यशवंतराव चव्हाण (98)

:   १३   :

मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना विश्वासात न घेता पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. कांही मोजक्या निकटवर्तीयांखेरीज बाकीच्यांना अंधारात ठेवले. यशवंतराव परदेश दौर्‍यावर होते. आणीबाणी जाहीर झाली आणि त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मंत्रिमंडळाची बैठक बोलावून, मंत्र्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेण्याऐवजी इंदिरा गांधींनी स्वतःच्याच मताने निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी वटहुकुमाद्वारे केली, याचा विस्मय वांटल्यावाचून राहिला नाही. आणीबाणीमुळे विरोधी राजकीय पक्षांची कोंडी झाली, त्याचबरोबर आम जनतेचीही विविध प्रकारे अडवणूक झाली. वृत्तपत्रांवर जाचक निर्बंध लादण्यात येऊन विचार-आचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्यात आली. विरोधी नेत्यांना अटक करणे, तुरुंगात डांबणे आदि प्रकार सर्रास सुरू झाले. लोकशाहीचा संकोच करण्यात आला. आणीबाणीच्या निर्णयाबद्दल यशवंतराव मनातून खट्टू झाले हे खरे. तथापि त्याबद्दल त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही की विरोध दर्शविला नाही. त्यांनी मुग्धता पाळली. ''मी ठरवीन ती पूर्वदिशा'' या पद्धतीने इंदिराजींनी कारभार सुरू ठेवला. दिल्लीत एकाधिकारशाही सुरू झाली होती. इंदिरा पुत्र संजय गांधी आणि त्यांचे पित्ते यांनी दिल्लीत धुमाकूळ सुरू केला होता. जुलूम-जबरदस्तीचा मार्ग अवलंबून ''संजय ब्रिगेड'' वाटेल ते करू लागली होती. इंदिराजी या संजयला आवरू शकत नव्हत्या. इंदिराजींच्या कांही पित्त्यांनी बाईची स्तुती करण्याकरिता आणीबाणीला ''अनुशासन पर्व'' संबोधून भलामण सुरू केली. कांही राज्यांत कुटुंबनियोजनाबाबत जबरदस्ती करण्यात आली. संजयच्या उपद्रवाबद्दल मंत्रिमंडळातील कित्येक मंत्री नाराज-नाखूष होते, तथापि ते प्रतिबंधात्मक हालचाल करू शकत नव्हते. मोहन धारिया यांनी मात्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन कांही काळ खळबळ उडवून दिली. तथापि त्याचा श्रीमतीजींवर काडीचाही परिणाम झाला नाही.

यशवंतराव हे द्विधा मनःस्थितीत होते. सत्तेवर रहायचे आणि जनतेतही रहायचे अशी स्वतःशी कसरत करीत होते. ''रागाने मोडता येते पण जोडता येत नाही, राष्ट्रीय कार्यात स्वतःचे व्यक्तिमत्त्व विसरायला हवे'' असे ते स्नेह्यांना व सहकार्‍यांना बोलून दाखवायचे. काँग्रेसची स्थिती आणीबाणीमुळे दयनीय झाली होती. विरोधी पक्ष प्रबळ होऊ लागले होते. आणीबाणी लवकर उठवावी किंवा संपवावी असे यशवंतरावांरा मनोमनी वाटायचे. श्रीमती गांधींची एके दिवशी भेट घेऊन यशवंतरावांनी त्यांना एकूण परिस्थितीची कल्पना दिली. राजकीय कैद्यांची त्वरित मुक्तता करावी असेही सुचविले. लोकशाहीची प्रतिष्ठा राखायची असेल तर आणीबाणी लवकर संपवून नव्याने निवडणुका घ्याव्या असेही आग्रहपूर्वक सांगितले. आणीबाणीतील अन्यायावर, गैरप्रकारांवर, जुलूमांवर वृत्तपत्रातून रोज टीका होत होती. विचारवंतही विरोध प्रगट करू लागले होते. परराष्ट्र मंत्री या नात्याने यशवंतराव परदेशात बुखारेस्टला गेले असताना त्यांना पंतप्रधान इंदिराजींनी पाठविलेला निरोप मिळाला. तो दिवस १८ जानेवारी, १९७७ चा होता. निवडणुका घेतल्या तर आणीबाणीच्या वातावरणातून देश मुक्त होईल हा आपला विचार श्रीमती गांधींना पटला याचा यशवंतरावांना आनंद वाटला. पंतप्रधानांच्या संदेशात म्हटले होते की, ''जो महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा होता तो मी उद्यां घेणार आहे. तुम्ही परदेशी जाण्यापूर्वी तुमच्याशी बोलणार होते, तथापि तुम्ही आणि मी कामाच्या गर्दीत होतो, बोलणे राहून गेले. रेडिओवरून तुम्हाला निर्णय कळण्यापूर्वी अगोदर कानी पडावा म्हणून मुद्दाम फोनने कळवित आहे. विदेशातील कार्यक्रम संपण्यापूर्वी तुम्हाला भारतात परत येता आले तर जरूर प्रयत्‍न करावा.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org