यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch 1-2

भाषा ही सामाजिक शक्ती आहे.  ती सामाजिक शक्ती आहे याचे कारण माणसाची माणुसकी भाषेतून निर्माण होते.  माणसाला सामाजिक प्राणी म्हणून भावनिक आणि बौद्धिक अलौकिक शक्ती भाषेने प्राप्‍त झालेली असते.  म्हणून माणुसकीची ती अधिष्ठान ठरते आणि म्हणूनच ती राजकीय शक्तीही बनते.  हा लढा वाढत गेला.  १०५ बळी या लढ्याने घेतले.  याचे कारण या लढ्याचा प्रतिकार मोरारजी देसाई यांच्या शासनाने कठोरपणे केला.  १९५६ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली.  त्यात महाराष्ट्र काँग्रेस पक्षात फूट पडली.  त्या वेळी मोरारजी देसाई यांनी माघार घेतली.  पक्षनेता या नात्याने यशवंतराव चव्हाण बहुमताने निवडून आले.  लगेच १ नोव्हेंबर १९५६ ला विशाल द्वैभाषिक मुंबई राज्य निर्माण झाले.  या द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुखमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली.  यशवंतरावांनी मुंबई राज्याची धुरा खांद्यावर घेतली.  हे मोठेच धाडस होते.  कारण महाराष्ट्र पेटला होता.  या धाडसाच्या पाठीमागे आत्मविश्वास होता.  तो आत्मविश्वास त्यांनी दूरदर्शित्वामुळे प्राप्‍त करून घेतला होता.  भाषिक राज्य होणे अपरिहार्य आहे हे त्यांनी मनोमनी जाणले होते, परंतु ही जाण पंडित नेहरूंसारख्या केंद्रीय सत्ताधार्‍यांमध्ये त्या वेळी आली नव्हती.  सत्तेची सूत्रे हातात घेतल्याबरोबर त्यांनी मुंबई राज्याच्या जनतेला व राजकीय पक्षोपक्षांच्या नेत्यांना आश्वासन दिले की, मी बंदुकीची गोळी न वापरता राज्य चालवणार आहे.  विरुद्ध मने सांधावी कशी आणि विरोधाला बगल कशी द्यावी यासंबंधी त्यांनी मनोमनी काही आडाखे बांधले होते आणि त्याप्रमाणे घडत गेले.  संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या बाहेर ते राहिल्यामुळे एक प्रकारची जनतेमध्ये अप्रियता निर्माण झाली होती, ती त्यांच्या मनाला डाचत होती.  काही कालपर्यंत ही जनतेची नाखुषी सोसली पाहिजे असे त्यांनी ठरवून राजकीय प्रपंचाचा कारभार चालविला.  महाराष्ट्र व गुजराथ या दोन्ही प्रदेशांमध्ये भाषिक राज्याची मागणी ज्वलंत स्वरूपात प्रभाव गाजवू लागली.  मधून मधून काँग्रेस पक्षाला पोट-निवडणुकांच्या मध्ये अपयशाचे तडाखे बसू लागले.  १९५७ साली प्रतापगडाला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उद्धाटन समारंभ प्रचंड उत्साहाने साजरा झाला.  पंडित नेहरू उद्धाटनास आले तेव्हा वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या ३० मैलांच्या मार्गावर संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे मोर्चे ललकारत उभे राहिले होते.  पंडित नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राच्या, भाषिक राज्याच्या मागणीची तीव्रता आणि प्रखरता प्रत्यक्ष नेत्रांनी पाहावयास मिळाली आणि हळूहळू केंद्रीय नेतृत्वाला भाषिक राज्याची गरज पटवण्याची परिस्थिती निर्माण होत गेली.  महाराष्ट्र व गुजरातमध्ये यापुढे सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष पराभूत होणार, याची लक्षणे दिसू लागली.  यशवंतरावांनी ही परिस्थिती अगोदरच हेरली होती.  पंडित नेहरूंना आपले धोरण बदलणे भाग पडले आणि परिणामतः १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.  महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक अभूतपूर्व घटना झाली आणि या घटनेच्या पाठीशी असलेल्या शक्तींचा अर्थ अलिप्‍तपणे केल्यास हे लक्षात येते की, दे. भ. शंकरराव देव, एस.एम.जोशी, भाऊसाहेब हिरे इत्यादिकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या भाषिक राज्याची निर्मिती करणारी जशी चळवळ होती त्याबरोबर यशवंतरावांसारखे दूरदर्शी नेतृत्व होते, हे नाकारून चालणार नाही.  हे यशवंतरावांचे राजकीय दूरदर्शित्व म्हणजे मुत्सद्दीपण भारताच्या संसदीय लोकशाहीला मान्य झाले आणि पंडित नेहरूंच्या विश्वासातले संरक्षणमंत्री कृष्ण मेनन ह्यांना पदत्याग करावा लागून त्या स्थानी यशवंतराव चव्हाणांना बोलावून घ्यावे लागले.  यात यशवंतरावांच्या असाधारण संपन्न व्यक्तिमत्त्वाचे प्रत्यंतर मिळते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org