यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ३-१

यशवंतरावजींच्या लहानपणीच्या काळातली एक गोष्ट सांगितली जाते.  यशवंतरावजी शाळेमध्ये शिकत होते.  टिळक हायस्कूलमध्ये शिकत होते.  त्या वेळी कोणी तरी पाहणी करणारे अधिकारी वा शिक्षक किंवा वरिष्ठ माणूस वर्गात आला असता त्यांनी यशवंतरावजींना विचारले की, तू कोण होणार ?  वास्तविक पाहता त्या वेळी ते सातवीपर्यंतचे शिक्षण संपवून नुकतेच इंग्रजी शाळेत हायस्कूलमध्ये गेले होते.  त्यांनी सांगितले की, ''मी यशवंतराव चव्हाण होणार.''  इतक्या लहान वयात मी यशवंतराव चव्हाण होणार ही आत्मविश्वासाची गोष्ट त्यांनी बोलून दाखविली.

यशवंतरावजींच्या बाबतीत असे सांगता येईल की, एखादी गोष्ट त्यांच्या मनाला पटली नसेल व नाइलाजाने करावी लागली तर ते बचैन होत असत.  हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांचा पुतळा उभारून हुतात्मा स्मारक उभे करावयाचे होते व तो कार्यक्रम ठरला होता.  त्या वेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  परंतु त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण नव्हते. अर्धा तास अगोदर एकदम यशवंतरावजी उठले व कपडे करून तयार झाले.  कुठे जावयाचे काही कार्यक्रम ठरला नव्हता.  कोणाच्या काही लक्षात येईना की, साहेब कुठे चालले.  त्यांनी गाडी बाहेर काढली व ड्रायव्हरला सांगितले की, हुतात्मा चौकामध्ये चला व ते हुतात्मा चौकामध्ये पोहोचून गेले.  लोकांमध्ये राहण्याची त्यांना हौस असे.  लोकांपासून बाहेर जावयाचे, दूर राहावयाचे, त्यांची पर्वा करावयाची नाही असे त्यांना कधी वाटले नाही.  सत्तेवर आल्यानंतर आपल्याला वाटेल ते करावयाचे वा कसेही चालावयाचे असे त्यांनी कधी कोठे केले नाही.  संयुक्त महाराष्ट्र झाला त्या वेळी एक वाद निर्माण झाला.  त्या वेळी ''हे राज्य कुणाचे.  मराठ्यांचे की मराठीचे''  असा तो वाद होता.  सांगलीमध्ये सभा होती.  त्या वेळी यशवंतरावजी उभे राहिल व स्पष्टपणे, खंबीरपणे सांगितले की, हे राज्य मराठ्यांचे नाही, हे राज्य मराठीचे आहे.  त्या वेळी हा वाद श्री. माडखोलकरांनी निर्माण केला होता.  एखादा वाद निर्माण केला गेला तर तो लवकर थांबवावयाचा, तोडावयाचा व त्या वाढलेल्या वादातून पुन्हा नवे काही प्रश्न निर्माण होता कामा नयेत असे पाहावयाचे असा त्यांचा दृष्टिकोण होता.  आम्ही सर्व प्रांतांतील लोक एकत्र आलो.  त्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सर्व प्रांतांतील लोक होते.  तेव्हा कोठलीही गोष्ट पाहावयाची झाली तर तिच्याकडे माणुसकीच्या दृष्टिकोणातून पाहिले जात असे.  काही लोकांना बरोबर घेताना दुसर्‍यांना दुखविणार नाहीत, ते अपमानित होणार नाहीत, कुठे तरी त्यांच्या मनाला लागेल अशी गोष्ट घडणार नाही अशी, बारीक पद्धतीने ते प्रत्येक वेळी पाहणी करीत असत, बघत असत.  एकदा आम्ही शिबिराच्या निमित्ताने महाबळेश्वरला जमलो होतो.  यशवंतरावजी नवा विचार आम्हाला देत असत.  ते एकदा बोलू लागले की, एकेक घंटा, दोन घंटे बोलत असत.  