार्थ लावणं अधिकच कठीण ठरतं.  दूर अंतरावर राहून यशवंतरावांच्या मनाचा आणि कृतीचा योग्य अर्थ लावता येणारा नाही.  त्यासाठी त्यांच्या मनात डोकवावं लागेल.  ज्यांनी तसा प्रयत्‍न केला असेल त्यांना त्यांच्या कृतीचा किंवा निर्णयाचा अर्थ उमजला असण्याची शक्यता आहे.

त्यांचं मन कसं काम करीत होतं हे त्यांच्या राजकीय आयुष्यातील दोन-तीन प्रमुख घटनांवरून लक्षात येण्यासारखं आहे.

१९६६ साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे अकस्मात निधन झालं.  यशवंतराव हे त्यावेळी संरक्षणमंत्री होते.  शास्त्रीजींच्या समवेत होते.  शास्त्रीजींचा पार्थिव देह त्यांनीच भारतात-नवी दिल्ली येथे आणला.  पाकिस्तानवर विजय संपादन करणारे संरक्षणमंत्री म्हणून त्या काळात यशवंतरावांची प्रतिमा खूपच उंचावली होती.

शास्त्रीजींच्या नंतर पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली त्या वेळी सर्वतोमुखी प्रामुख्यानं यशवंतरावांच्याच नावाचा उच्चार सुरू झाला.  के. कामराज हे त्या वेळी अ.भा. काँग्रेसचे अध्यक्ष होते.  ते यशवंतरावांचे जुने मित्र.  पंतप्रधानपदासाठी श्री. कामराजांच्या गोटातून यशवंतरावजींचे नाव पुढे आणण्यात आले.  स.का.पाटील यांनी यशवंतरावांच्या बाजूनं उभं राहण्याची तयारी दर्शविली.  महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील आणि कितीरी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधानपदाची ही निवडणूक यशवंतरावजींनी ठामपणानं लढवावी असा आग्रह धरला.  त्यामध्ये मी एक होतो.  मोरारजी देसाई उभे राहिले तरी तशी काळजी नव्हती. कारण दिल्लीतील अन्य नेतागण यशवंतरावांचं नेतृत्व मान्य करण्यास राजी होता.  खलबतं सुरू होती. परंतु यशवंतराव स्तब्ध होते.  आग्रह धरणारांशी ते बोलत होते.  त्यांच्या मनाचा थांगपत्ता मात्र लागत नव्हता.  कदाचित ते दिल्लीच्या राजकारणाचा अंदाज घेत असावेत.

अटीतटीच्या चर्चा सुरू झाल्या आणि होकारार्थी किंवा नकारार्थी असा काहीतरी निर्णय सांगण्याचा क्षण निर्माण झाला त्या वेळी, दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांनी सांगितलं- ''ठीक आहे, इंदिरा गांधींशी मी बोलतो आणि मग काय ते सांगतो.  अंतिम निर्णय नंतरच करू.''

''तुम्ही इंदिरा गांधींकडे चर्चेसाठी किंवा त्यांची मदत मागण्यासाठी जाऊ नये असं आम्हाला वाटतं.  कारण त्यातून पेच निर्माण होईल.  ही संधी तुम्ही घालवू नये.''- महाराष्ट्रीय मंडळी.  

''तसं करून चालणार नाही. पंडित नेहरूंच्या त्या कन्या आहेत.  पं. नेहरूंनी मला दिल्लीला आणलं.  इथं काही महत्त्वाचा निर्णय करताना, एक नैतिक कर्तव्य म्हणून साफ मनानं मला त्यांच्याशी बोललं पाहिजे.''- यशवंतराव.

अखेरीस यशवंतराव स्वतःच इंदिराजींकडे गेले.  त्या वेळी त्या माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री होत्या.  दोघांमध्ये चर्चा झाली.  या चर्चेच्या वेळी यशवंतरावांनी त्यांना स्वच्छ शब्दांत सांगितलं की, ''पंतप्रधानपदाची निवडणूक मी लढवावी असा आग्रह होत आहे.  ते करायचं तर मला आपला पाठिंबा लागेल.  तुम्ही मला पाठिंबा द्यावा.  याउप्पर तुम्ही स्वतः इच्छूक असाल तर मला तसं सांगा.  माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील.  निर्णय मात्र आजच करावयास हवा.''

यशवंतराव चर्चा करून घरी परतले आणि नंतरच्या एक तासातच इंदिराजींनी त्यांना सांगितलं- ''मी उभं राहायचं ठरवलं आहे.''

त्या निवडणुकीत यशवंतरावांनी आपली सर्व शक्ती इंदिराजींसाठी पणाला लावली.  पंतप्रधानपदावर त्या आरूढ झाल्या.  यशवंतरावांना चालून आलेली संधी हुकली.  पंडित नेहरूंवरील आत्यंतिक निष्ठेमुळं, कृतज्ञतेमुळं ज्यांनी जीवनातली एक चालून आलेली उत्तम संधी हुकवली त्यांना धूर्त किंवा संधिसाधू ठरविणारांनी अंतर्मुखतेनं विचार करण्याची गरज आहे असे वाटतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org