यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- भारतसेवक महाराष्ट्र

भारतसेवक महाराष्ट्र - यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राची सेवा करण्यात मी रंगून गेलो असतानाच मला दिल्लीचे बोलावणे आले.  तसा असंख्य वेळा मी दिल्लीला आलो असेन.  दिल्ली काही मला अनोळखी नव्हती.  पण कुठल्याही गावचा होणे ही एक वेगळीच भावना आहे.  महाराष्ट्रात असताना मी त्याच्या आशा-आकांक्षांशी समरस झालो होतो.  त्याच्या राग-लोभाचा मी अनुभव घेत होतो.  स्वतःच्या मनातील काही निश्चित ध्येयवादानुसार महाराष्ट्राची घडण व्हावी या भावनेने नवे नवे बेत रचीत होतो.  तसे करतानाही भारतीय जीवनाचा, भारतीय दृष्टीचा विसर पडला नव्हता.  किंबहुना असा दृष्टिकोण स्वीकारल्यामुळे थोडीशी नाराजीही निर्माण केली होती.

पण मी आता येथे आलो आहे.  भारताच्या भवितव्याशी अत्यंत निगडित असलेल्या अशा प्रश्नांची उकल चालू असताना मी येथे आलो आहे.  राजकारणाचे सगळे रंग दिसत आहेत.  विविध वर्तुळांत वावरणारी दिल्ली ही तशी मोठी उद्‍बोधक नगरी आहे.  इथल्या प्रशस्त आणि आलिशान इमारतींकडे पाहताना किंवा येथे वावरणार्‍या विविध भाषिकांच्या हालचाली पाहतानाही अनेकदा महाराष्ट्रासंबंधीचे विचार मनात येत असतात.  या विचारांची गर्दी झाली की मी कोठेतरी ते बोलतो.  तसे केले म्हणजे मोकळे वाटते.  शेवटी माणसाच्या व्यक्तित्त्वात त्याच्या विचारांनाही महत्त्व आहेच.  महाराष्ट्राशी माझे नाते कृत्रिम नाही.  म्हणून त्याच्यापुढे प्रकट चिंतन करणे मला आवडते.  ही देवाण-घेवाण आहे.  उपदेशाचा आव नाही.  तसा त्यात खोटा विनय नाही आणि खोटी अदबही  नाही.  

मी आता महाराष्ट्राबाहेर हिंडतो.  अन्य भाषिकांत वावरतो.  हिमालयात जातो.  पूर्वेच्या आसामच्या टेकड्या पाहतो.  सारा देश हिंडत असताना भारताच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.  पण त्याच वेळी न कळत महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार मनात येतो.  भारताच्या प्रश्नांचा विचार करीत असताना महाराष्ट्राच्या प्रश्नांची पार्श्वभूमी नेहमीच डोळ्यांपुढे येते.

माझा अनुभव असा आहे की, महाराष्ट्राबद्दल खूप अपेक्षा बाहेरच्या लोकांत आहेत.  या अपेक्षा आपण पुर्‍या करू का असे अनेकदा मनात येते.  महाराष्ट्राबद्दल या अपेक्षा का निर्माण झाल्या ?  याचे कारण असे की, महाराष्ट्राने या राष्ट्राच्या जीवनसंग्रामात अत्यंत हिरीरीने भाग घेतला आहे.  इतिहासकालात आणि अगदी अलीकडच्या काळातही महाराष्ट्राने राष्ट्रीय जीवनातील उदात्त ध्येयवादासाठी तादात्म्यतेने प्रयत्‍नांची शर्थ केली.  पराक्रम केला.  त्याग केला.  शिवाजी, टिळक, रानडे, गोखले, फुले-आंबेडकर ही त्यांची प्रतीके.  मी परवा बिहारमध्ये गेलो होतो.  तेव्हा अगदी घरच्या माणसाची चौकशी करावी तशी टिळकांची आठवण लोकांनी काढली.  हाच अनुभव सर्वत्र येतो.  उत्कट देशभक्ती म्हणजे महाराष्ट्र असे जणू समीकरण त्यांच्या मनात असते.  अशा विविध भावना भारतीयांच्या मनात आपल्याविषयी आहेत.

या ठिकाणी पं. नेहरूंची आठवण सांगण्यासारखी आहे.  प्रतापगडाच्या निदर्शनांच्या वेळची ही गोष्ट आहे.  महाराष्ट्राच्या रागाचे नि अनुरागाचे ते प्रदर्शन होते.  कारण जशी उग्र, शिस्तबद्ध प्रदर्शने त्या वेळी झाली तसा प्रतापगडच्या डोंगर-कपारीत भरलेल्या नेहरूंच्या दर्शनार्थ जमलेल्या हजारो लोकांचा प्रचंड मेळावाही त्या वेळी झाला होता.  तो कार्यक्रम आटपून आम्ही परत येत होतो.  निदर्शक परतत होते.  कोणी सायकलीवर, कोणी पायी.  नेहरूंची मोटार पाहिली की निदर्शक पुन्हा घोषणा करीत.  नेहरू हसतमुखाने त्यांच्याकडे पाहून हात हालवीत.  असे हे २० मैल चालू होते.  न कळत पंडितजींच्या मनात महाराष्ट्र जनतेसंबंधी विचार येत होते.  थोडेसे विचारमग्न असताना एकदम ते मला म्हणाले, ''मी विचार करतो आहे तुमच्या लोकांबद्दल.  पंजाबी लोकही रागावतात.  पण ते रागावले तरी एकदम थंडही होतात.  मराठी लोकांचे तसे नाही.  ते लवकर रागावत नाहीत-पण एकदा रागावले की लवकर शांत होत नाहीत.''  मीही म्हटले ''खरे आहे''.  लगेच मला आठवण झाली लोकमान्यांची.  या महापुरुषाने असंतोषाची लाट भारतात पसरविली आणि साम्राज्यशाहीला धक्के दिले.  ती महाराष्ट्रात जन्मली याचे कारण हेच असावे.  अशा या इतिहासातील अनेक घटनांनी हे अनुकूल पूर्वग्रह निर्माण होतात.  बाहेरच्या लोकांच्या अपेक्षा वाढतात.  

सर्वत्र पूर्वग्रह अनुकूल असतात असेही नाही.  प्रतिकूलही असतात.  पण मला वाटते की, महाराष्ट्राने प्रतिकूल पूर्वग्रहांचा विचार अवश्य करावा.  ते काढून कसे टाकता येतील यासाठी पद्धतशीर प्रयत्‍न करीत राहावे.  पण त्यामुळे गोंधळून जाऊ नये.  केवळ त्यांचाच विचार करून मनातल्या मनात कुढत बसू नये.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org