यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ६-१

पहिल्या मुंबई राज्य विधानसभेपासून तो जीवनाच्या अखेरपर्यंत आपल्या मतदारांचा सत्त पाठिंबा मिळविण्याचा विक्रम यशवंतरावांनी केला.  संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्ष काळात, आणीबाणीच्या आसपासच्या समयी उलटसुलअ लाटांच्या प्रवाहांवर ते सहजतया स्वार झाले.  लोकानुनय नव्हे पण जन-संपर्काची कला त्यांना अत्यंत उत्तम रीत्या अवगत झालेली होती.  एक परिचित, पत्रकार व वस्तुनिष्ठ अभ्यासक म्हणून जेव्हा मी त्यांच्या कारकीर्दीचे विश्लेषण करतो, तेव्हा मला तरी सर्वात मोठा गुण हाच वाटतो.  मला हे सुद्धा माहीत आहे की, ते १९६०-६१ नंतरच जास्त मनमिळाऊ झाले, आणीबाणीनंतर अधिक परिपक्व व अखेरच्या काळात लोण्यासारखे मऊ नि सागरासारखे शांत-गंभीर.  शोकांतिकांमागून शोकांतिकांचा सामना केला त्यांनी.  कबूल करतो की त्यांच्यात दैदीप्यमान असे काही आळले नाही.  परंतु प्रभावी, ॠजू, विवेकशील अशा छटा बघावयास मिळाल्या.  विरोधकांशीसुद्धा सलोखा.   निकराचे, हिरीरीचे, आत्यंतिक असे काही नाही.  हा दुर्मिळ गुण नव्हे काय ?  किमानपक्षी कटुतेच्या काळात ?

साहेब 'धोरणी' होते, परंतु विचार करूनसुद्धा त्यांच्या आर्थिक धोरणाची साचेबंद सूत्रे मला गावसली नाहीत हे मान्य.  मानवेंद्र रॉय अन् जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा मागोवा घेत परिस्थितीनुसार पावले टाकणे हे सामान्य तत्त्व; म्हणजे तत्त्वावडंबर नव्हे तर तथ्य व कार्यसिद्धीवर अधिक भर.  चौगुले उद्योगसमूहात सामील झाल्यापासून सतत वीस वर्षे त्यांच्याशी अनेकदा आर्थिक विषयांवर बोललो.  कामगार कार्यकर्त्यांपासून तो देशांतील प्रमुख उद्योगपतीपर्यंत सर्वांशी त्यांचे व्यक्तिगत स्नेहसंबंध होते.  महाराष्ट्र-मराठा-गोवा चेंबरची वार्षिक संमेलने बर्‍याचदा त्यांच्या निवासस्थानी भरविली.  गप्पा-गोष्टी हास्य-विनोद झाले. पण सूत्रवजा काही लागले नाही.  यालासुद्धा वैशिष्ट्य म्हणता येईल का ?  समन्वयवादी, संयत, ऍटलीसमान नेतृत्वाचा व्यक्तिविशेष हाच तर नव्हे ?  त्याशिवाय प्रथम मोरारजी, नंतर नेहरू, त्यानंतर शास्त्री-इंदिरा-चरणसिंग यांच्यासारख्या अतिभिन्न व्यक्तिमत्त्वाच्या, निश्चित नीति-दिशा असलेल्या वा नसलेल्या नेत्यांबरोबर चव्हाणसाहेबांना काम करता आले नसते.  त्यांच्या मध्यममार्गी, सुसंवादी वृत्तीला 'कुंपण-नीती' म्हणून हिणवले गेले.  'स्वगृही' परतण्याची ''संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ'' घोषणेप्रमाणेच टिंगल झाली.  इतिहासात मात्र नोंद असेल की, संयुक्त महाराष्ट्र स्थापनेत नि महाराष्ट्राचा पहिला यशस्वी मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी अपूर्व कार्य केले.  घटना क्रमांच्या वरवरच्या दर्शनाने मते बनविणे विचारवंतांना शोभत नाही.  नृपनीती जर वारांगनेप्रमाणे असेल तर जन-रीतसुद्धा काही कमी चवचाल नसते.  सुरुवातीला शास्त्रीजींना हसणार्‍यांनी १९६५ मध्ये पाकिस्तावरवर विजय मिळविताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.  'गुंगी गुडिया' इंदिराजी दुर्गा बनल्या.  आज पायलट देशाचा तडफदार युवा नेता ठरला आहे.  यशवंतरावांच्या राजकीय जीवनाबद्दल असेच घडले असते.  कुणी सांगावे, आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या समन्वयवादी व जबाबदार धोरणाचे अधिक सुपरिणाम दिसले असते. फायनान्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून केन्द्र व राज्यांमधील आर्थिक तणाव कमी करण्यासाठी त्यांनी कित्येक शिफारसी केल्या.  त्यानंतर नव्या जबाबदार्‍या येण्याची चाहूल लागली हाती.  पण मृत्यूने अकस्मात झडप घातली.  बरीचशी रहस्ये त्यांच्याबरोबरच लुप्‍त झाली.  समोर उभी राहते ती स्मित हास्य करणारी स्नेहमूर्ती; काही समज अन् काही गैरसमजांचा वसा घेऊन.  वाटते, देश तणावांनी होरपळून समन्वयी साहेबांमागे आला असता.  

मागे वळून पाहता मतभेदाचे क्वचित प्रसंग आठवतात; नाही असे नाही.  मी 'कर्तव्यात' गेलो, समाजवादी पक्षाबद्दल सहानुभूती ठेवून होतो, (अखेर अखेर जनता पक्ष) 'महाराष्ट्र टाईम्स'च्या संपादकपदाबाबत ठिणगी उडाली, 'नवशक्ति' पत्राने संयुक्त महाराष्ट्र प्रकरणी त्यांच्यावर जे टीकाप्रहार केले त्यामुळे थोडी शब्दाशब्दी झाली.  ते सारे आज आठवते.  पण प्रेम कायम होते.  चौगुले कंपनीच्या कोकण जहाज सेवेमुळे तर क्वचित ''चकमक'च होई, साहेबांच्या प्रेरणेने, गोबा-मुक्तीनंतर चौगुले उद्योगसमूहाने ती सेवा सुरू केली.  त्या सेवेचा नि साहेबांचा तसा तिढा पडला की, दैवयोगाची गंमत वाटते.  १९६५ साली पहिले जहाज युगोस्लाव्हियाहून आले.  मुंबईहून उद्धाटन फेरी ठरली.  निमंत्रणे गेली.  साहेब उद्धाटक.  सांताक्रूझ विमानतळावर घ्यावयास गेलो.  विमानतळावरच बिनतारी संदेश मिळाला, ''पंतप्रधानांनी ताबडतोब दिल्लीला बोलावले आहे.''  समारंभ श्री. बाळासाहेब देसाईंच्या हस्ते पार पाडावा लागला. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org