यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व- स्मृतिसंकलन

स्मृतिसंकलन

दिल्लीतील मराठी नाट्यमहोत्सवासाठी मदत

मराठी नाट्य परिषदेच्या विद्यमाने मार्च १९६१ मध्ये दिल्ली येथे नाट्यसंमेलनाचे ४३ वे अधिवेशन भरले होते.  श्रीमती दुर्गाबाई खोटे अध्यक्ष होत्या.  यशवंतराव तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  आमच्या विनंतीस मान देऊन यशवंतराव या संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले.  त्यांच्या आणि दिल्लीतील कार्यकर्त्यांच्या प्रयत्‍नाने राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी उद्धाटनास येण्याचे मान्य केले होते.  १९५४ साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या 'भाऊबंदकी' नाटकास पारंपारिक विभागाचे पहिले पारितोषिक मिळाले होते व ते पारितोषिक राष्ट्रपतींच्याच हस्ते प्रदान करण्यात आले होते.  त्यामुळे मराठी नाटकाचा दर्जा त्यांना विदित होताच आणि त्यांनी संतोषाने अधिवेशनाचे उद्धाटन करण्याचे मान्य केले होते.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच स्वागताध्यक्ष असल्याने सार्‍या नाट्यप्रेमी महाराष्ट्राने आपल्या समारंभात राष्ट्रपतींना उद्धाटनाची विनंती केली असाच याचा अर्थ होता.  या नाट्यसंमेलनाच्या अधिवेशनाने मराठी रंगभूमीची सार्‍या भारताला नव्याने ओळख झाली, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असा विश्वास आहे.  यशवंतरावांचया साहाय्यानेच हे होऊ शकले यात शंका नाही आणि या संमेलनाची आर्थिक बाजूही मुख्यमंत्री स्वागताध्यक्षांनी यथोचित सांभाळली यात शंका नाही.  तो सोहळा अवर्णनीयच होता यात संदेह नाही.

१९७६ साली दिल्ली येथे नाट्यसंमेलनाचे अधिवेशन भरले होते.  नटवर्य दाजी भाटवडेकर अध्यक्ष होते.  या वेळी यशवंतराव दिल्लीतच होते.  त्यांनी याही वेळी कार्यकर्त्यांना साहाय्य तर केलेच, परंतु संमेलनाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहून प्रोत्साहन दिले.  याही वेळी राष्ट्रपती आले होत ते संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी रंगभूमी-दिनाचे अध्यक्ष म्हणून.  या सार्‍या गोष्टी घडल्या त्या यशवंतरावांनी संमेलनासाठी आलेल्या सर्व प्रतिनिधींना आपल्या निवासस्थानी चहापानास निमंत्रिले होते त्या वेळी त्यांनी दाखविलेले अगत्य हजर असणार्‍या प्रत्येकास जाणवल यात संदेह नाही.  

- शं. ना. अंधृटकर
(गावकरी, नासिक)

भारतीय खेळांचा त्राता - यशवंतराव चव्हाण

भारतीय खेळ खुद्द भारतातही उपेक्षिलेले.  कुठे संघटना कमी पडते, तर कुठे शासकीय पाठिंबा तोकडा पडतो.  यातून खेळाडूंचा उत्साह कमी होत जातो.  या पार्श्वभूमीवर या खेळांच्या विकासासाठी, वाढीसाठी सर्व स्तरावर प्रयत्‍न करणार्‍या कार्यकर्त्यांना उत्साह देणारे, नवीन कल्पनांना पुढे नेणारे भूमिकानिष्ठ आणि रसिक नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण.  त्यांच्या नेतृत्वाची जाण आमच्या धडपडणार्‍या संघटनांना कार्यक्षम ठेवण्यात नेहमीच उपयोगी ठरली आहे.  कबड्डी, खोखो, कुस्ती, आट्यापाट्या या सर्वही खेळांबद्दल त्यांना कळकळ होती.  ज्या संघटनांच्या संचालकांनी त्यांची साथ घेतली त्यात अखिल भारतीय स्वरूपात चांगला बदल झालेला दिसतो.  यशवंतराव त्या संघटनांमागील खंबीर नेतृत्व होते.

यशवंतरावांनी फक्त प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचाच विचार केला नाही तर त्याहूनही आपुलकीने त्यांचे कार्यकर्त्यांच्या सोयीकडे बारकाईने लक्ष असे.  माझ्या रशिया, इंग्लंड, रोम, पॅरीस अशा परदेशी दौर्‍याची त्यांनी नेहमीच पडद्याआडून काळजी घेतली.  कुठेही वाच्यता न करता सहानुभूती म्हणूनच त्यांनी अशा वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष पुरविले.  एखादा विश्वासाचा वा भरवशाचा माणूस मिळाला की त्याच्यामागे यशवंतराव पूर्ण उभे राहात असत.  सर्व वैयक्तिक व शासकीय पाठिंबा देऊन.  

'गादीवरची कुस्ती' आणि 'मातीतील कुस्ती' हे वाद महाराष्ट्रानी बराच काळ घातले.  प्रस्थापितांना नवीन गादी रुचत नव्हती.  आपली प्राचीन मल्ल विद्या त्यातून मागे पडत होती.  हे यशवंतरावांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गादीवरील कुस्तीचे तंत्रमंत्र शिकवण्यासाठी शासकीय पाठबळ देण्याची केव्हाच तयारी दाखविली.  त्या आधी कै. मामासाहेब मोहोळ, बाळासाहेब देसाई, यांचे तसे प्रयत्‍न चालू होतेच.  पण तसे रांगत, चाचपडतच.  पण नंतर कुस्ती परिषदेची नियमित अधिवेशने, शिष्यवृत्ती, कुस्तीवीरांचा खुराक, आदरसत्कार या सर्वांना शासकीय आधार देण्याचा मार्ग यशवंतरावांनी आखून दिला.  सध्याचे राजक्रीडाखातेही त्याच मार्गावरून पुढे जात आहे.  एक कै. खाशाबा जाधव सोडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला मल्ल प्रभाव पाडू शकला नाही, याची त्यांना सतत खंत होती.

बहुगुणी वेगवान खेळ असूनही खो खो तसा मागेच राहिलेला.  पण आता मात्र त्यात नियमावलीच्या पुस्तकातून संघटनेपर्यंत बरीच सुधारणा झाली आहे.  यशवंतराव काही काळ राष्ट्रीय खो खो संघटनेचे अध्यक्षही होते.  त्यांच्या आमदानीत या खेळाची भरीव प्रगती झाली.  या काळात कराड या यशवंतरावांचया गावी झालेले राष्ट्रीय खोखो सामने, त्याचे यजमानपद, त्याच काळात बडोद्याचे सुधीर परब यांना प्रथमच खोखोत मिळालेले अर्जुनपदक, हे केवळ योगायोग नव्हेत.  हा यशवंतरावांचया सक्रिय पाठिंब्याचा परिणाम असे म्हणावेसे वाटते.  ते केंद्रीय गृहमंत्री असताना सेंट झेवियर्सच्या सामन्यात खोखो सामन्यांचा शुभारंभ करताना खो देताना घेतलेले त्यांचे छायाचित्र त्यांच्या खिलाडू वृत्तीचे उदाहरणच.

शंकरराव साळवी
'छावा' आणि 'यशवंतरावजी'
- एक 'ॠणानुबंध'

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org