यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-४

१९८४ च्या सुरुवातीस पुतण्या व नंतर सौ. वेणूताईंच्या निधनामुळे यशवंतरावजींचे सर्वच जीवन संपुष्टात आले.  थोड्याच दिवसांत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मृत्यूमुळे तर यशवंतरावांनी हाय खाल्ली.  सौ. वेणूताई गेल्यामुळे संसारात ते एकाकी पडले होते तर इंदिराजींच्या निधनामुळे राजकारणातील त्यांच्या तोलामोलाची व्यक्ती नाहीशी झाली.  यशवंतराव २३ ऑक्टोबरच्या सुमारास ५-६ दिवसांसाठी आपल्या मतदारसंघात जाणार होते.  कार्यक्रमही तयार झाला होता पण त्याच सुमारास इंदिराजींचे निधन झाल्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम रहीत केला.  ७-८ नोव्हेंबरच्या सुमारास मी त्यांना विचारले, ''साहेब, आपण आता मुंबईस केव्हा जाणार ?''  डोळ्यांत पाणी आणून ते म्हणाले, ''खांडेकर, खरं सांगू, मी आता दिल्लीत का राहतो हेच मला समजत नाही.  इंदिराजी आणि माझ्यात बरेच मतभेद होते हे खरे आहे, पण खाजगी जीवनात आम्हाला एकमेकांबद्दल नितांत आदर होता.  आता अशी व्यक्ती नाही की जिच्याजवळ जाऊन आपले सुखदुःख प्रेमाने, रागाने व्यक्त करता येईल.  नवीन पिढीच्या हातात नेतृत्व गेले आहे.  त्याला बाहेर राहून शुभेच्छा देण्यातच सर्वांचे हित आहे.''  अर्थात हे शब्द नियतीने आपल्या विचारांची त्यात भर घालून खरे केले.  कारण यशवंतराव त्यानंतर केवळ १०-१२ दिवसांतच जग सोडून गेले.  राजीवजींच्या पंतप्रधान म्हणून झालेल्या नियुक्तीची बातमी मी टेलिफोनने यशवंतरावांना दिली.  त्या वेळी ते म्हणाले, ''पक्षाने गेल्या काही वर्षात घेतलेल्या निर्णयात हा सर्वांत चांगला निर्णय घेतला आहे.''

