यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-५

यशवंतरावांनी या कालावधीत सर्वांत जास्त पुस्तके वाचली असली तर ती कवितांची !  अनेक कवींनी आपल्या पुस्तकाला यशवंतरावांनी प्रस्तावना लिहावी म्हणून कितीतरी पुस्तके पाठवून दिली होती.  यशवंतरावांनी बर्‍याच पुस्तकांना प्रस्तावना लिहून पाठवून दिल्या होत्या.  यशवंतरावांना काव्य, नाट्य वाचनाची हौस होती.  यशवंतरावांचे बाह्य व आतील अंतःकरण यात जमीन अस्मानाचा फरक होता.  वरून धीर गंभीर, शांत दिसणारा हा माणूस अतिशय विनोदी होता हे सांगूनही खरे वाटणार नाही.  यशवंतराव साहित्याचा आनंद मनापासून लुटत होते.  यशवंतराव नाटक पाहायला बसले की त्यातील विनोदावर ते मनसोक्त हासत असत.  पण त्याचबरोबर नाटकातील दुःखाचे क्षण पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहात.  यशवंतराव दिल्लीत आल्यानंतर पार्लमेंट सेशन असताना साधारणतः दर बुधवारी ते काही संसद सदस्यांना रात्री जेवण्यास बोलावीत.  एक बुधवार केवळ महाराष्ट्रातील संसद सदस्य जेवावयास असत.  एक प्रकारचे हे गेट-टू-गेदर होते.  जेवण झाल्यानंतर ही सर्व मंडळी गोलाकार बसत असत आणि नंतर गप्पाविनोदांना ऊत येत असे.  प्रत्येकजण विनोदपूर्ण अनुभव सांगत असत.  हा कार्यक्रम तास दीडतासापेक्षा जास्त चालत असे.  या वेळी यशवंतराव मंत्री राहात नसत.  त्यांनी सांगितलेल्या विनोदपूर्ण गोष्टी ऐकून हसता हसता मुरकुंडी वळत असे.  या संसद सदस्यात श्री. तुळसीदास जाधव, शंकरराव मोरे, के. के. शहा सारखे रथी महारथी होते.  यशवंतरावांनी या वेळी सांगितलेले एक दोन किस्से आजही माझ्या लक्षात आहेत.  आपली वकिली कशी चालली होती या संदर्भात यशवंतरावांनी सांगितलेला किस्सा असा-

वकिली सुरू झाल्यानंतर कराड, सातार्‍याच्या आसपास राहणारे लोक त्यांच्याकडे कोर्टातील केसेसच्या संदर्भात येऊ लागले.  कोणी माणूस आला की यशवंतरावांना आनंद होत असे.  त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते आदरातिथ्य करीत असत.  परंतु कोर्टात गेल्यानंतर हा अशील दुसर्‍या कोण्या वकिलाबरोबर दिसत असे.  निवडणुकीतील प्रचाराच्या लांब भाषणाबद्दल त्यांनी सांगितले की एका वक्तयाला लांब भाषण देण्याची सवय होती.  एकदा तर तो भाषण देण्यात इतका रंगून गेला आणि ते इतके लांबले की सर्व श्रोते निघून गेले.  एकच शेवटपर्यंत पेंगत बसला होता.  भाषण संपल्यानंतर वक्तयाने विचारले की माझे भाषण तुला आवडलेले दिसते.  तो म्हणाला साहेब आपण काय सांगितले ते माहीत नाही.  पण आपण ज्या ठिकाणी उभे आहात ती सतरंजी माझी असल्यामुळे मी थांबलो आहे.  

या गप्पा चालू असताना जर एखादा बाहेरचा माणूस आता आला तर त्याला मंत्री कोण आहे हे सांगूनही खरे वाटले नसते.  यशवंतरावांना कंटाळा आला की ते काव्य व नाट्य वाचन मोठ्याने करीत.  मुख्य श्रोता असायच्या सौ. वेणूताई.  वेणूताईनंतर ते कविता मोठ्याने म्हणत पण त्यात रस नसे.  

यशवंतरावांनी कोणाशीच शत्रुत्व केले नसल्यामुळे त्यांची जिव्हाळ्याची माणसे खूप होती.  ते दुसर्‍याच्या भावनांना फार जपत.  कोणाचेही मन स्वप्नातही आपल्यामुळे तुटू नये याची ते काळजी घेत.  त्यांनी नेहमी प्रेम दिले आणि घेतले.  ते कोणाला टाकून बोलले आहेत असे सहसा झाले नाही.  कामगारवर्गावर त्यांचे नितांत प्रेम होते.  माथाडी कामगार तर त्यांच्या जिव्हाळ्याचा वर्ग होता.  माथाडी कामगार संघटनेचे मुख्य स्वर्गीय श्री. अण्णासाहेब पाटील यांच्यावर त्यांचे बंधुवत प्रेम होते.  हा वर्ग यशवंतरावांच्या पाठीशी सदैव उभा राहिला.  अण्णासाहेबांच्या मृत्यूची बातमी यशवंतरावांना कळली तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि तातडीने त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ते मुंबईस गेले.  सप्टेंबर-आक्टोबर महिन्यातील गोष्ट आहे.  मुंबईतील माथाडी कामगारांनी सौ. वेणूताईंच्या स्मारक ट्रस्टसाठी निधी देण्याचा कार्यक्रम ठरविला.  यशवंतरावांनी यासाठी मुंबईस जाण्याचे मान्य केले.  परंतु एक दिवस अगोदर त्यांची प्रकृती फार बिघडली.  सकाळीच डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर दिवसभर पूर्णपणे झोपून दिवस काढला तर रात्रीपर्यंत प्रकृतीत फरक पडण्याची शक्यता बोलून दाखविली.  दुसर्‍या दिवशी मुंबईस जायचे किंवा नाही याचा निर्णय रात्री घेण्याचे ठरविले.  रात्री ८ च्या सुमारास मी साहेबांना भेटण्यास गेलो तेव्हा ते सोफ्यावर बसले होते.  ५-१० मिनिटांनंतर ते म्हणाले, ''खांडेकर तुमची हरकत नसेल तर मी झोपून बोलू का ?''  मला अर्थबोध झाला नाही.  माझ्या चेहर्‍याकडे पाहात साहेब म्हणाले की डॉक्टरांनी मला दिवसभर झापून राहण्याचा सल्ला दिला.  परंतु झोपून कंटाळा आला म्हणून मी उठून बसलो.  आता डॉक्टर यायची वेळ झाली आणि त्यांनी मला बसलेले पाहिले तर उद्या ते जाऊ देणार नाहीत, आणि झाले तसेच.  ५ मिनिटांत डॉक्टर आले.  प्रकृती तपासली.  अर्थात त्यांचे समाधान झाले नाही व दुसर्‍या दिवशी सकाळी परत तपासण्यास येत असल्याचे सांगितले.  डॉक्टरना सोडण्यास मी बाहेर आलो तेव्हा ते म्हणाल, काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  साहेबांनी जाऊ नये असाच सल्ला मी देणार आहे.  डॉक्टर गेल्यानंतर मी साहेबांना डॉक्टरांचे मत सांगितले.  साहेब म्हणाले, डॉक्टराला काय कळतं; उद्या माझा प्राण गेला तरी मी मुंबईस जाणार.  गेल्या महिनाभर माथाडी कामगारांनी खपून कार्यक्रम आखला आहे.  त्यांच्या भावना मी दुखवू इच्छीत नाही.  साहेब मुंबईस गेले आणि दिल्लीत आल्यानंतर ४-५ दिवस अंथरुणावर पडून राहिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org