यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-६

यशवंतरावांचा विवाह जरी २ जून, १९४२ रोजी झाला असला तरी यशवंतरावांनी संसार केला तो केवळ एक वर्ष चार महिने.  लग्नानंतर सर्व संसाराची जबाबदारी सौ. वेणूताईंवर होती.  कारण लग्न होताच साहेब भूमिगत झाले आणि नंतर सत्तेवर आले.  सौ. वेणूताईंच्या निधनानंतर जवळपास महिना, दोन महिने कोणी ना कोणी दिल्लीत होते.  जवळपास ऑगस्ट महिन्यात ते एकटे राहू लागले.  संसाराचा श्रीगणेशाही यशवंतरावांना माहीत नव्हता.  पाहुणे मंडळी दिल्ली सोडून गेल्यानंतर नोकराने त्यांच्याकडे भाजीसाठी पैसे मागितले.  यशवंतरावांना अतिशय मोजक्याच भाज्या आवडत होत्या.  हंगाम नसताना त्या फार महाग असायच्या.  यशवंतरावांनी १० रुपये नोकराच्या हातावर ठेवले.  १० रुपयांत ५ माणसांची ३-३ दिवसांची भाजी कशी येणार याचा तो विचार करीत राहिला.  पण बोलणार कसे ?  थोड्या वेळाने त्यांनी साहेबांना समजविण्याचा प्रयत्‍न केला.  त्यांनी मोठ्या कष्टाने आणखी १० रुपये दिले.  आणखी पैसे मागण्याची नोकराची हिम्मत झाली नाही.  त्याने आपल्या जवळचे १०-१५ रुपये टाकून २-३ दिवसांची भाजी आणली व बिल साहेबांना दाखविले.  साहेबांनी नेहमीप्रमाणे बिल टोपलीत टाकले.  २ दिवसांनी पुन्हा भाजी आणण्याची वेळ आली तेव्हा साहेबांनी असेच केले.  नोकराने मोठ्या मुश्किलीने साहेबांना भाजीचे भाव, भाजी किती लागते वगैरे समजावून दिले.  पण साहेबांना हे खरे वाटेना व अर्थबोधही होईना.  भाज्या इतक्या महाग असतात हे साहेबांना पटणार कसे ?  कारण त्यांनी कधी विचारपूस केली नव्हती.  त्याची गरजही नव्हती.  संसाराचा हा महत्त्वाचा भाग सौ. वेणूताईंनीच सांभाळला होता.  संसाराच्या कटकटीची झळ त्यांनी यशवंतरावांना कधीच लागू दिली नव्हती.  दीड वर्षाच्या कालावधीत यशवंतरावांवर संसाराचे असे अनेक प्रसंग आले.  देणं-घेणं ही कठीण बाब आहे, संसार म्हणजे तारेवरची कसरत आहे हे त्यांना तेव्हा समजले.  

सत्तेवरून खाली आल्यानंतर यशवंतरावांच्या वैयक्तिक जीवनाला ओहोटीच लागली असे म्हणणे चुकीचे होणार नाही.  राजकीय परिस्थितीचे फासे जसे त्यांच्या विरुद्ध पडत गेले तसेच सांसारिक जीवनही उद्ध्वस्त होत गेले. अर्थात याही परिस्थितीत एका कुशल वैमानिकाप्रमाणे ते आपले राजकीय जीवन स्थिर ठेवण्याचा प्रयत्‍न करीत होते.  त्यात यशस्वीही होत होते.  या कालावधीत अनेक दुरावलेली माणसे त्यांच्या जवळ येत होती हा त्यांच्या जीवनातील प्लस पॉईंट होता.  उदाहरण द्यावयाचे असेल तर स्व. वसंतराव नाईक यांचे देता येईल.  त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढण्यात यशवंतरावांचा हात होता असा त्यांचा गैरसमज होता.  सत्य परिस्थिती अशी होती की, यशवंतरावांचे निजी सचिव श्री. डोंगरे यांनी त्यांना ५-६ महिने अगोदर अशा प्रकारच्या हालचाली होत आहेत तरी सावध राहा असा इशारा दिला होता.  काही दिवसांनंतर श्री. नाईक यांचा गैरसमज दूर झाला.  त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली आणि सतत यशवंतरावांबरोबर छायेसारखे वागण्याचे अभिवचन दिले.  दुर्दैवाने ते सिंगापूरला गेले असताना तिथेच त्यांचे निधन झाले.  दुरावलेली माणसे जवळ येत गेल्यामुळे यशवंतरावांना आनंद होत होता.

१९७७ ते १९८० पर्यंत यशवंतराव नवीन उत्साहाने काँग्रेसची उभारणी करण्याकरिता प्रयत्‍नशील होते.  परंतु नंतर त्यांनी हळूहळू राजकारणातून अंग काढून घेण्यास सुरुवात केली.  याला कारण ज्या काही घटना घडत होत्या त्यात ते समाधानी नव्हते.  त्यांना काही घटनांनी वेदना होत होत्या.  पण इलाज काही नव्हता.  प्रथमतः जिल्हा, नंतर राज्यस्तरीय व नंतर केन्द्रस्तरावरील राजकारणातून ते बाहेर पडत होते.  अर्थात राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते.  तो त्यांचा पिंड नव्हता.

सत्तेवर नसलेले यशवंतराव शेवटपर्यंत यशवंतरावच राहिले.  त्यांना तोच सन्मान मिळत होता, तोच आदर मिळत होता.  त्यांनी आपली ध्येये सोडली नाहीत किंवा तत्त्वापासून दूर गेले नाहीत.  म्हणूनच महाराष्ट्राने आणि देशाने त्यांचा नितांत आदर केला.  त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र दुःखी झाला.  स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतर कोंदणातून गळून पडलेला असा हा अष्टपैलू हिरा !!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org