यशवंतराव चव्हाण (96)

मुंबई, मद्रास, कलकत्ता दिल्ली या महानगरातील जागांवरही काँग्रेसने यश संपादन केले. संघटना काँग्रेसला अवघ्या १८ जागा मिळाल्या. त्यांची मतदानाची टक्केवारी १०.५ टक्के एवढ होती. स्वतंत्र पक्षाची ४४ वरून ८ तर संयुक्त समाजवाद्यांची २३ वरून ३ वर घसरगुंडी झाली. प्रजासमाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या. जनसंघाची अशची घसरगुंडी झाली. मतदारांनी उजव्या प्रतिगाम्यांना अक्षरशः झिडकारले आणि काँग्रेसला प्रचेंड बहुमताने सत्तेवर आरूढ केले. मार्क्सिस्ट कम्युनिस्टांनी मात्र २५ जागा मिळवून दुसरा नंबर पटकावला. त्यांची सभासद संख्या गेल्या खेपेपेक्षा ६ जागांनी वाढली. लोकसभेत संघटना काँग्रेस पहिल्याऐवजी पांचव्या स्थानावर गेली आणि मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पांचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर आले. महाराष्ट्रात तर काँग्रेस पक्षाने कमालच केली. एकूण ४४ जागांपैकी ४३ जागा जिंकून महाराष्ट्र काँग्रेसच्या आणि यशवंतराव चव्हाणांच्या शक्तीचा प्रत्यय आणून दिला. यशवंतराव चव्हाण हे सातारा मतदारसंघातून १ लक्ष ७१ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. सगळे पाटील व देशमुख प्रचंड मतांनी निवडून आले. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेसला आव्हान दिले होते. यशवंतरावांची मुंबईतील प्रचारसभा उधळून लावण्याची भाषा शिवसेनेने वापरली होती. ''शिवसेना झिंदाबाद यशवंतराव चव्हाण मुर्दाबाद'' असे फलक जागजागी लावले होते. यशवंतराव प्रचार सभेसाठी दिल्लीहून विमानाने मुंबईला आले आणि त्यांनी दादर चौपाटीवर सभा घेतली. सभेला अडीच-तीन लाखांहून अधिक श्रोते उपस्थित होते. सभेतील बहिष्काराचे शिवसेनेचे आवाहन मुंबईकरांनी फेटाळून सभेला ते हजर राहिले.

निवडणुकीतील काँग्रेसच्या नेत्रदीपक यशाबद्दल पत्रकारांशी बोलताना यशवंतराव म्हणाले, ''निवडणुका जिंकण्यासाठी पुढील दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. महत्त्वाचा राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय नेता. या दोन्ही गोष्टी काँग्रेसजवळ होत्या. काँग्रेसच्या सामाजिक-आर्थिक कार्यक्रमावर आणि इंदिराजींच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेऊन मतदान केले. केंद्रात स्थिर सरकार हवे होते. संमिश्र मंत्रिमंडळाचा कारभार कसा भोंगळ चालतो याचा अनुभव लोकांनी कांही राज्यात घेतलेला होता. गरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्य, मुस्लीम, ख्रिश्चन या सर्वांनी काँग्रेसला भरभरून मते दिली होती. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसविरोधी मतदान झाले आणि जनसंघाला काही राज्यांत बर्‍यापैकी जागा मिळाल्या. या ठिकाणी काँग्रेसने गेल्या दहा-पंधरा वर्षात विधायक दृष्टीने कांहीच कामकाज केलेले नव्हते. १९७१ च्या निवडणुकीत काँग्रेसवर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.''  इंदिरा गांधींचे कौतुक भारतीय वृत्तपत्रांनी तोंड भरून केले. त्याचबरोबर रशियाच्या 'टास' वृत्तसंस्थेने, 'न्यूयॉर्क टाईम्स'नेही. कांही देशी आणि परदेशी वृत्तपत्रांनी असे चित्र रंगवले होते की भारतात राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन लोकशाही धोक्यात येण्याची, देशाचे तुकडे होण्याची भिती वाटते. त्यांची भीती खोटी ठरली आणि सबंध आग्नेय आशिया खंडात भारत हाच एक देश असा आहे की जेथे स्थिर सरकार अधिकारारूढ आहे याची ग्वाही जगाला द्यावी लागली. एका परदेशी पत्रकाराने यशवंतरावांना विचारले, 'काय हो, निवडणुकीपूर्वी तुम्ही जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करणार कां ?''  त्यावर यशवंतरावांनी उत्तर दिले, ''मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आमचा निष्ठापूर्वक प्रयत्‍न राहील. आम्ही आमची अभिवचने विसरणार नाही. किंमती स्थिर करणे आणि बेकारी निवारण करणे हे दोन महत्त्वाचे आणि तांतडीचे प्रश्न आहेत. गरिबी हटविण्यासाठी आम्ही पावले उचलायला सुरुवात केली आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करायलाच हवी. जनतेत नैराश्य निर्माण होता कामा नये याची दक्षता घेऊ. दिलेल्या वचनांपासून दूर पळणार नाही. जटिल प्रश्न सोडविण्याचे आटोकाट प्रयत्‍न करू.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org