कोणताही प्रश्न ते अशा पद्धतीने मांडत असत की, त्यामुळे एक वेगळेच आकर्षण निर्माण होत असे.  त्या वेळी महाबळेश्वर येथे त्यांनी ऍग्रोइंडस्ट्रीजचा विचार मांडला.  त्यापूर्वी आम्ह कुठे तरी सॉ-मिल चालविणे म्हणजे ऍग्रोइंडस्ट्रीज सुरू करणे या विचारात होतो.  परंतु शेतमालावर आधारित असे कारखाने काढले पाहिजेत, त्यासाठी भांडवल उभे केले पाहिजे अशी कल्पना आमच्या मनात यापूर्वी आली नाही.  आम्हाला त्यांनी ती सांगितली व अनेक लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ती रुजली.  सुरुवातीला त्यांनी जेव्हा ही कल्पना मांडली त्या वेळी एक प्रकारच्या हवेत आम्ही तरंगत होतो.  त्यासाठी किती त्याग करावा लागेल हे आम्हाला कळले नव्हते.  त्याची जाणीव यशवंतरावांनी करून दिली.  आज महाराष्ट्रामध्ये जी ऍग्रो-इंडस्ट्रीज दिसत आहे ती यशवंतरावजींच्या एका स्वप्नातून निर्माण झालेली आहे.  नवेनवे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत व त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, लोकांना जबाबदारीने काम करता येईल या दृष्टीने त्यांचे शिक्षण झाले पाहिजे असे त्यांना वाटत असे.  त्यामधून पंचायत राज्याची कल्पना पुढे आली.  ती प्रथम महाराष्ट्रामध्ये अंमलात आणली.  महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आज जी शेकडो माणसे दिसतात ती यामुळेच.  जर पंचायत राज्य निर्माण झाले नसते तर जिल्हा परिषदा निर्माण झाल्या नसत्या.  पंचायत समित्या निर्माण झाल्या नसत्या.  त्या संस्था चालविणारी शेकडो माणसे आपल्याला दिसली नसती.  आपले हे राज्य चालविण्यासाठी कोणी सुशिक्षित माणूस आहे का ते पाहण्याचा प्रयत्‍न करावा लागला असता.  यशवंतरावजींनी ही गोष्ट केली व तिचा परिणाम चांगला झाला.  आज सार्वजनिक जीवनात जे चैतन्य दिसत आहे ते त्यामुळेच निर्माण झाले आहे.  यशवंतरावजी मुख्यमंत्री झाले पण अभिमानाने, गर्वाने ते कधी वागले नाहीत.  त्यांच्याकडे कोणीही यावे, भटावे, चर्चा करावी, सांगावे.  नवनवी पुस्तके वाचण्याचा छंद त्यांना होता.  त्यातून सारखे ज्ञान शोधत.  त्यांच्या पाठीमागे काय आहे असे पाहावयाचे ठरविले तर सदैव पुस्तकांचे गठ्ठे आपणास दिसतील.  नवनवे वाचायचे त्यांना वेड होते.  पैसे हातामध्ये आले की, १०-१२ नवी पुस्तके आणीत व वाचून काढीत असा त्यांचा स्वभाव.  मिरजेला पूर्वीपासून एक राजे होते, त्यांना वाचनाचा छंद होता.  त्यांनी एकदा यशवंतरावजींना चहाला बोलाविले.  आपण किती पुस्तके वाचतो हे त्यांना दाखवायचे होते.  तेव्हा ते त्यांच्याशी बोलत बसले व मी हे नवे पुस्तक वाचले, ते नवे पुस्तक वाचले असे यशवंतरावांना सांगू लागले, परंतु त्यांच्याशी जेव्हा यशवंतराव चर्चा करू लागले तेव्हा त्यांना कळून चुकले की, या माणसाला आपल्यापेक्षा काही कमी ज्ञान नाही, वाचनाची अधिकच आवड आहे.

(महाराष्ट्र विधान परिषदेत मार्च १९८५ मध्ये शोक प्रस्ताव मांडताना केलेल्या भाषणावरून संकलित)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org