यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व- स्मृतिसंकलन-४

'असा माणूस होणे नाही'

यशवंतरावांची व माझी पहिली भेट स्मरते ती १९५८ सालच्या नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेची.  'धुळीचे कण' ह्या माझ्या नाटकाचा त्यावेळी प्रयोग झाला होता.  यशवंतरावांनी ते नाटक पाहून माझी चौकशी केली आणि भविष्यवाणी उच्चारली.  ''हा मुलगा पुढे येणार'' यशवंतरावांची व माझी त्यानंतर भेट झाली ती 'रायगडाला जेव्हा जाग येते' ह्या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाला.  मध्यंतरीच्या काळात यशवंतराव यशाची एकेक पायरी वर चढत होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या चाणाक्ष नजरेने हेरलेला हा 'यशवंत मोहरा' त्यांनी दिल्लीच्या पदावर नेऊन ठेवला होता.  संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या धर्मपत्‍नी सौ. वेणूताई यांच्याबरोबर त्या शतकमहोत्सवी प्रयोगाला हजर होते.  नाटक पाहून रंगपटात आल्यावर ''वा ! शंभूराजे'' म्हणत त्यांनी मला मिठीत घेतले.  शब्दांची जरूरच भासू नये इतकी ती कृती बोलकी होती.

यशवंरताव व सौ. वेणूताई त्यानंतर माझ्या 'अश्रूंची झाली फुले', 'गारंबीचा बापू', 'मला काही सांगायचंय', 'इथे ओशाळला मृत्यू' इ. नाटकांना आवर्जून येत राहिले.  मनापासून दाद देत राहिले.  कौतुक करत राहिले.  माझ्या सगळ्या भूमिका त्यांना आवडल्या असल्या तरी 'रायगड' मधील माझ्या संभाजीवर त्यांचे अतोनात प्रेम होते.  त्यामुळेच यशवंतरावांचया घराचे दार मला सदैव उघडे असायचे.  त्यांच्याकडे मी कधीही गेलो तरी ते प्रचंड कामाचा व्याप, माणसांचा गराडा बाजूला सारून मला एकांतात वेळ देत.  मनसोक्त बोलत.  अशा तर्‍हेचे अगत्य, आपुलकी त्यांच्या सहवासांत येणार्‍या सर्वच कलावंतांना, साहित्यिकांना मिळत असे.  यशवंतरावांचा दिल्लीसारख्या दूरच्या ठिकाणी तर किती आधार वाटायचा !  दिल्लीत भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या वेळी, घरातील एखादे कार्य असावे, त्याप्रमाणे ते तिथे वावरत.  हवे नको पाहत.  त्यांच्या बंगल्यावरील चहापानाच्या दिवशी तर मी तिथे पोहोचताच ते लगबगीने उठून पुढे आले, आणि आपल्या खुर्चीवर बसायचा आग्रह करू लागले.  त्यांच्या ह्या कृतीने मी पार खजील होऊन गेलो.  आणि म्हणालो, 'हे काय सांगता साहेब ?'  त्यावर ते कौतुकाने हसून म्हणाले 'अहो !  तुमचा आज मान आहे.'  कलावंतांची अशी कदर करणारा असा शास्ता दुर्मिळच.  त्याच मुक्कामात मला त्वरित मुंबईला परतायचे होते.  विमानाचेही तिकीट मिळेना.  यशवंतरावांना हे कळताच त्यांनी आपल्या सचिवांना फर्मान सोडले की, सरकारी कोट्यातील तिकिटातून डॉक्टरांच्या तिकिटाची व्यवस्था करा.  दिल्लीत कसलीही अडचण आली तरी प्रथम आठवण व्हायची ती यशवंतरावांचीच !

यशवंतरावांचे दिल्लीतील घर पाहुणचारासाठी सदैव खुले असायचे.  घरची स्वामिनी नसली तरी ह्या रीतिरिवाजात खंड पडला नव्हता.  गेल्याच ऑक्टोबर मध्ये स्वामीकार रणजित देसाई व सौ. माधवी देसाई दिल्लीला त्यांचा पाहुणचार घेऊन परतली.  पण ह्या उभयतांना जी प्रकर्षाने जाणवली ती ह्या पहाडासारख्या माणसाच्या आतल्या बाजूला निर्माण झालेली एकाकीपणाची प्रचंड पोकळी.  सौ. वेणूताईंच्या मृत्यूनंतर ते मनाने आणि प्रकृतीनेही खचले.  सावली हरवलेल्या माणसासारखी त्यांची अवस्था झाली.  वेणूताईंच्या आठवणीवरच ते जगत होते.  श्री. रणजित देसाई यांच्याकडे त्यांनी महाराष्ट्रातील मित्रमंडळींची साहित्यिकांची, कलावंतांची अगत्यपूर्वक चौकशी केली.  त्यात माझीही आठवण काढली.  पुन्हा एकदा माझ्या सर्व भूमिकांची उजळणी केली.  देसाई पती-पत्नींच्या तोंडून हे एकत असताना माझा जीव गुदमरत होता.  

यशवंतराव कलावंतांचे नुसते बोलके चाहते नव्हते तर ते त्यांनी कृती करूनही दाखवून दिले.  मृतप्राय होऊ घातलेल्या मराठी रंगभूमीला त्यांनी करमुक्तीचे संजीवन दिले.  मराठी नाट्यसृष्टीला पुनः बहर आणायचे अविस्मरणीय कार्य त्यांनी केले.  मराठी नाट्यसृष्टी त्यांची याबद्दल सदैव ॠणी राहील.  समस्त मराठी नाट्य-व्यावसायिकांनी यशवंतरावांच्या नावाने एक नाट्यमंदिर ह्या महाराष्ट्राच्या राजधानीत उभे करून ह्या कलासक्त नेत्याला मानाचा मुजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो.  यशवंतरावांना ही खर्‍या अर्थाने आदरांजली होईल.  

थोर मुत्सद्दी, कुशल राजनीतितज्ज्ञ, विद्वत्ता, आणि कलास्वादक मन असे चौफेर व्यक्तिमत्त्व यशवंतरावांना लाभले होते.  ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे अशी जी काही मंडळी माझ्या आयुष्यात आली त्यांमध्ये यशवंतराव चव्हाण अग्रक्रमाने आहेत.

- डॉ. काशिनाथ घाणेकर

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org