यशवंतराव चव्हाण (9)

महराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीमागे महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा होती.  केशवराव विचारे यांच्यासारखे कार्यकर्ते सत्यशोधक विचाराचा प्रसार मोठ्या तळमळीने करीत होते.  १९२२-२३ पर्यंत लोक या चळवळीकडे आकृष्ट झालेले होते.  पण पुढे या चळवळीचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झाले.  राजकीय सत्तेत, नोकर्‍यांत आपल्याला योग्य वाटा मिळावा यासाठी ही चळवळ चालविण्याचा प्रयत्‍न झाला.  काँग्रेसच्या १९३० च्या कायदेभंगाचे चळवळीला लोकांचा पाठिंबा मिळू लागताच ब्राह्मणेतर चळवळ चालविणार्‍यांची पंचाईत झाली.  ब्रिटिश सरकार पण अस्वस्थ झाले.  प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या निवडक लोकांना हाताशी धरून त्यांनी चळवळ मोडण्याचा प्रयत्‍न करून पाहिला.  तथापि तो अयशस्वी ठरला.  सातारा जिल्ह्यात धनजी कूपर आणि त्यांचे बंधू, कच्छी नांवाचे कराडचे बडे व्यापारी यांना हाताशी धरून ब्रिटिश अधिकारी डावपेच लढवीत होते.  कच्छी यांनी कराड नगरपालिकेचे अध्यक्ष या नात्याने पालिका आपल्या ताब्यात ठेवलेली होती.  या पालिकेने एक ठराव संमत करून मुंबईचे गव्हर्नर फ्रेडरीक साईक्स यांना मानपत्र देण्याचे ठरविले.  लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.  मानपत्र देण्याच्या विरुद्ध चळवळ उभी करण्यात आली.  जाहीर सभांतून विरोध दर्शविण्यात आला.  गव्हर्नरचे कराडमध्ये आगमन होताच त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  या निदर्शनात २०-२५ लोक सामील झाले होते.  गणपतराव आळतेकर आणि बाबूराव गोखले यांनी निदर्शनाचे नेतृत्व केले.  गव्हर्नरला जनजागृतीचे दर्शन घडले.  स्वातंत्र्याची चळवळ ही केवळ शहरापुरती मर्यादित नसून ती खेड्यापर्यंत पोहोचली आहे याची जाणीव ब्रिटिश सरकारला झाली.  १९३० च्या चळवळीने गांधीजींनी सारा समाज ढवळून काढला.  ''स्वराज्य हा आपला हक्क आहे'' याची जाणीव खेड्यापाड्यात राहणार्‍या कोट्यावधी लोकांना झाली.  कराडमधील गव्हर्नरविरोधी निदर्शनाच्या वेळी यशवंतराव हायस्कूलमध्ये शिकत होते.  अभ्यास सांभाळून ते राजकीय घडामोडी समजून घेत होते.  कार्यकर्ते तुरुंगात जात होते, काही सुटून बाहेर येत होते.  यासंबंधीची वार्ता यशवंतराव आपणहून 'ज्ञानप्रकाश' या पुण्यातील वृत्तपत्राकडे पाठवीत होते आणि त्यांच्या बातम्यांना 'ज्ञानप्रकाश' प्रसिद्धी देत असे.  विद्यार्थी, छोटा कार्यकर्ता, पत्रकार या विविध भूमिका यशवंतराव पार पाडीत.  १९३१ मध्ये गांधी-आयर्विन यांची भेट होऊन उभयतांत चर्चा झाली.  चर्चेअखेर एक करार करण्यात आला.  नेत्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.  आंदोलनाला यश मिळाल्याने काँग्रेस पक्षाबद्दल जनतेचा आदर, आपुलकी वाढली.  यशवंतराव मनोमनी खूष झाले.  वार्षिक परीक्षा संपल्यानंतर यशवंतराव आपल्या आजोळी देवराष्ट्रला गेले.  जाताना त्यांनी वाचण्यासाठी बरीच पुस्तके नेलेली होती.  सोनहिर्‍याच्या कांठच्या आंबराईत बसून ते वाचन करीत.  हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक-ऐतिहासिक कादंबर्‍या त्यांनी वाचून काढल्या.  नाथ माधवांच्याही कादंबर्‍या वाचल्या.  'मी', 'पण लक्षात कोण घेतो' या कादंबर्‍यांबरोबर त्यांनी केतकरांची 'ब्राह्मण कन्या' ही पण वाचून काढली.  संस्कृत चांगले व्हावे म्हणून मेघदूताचे पाठांतर केले.  मॅट्रिकच्या परीक्षेला चांगला अभ्यास करायचा, चांगले मार्क्स मिळवायचे असे मनाशी ठरवून यशवंतराव कराडला परतले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org