यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-७

स्मृतिसंकलन

'दैनिक प्रभात'चे विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व

प्रकाशक आणि संपादक यांना हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी बोलावले.  हे सर्व घडत असता यशवंतरावांनी आदल्या रात्री साडेदहा वाजा मला फोन करून माझे मत काय आहे ते जाणून घेतले.  मी त्यांना सांगितले, ''कोठारींकडून हक्कभंग तर झालाच आहे, पण मला असे वाटते की, हे प्रकरण वाढवू नये.  या प्रकरणी जी किमान शिक्षा असेल ती द्यावी व प्रकरण मिटवावे.''  यशवंतरावांचा मोठेपणा हा की त्यांनी हे मानले.  आपण अग्रलेख लिहिला तेव्हा विधानसभा रीतसर अस्तित्वातच आलेली नव्हती असा एक न टिकणारा मुद्दा कोठारींनी काढला होता.  तो अर्थातच फेटाळला गेला.  २० जुलै रोजी जेव्हा कोठारींना शिक्षा सुनावण्याची वेळ आली तेव्हा सबंध सभागृह माझ्या भूमिकेने आश्चर्यचकित झाले.  अपवाद फक्त यशवंतरावांचा.  कारण त्यांचे माझ आधीच बोलो आले होते.  ''कोठारींची कडक कानउघाडणी करावी.''  अशी सौम्य शिक्षा त्यांना देण्यात आली.  गंमत अशी की कोठारींनीही मला नंतर पत्र लिहून ''तुम्ही विशिष्ट धोरणाने हे केलेत हे मी समजू शकतो.  माझा तुमच्यावर राग नाही.'' असे मला कळविले.  लोकशाहीच्या आणि शांततेच्या मागौने आम्ही संयुक्त महाराष्ट्र मिळवू ही आमची भूमिका होती.  बखेडे माजविणे, अर्वाच्य लिहिणे हे बरोबर नाही हे जनतेला कळायला हवे होते.  या सर्व प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हा की, या प्रश्नाबद्दल काय करावे यासंबंधाने यशवंतरावांनी माझ्याशी आधी विचारविनिमय केला.  लोकशाहीचे जतन विरोधकांना विश्वासात घेतल्याने होते हे यशवंतरावांना मंजूर होते.

तो प्रश्नच गैरलागू

विशाल द्वैभाषिक चालवायचे होते म्हणून यशवंतराव विरोधी पक्षनेत्यांशी सल्लामसलत करून मार्ग काढीत होते.  त्यांचा खरोखरीच अशा मार्गावर विश्वास होता.  कशावरून असे कोणी विचारू नये.  कारण मग यशवंतरावांच्या सुसंस्कृतपणाबद्दलच शंका घेतल्यासारखे होईल.  यशवंतरावांचा या मार्गावर विश्वास होताच.  याच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आम्ही आणि कम्युनिस्टांनी एकत्र येऊन गिरणी कामगारांची युनियन काढली व एक-दोन दिवसांत एक लाख सभासद केले.  कशासाठी ?  काय आवश्यकता होती ?  आंतरिक चांगुलपणा अशा वेळी संस्कारी मनाला स्वस्थ बसू देत नाही.  शिवाय अशा प्रवृत्तीमुळे परस्पर विश्वासही वाढतो.  सोलापूरच्या नरसिंगगिरजी मिलचा प्रश्न उभा राहिला त्या वेळी आम्हा उभयतांत वाढलेला हा विश्वासच ती समस्या सोडवावयास उपयोगी पडला.  पाच हजार कामगार बेकार झालेले होते आणि सरकारने गिरणी ताब्यात घेऊन स्वतः चालविली नाही तर सत्याग्रहाचे आंदोन करू असे मी सोलापूरला जाहीर केले होते.  मजूर मंत्री शांतिलाल शहा औदार्याने गिरणी कामगारांकडे बघायला तयार नव्हते.  ५० टक्के वेतन घेऊन कामगार गिरणी चालविण्यास तयार असतील तरच सरकार हायकोर्टाकडून गिरणीचा ताबा स्वतःकडे घेईल असे ते म्हणू लागले.  मजुरीत पन्नास टक्के कपात कामगारांना परवडणारी नव्हती.  यशवंतरावांना प्रश्न सुटायला हवा होता.  शांतिभाईंनी तत्त्वतः गिरणी ताब्यात घेण्याचे मान्य केले ही जमेची बाजू होती.  आम्ही २० टक्के मजुरी कपातीस कबूल होतो.  अखेर प्रश्न मिटायचा कसा असे शांतिलाल शहांनी विचारले, ''यशवंतरावांचा लवाद मान्य आहे काय ?''  आम्ही लगेच 'होय' म्हणालो व एकतृतीयांश कपातीवर तडजोड झाली.  

कधीही धोका नाही

जी गोष्ट नरसिंगगिरजी मिलची तीच नासिकच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसबाबतची.  यशवंतरावांबद्दल वाटणार्‍या विश्वासावर विसंबून मी कामगारांना संप मागे घ्यायला लावला आणि केंद्र सरकारच्या मजूर खात्याशी संबंधित असा तो प्रश्न असतानाही यशवंतरावांनी कामगारांना न्याय दिला.  आम्ही यशवंतरावांवर विश्वास टाकीत गेलो आणि त्यांनी आम्हाला कोठेही धोका दिला नाही.  म्हणून मला म्हणायचे आहे की देहाला जशी देहधारणेसाठी श्वासोच्छ्वासची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे समाज चालायचा असेल तर परस्पर विश्वासाची आवश्यकता आहे.

- श्री. एस. एम. जोशी
महाराष्ट्र टाइम्सवरून

बहुरंगी व बहुसुरी व्यक्तिमत्त्व

भारताचा समर्थ गृहमंत्री, एवढ्यावरच त्यांचे मूल्यमापन करणे अशक्य आहे.  किंबहुना यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे हेच वैशिष्ट्य आहे की, ते एकसुरी नाही, एकरंगी नाही; ते बहुरंगी, बहुसुरी आहे.  एखाद्या कुशल संगीत तज्ज्ञाचा संच आपल्या सर्व वाद्यवृंदासह सुरेल झंकार एका लयीत छेडून एक नादमधुर सुरकाव्य मनःपटलावर कोरतो, त्यावेळी एक निर्व्याज आनंदाचा क्षण आपल्या अंतरंगात चिरंतन बनतो.  तसेच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत वाटते.  ते राजकारणात राजकारणी आहेत, अर्थकारणाचे जाणकार आहेत, सामाजिक समस्यांचे चिंतक आहेत तसेच समाजातलया विविध प्रवृत्तींचे अभ्यासू आणि रसिक टीकाकार आहेत.  कवि-लेखकांच्या मेळाव्यात, साहित्यिकांच्या मेळाव्यात ते हळुवार व सौंदर्यसंपन्न शब्दांचा शिडकावा करतील, तर राजकारणाच्या मैदानात कडव्या निष्ठेने भडिमार करतील.  यशवंतरावांबद्दल प्रा. ना. सी. फडके यांनी एकदा सांगूनही टाकले आहे की, यशवंतराव राजकारणात न पडते तर मराठीला एक समर्थ लेखक लाभला असता.  यशवंतरावजींच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर राजकीय जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येते की, त्यांचे आजवरचे राजकारण हे व्यापक सामाजिक हित, समाजवादी अर्थकारणाचा पुरस्कार, लोकशाही जीवननिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी दृष्टिकोण या चार प्रमुख सूत्रांचा आचार करणारे आहेत.

- शरद पवार
( महाराष्ट्र टाइम्स, १२ मार्च १९७० )

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org