यशवंतराव चव्हाण (91)

यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांनी तडजोडीसाठी अखेरचा प्रयत्‍न करून पाहिला. नाईकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानातून स. का. पाटील यांना फोन केला. तडजोडीची विनंती केली. अनुकूल प्रतिसाद मिळू शकला नाही. नोव्हेंबर १२ रोजी एक वाजून पांच मिनिटांनी निजलिंगप्पांच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. याच क्षणी नेहरू-गांधींच्या काँग्रेसचे दोन तुकडे झाले. परिणामतः दोन कार्यकारिणी, दोन आम सभा, दोन प्रदेश काँग्रेस कमिट्या, दोन जिल्हा काँग्रेस कमिट्या असे दृष्य दिसू लागले. दुसर्‍या दिवशी संसदीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत इंदिराजींचे अपूर्व स्वागत करण्यात आले. अभिनंदनाचा ठराव मांडताना यशवंतराव चव्हाणांनी, इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करून त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी ही नियमबाह्य आणि असमर्थनीय असल्याचे स्पष्ट केले. आम्ही इंदिराजींच्याच पाठीशी उभे राहू. कारण आमचीच काँग्रेस खरी आहे असा आमचा दावा आहे. सभासदांनी चव्हाणांच्या भाषणाला प्रचंड टाळ्या वाजवून दाद दिली. चव्हाणांनी तडजोडीचे सारे प्रयत्‍न व्यर्थ करणार्‍या निजलिंगप्पांच्या माथी पक्ष फुटीच्या दोषाचे खापर फोडले. निजलिंगप्पांच्या समर्थक खासदारांनी आपली बैठक बोलावून डॉ. रामसुभगसिंग यांची नेतेपदी निवड केली.

दिल्लीत २२ नोव्हेंबरला भरलेल्या रिक्विझिशन बैठकीत पंतप्रधान इंदिरा गांधींना पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे ४०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. श्रीमती गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दोन वेगवेगळे दृष्टिकोन, दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती यामधील झगड्याचे पर्यवसान काँग्रेसचे दोन भाग होण्यात झाले. निजलिंगप्पा यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि सी. सुब्रह्मण्यम यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेसमध्ये आणि संसदीय काँग्रेस पक्षात आपले बहुमत आहे हे श्रीमती गांधींनी सिद्ध करून दाखविले. काँग्रेस (एस.) आणि काँग्रेस (ओ) असे दोन तट पडले. प्रदेश काँग्रेस कमिट्या, जिल्हा काँग्रेस कमिट्या आपापल्या ताब्यात ठेवण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. निजलिंगप्पांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने अहमदाबादेत भरविलेल्या अधिवेशनाला चांगली उपस्थिती होती. तथापि तळागाळातील काँग्रेसजन इंदिराजींच्या मागे आहेत हे मुंबई काँग्रेस अधिवेश्नानंतर दिसून आले. यशवंतरावांना मुंबईतील बैठकीत विचारता ते म्हणाले, ''संघटना काँग्रेसचे नेते प्रतिगामी वृत्तीचे असून लोकांचा त्यांना फारसा पाठिंबा नाही. त्यांच्यातील कामराज हे एकटे पुरोगामी विचारांचे आहेत. सामाजिक-आर्थिक बदलास ते चर्चेच्या वेळी अनुकूलता दर्शवितात. तथापि सिंडिकेट नेत्यात मिसळले की बदलतात. निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होईल की लोक कुणाच्या पाठीशी आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org