एक गोष्ट मात्र खरी की यशवंतरावांनी राजकारण आणि खाजगी जीवन यात नेहमीच फारकत केली.  दोन्ही जीवनांतील विचारसरणी आणि मते नेहमीच वेगळी राहिली.  राजकारणातील मतभेदांना खाजगी जीवनात त्यांनी स्पर्श होऊ दिला नाही.  एवढेच नव्हे तर दुसर्‍यांनी पण ही विचारसरणी ठेवावी अशी त्यांची नितांत इच्छा होती.  त्यांनी कधीही दुसर्‍याचे वाईट चिंतिले नाही.  सर्वांना प्रेम व आदर दिला.  कोणतीही व्यक्ती गरीब आहे किंवा लहान आहे म्हणून तुटकतेने ते वागले नाहीत.  म्हणूनच सत्तेवर नसतानाही यशवंतरावांकडे विविध क्षेत्रांतील अनेक मंडळी येत राहिली.  मनमोकळ्या गप्पा मारीत राहिली.  विचारांची देवाणघेवाण चालू राहिली.  यात विरोधी पक्षातील लोक होते.  अनेक पत्रकार होते.  राजकारणी होते.  इंदिराजींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दलही त्यांना आदर होता.  इंदिराजीही त्यांना आदराने वागवत.  संयज गांधींच्या मृत्यूची बातमी यशवंतरावांना समजताच ते ताबडतोब इंदिराजींना भेटायला १ सफदरजंगवर गेले.  त्यांची गाडी बंगल्याच्या आवारात जाण्यास व इंदिराजींची बाहेर पडण्यास एकच गाठ पडली.  पण इंदिराजींचे लक्ष यशवंतरावांकडे गेले आणि त्यांनी ताबडतोब गाडी थांबवून यशवंतरावांची भेट घेतली व परत गाडीत जाऊन बसल्या.  पंतप्रधानांची गाडी एकदा चालू झाल्यानंतर थांबण्याच्या घटना फारच थोड्या असतात.  इंदिराजींच्या निधना अगोदर राजीवजींशी, काही काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळींची संघटनेबाबत चर्चा झाली होती.  दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात काही केंद्रीय मंत्र्यांना ताटकळत बाहेर बसावे लागले अशी बातमी वाचली.  सहज यशवंतरावांना विचारले तर ते म्हणाले माझ्या बाबतीत असे झाले नाही, सर्वांना माझ्याबाबत विशेष सूचना दिल्या असल्यामुळे मला गाडीतून उतरवून घेण्यापासून तो परत गाडीत बसेपर्यंत एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने जबाबदारी घेतली होती.  त्यामुळे माझा एक सेकंदरही व्यर्थ खर्च झाला नाही.  यशवंतरावही इंदिराजींच्या शब्दाला मान देत होते.  पंजाबमधील घटनेनंतर यशवंतरावांनी चंदीगडला जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे अशी इंदिराजींची इच्छा होती.  काँग्रेसश्रेष्ठींनी यशवंतरावांना सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला.  पण जेव्हा इंदिराजींनी सांगितले तेव्हा ते तयार झाले.  तिथून आल्यानंतर त्यांनी आपल्या भेटीचा वृत्तान्त स्पष्ट शब्दांत व काहीशा नाराजीने सांगितला.  इंदिराजी यशवंतरावांच्या भावना समजू शकत होत्या.  त्यानंतर व्हाईट पेपरबद्दल यशवंतरावांनी लोकसभेत बोलावे अशी इच्छा इंदिराजींनी व्यक्त केली.  यशवंतरावांनी ती मान्य केली ती एका अटीवर.  ती म्हणजे कोणत्याही सरकारी अधिकार्‍याने येऊन त्यांना ''ब्रीफिंग'' करावयाचे नाही किंवा काहीही सरकारी कागदपत्रे भाषणासाठी द्यावयाची नाहीत.  ही अट इंदिराजींनी मान्य केली.  परिणामस्वरूप यशवंतरावांचे व्हाईट पेपरवरील भाषण इतके अप्रतिम झाले की, पंतप्रधानांनी भाषण संपल्याबरोबर दोन ओळी प्रशंसेच्या लिहून त्या यशवंतरावांकडे पाठवून दिल्या.  यशवंतरावजींच्या आयुष्यातील पार्लमेंटमधील हे शेवटचेच भाषण ठरले.  

यशवंतरावजींनी या कालावधीत काही भाषणमालिकेतही भाग घेतला.  या निमित्ताने ते औरंगाबाद, नाशिक, नागपूर भागातही जाऊन आले.  नागपूरच्या विदर्भ साहित्य संघात बारलिंगे स्मृतीनिमित्त त्यांनी दिलेले शेवटचे भाषण होते.  विदर्भातील लोकांच्या औदार्याबद्दल, जिव्हाळ्याबद्दल व आदरातिथ्याबद्दल यशवंतरावांना माहीती होती, नव्हे त्यांनी अनुभव घेतला होता.  १९६२ साली विधान सभेचे पहिले अधिवेशन नागपूरला भरले असताना यशवंतरावांचा जवळपास दोन महिने मुक्काम नागपूरला होता.  त्यानंतर एवढे मोठे अधिवेशन अजूनपर्यंत तरी झाल्याचे आठवत नाही.  या मुक्कामात यशवंतराव विदर्भातील जनतेच्या फार जवळ आले.  आयुष्यातील शेवटच्या घटकेपर्यंत यशवंतराव विदर्भातील जनतेचे आदरातिथ्य विसरले नाहीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org