यशवंतराव चव्हाण (83)

काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक त्याच दिवशी दुपारी १-०० वाजता भरणार होती. यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी शमियान्यातच चर्चा केली आणि त्यांना सांगितले की इंदिराजी या जगजीवनराम यांचे नाव सुचविण्याची शक्यता आहे. नाईकांना याची कल्पना होती. त्यांनी यशवंतरावांना सांगितले की, जगजीवनराम यांनीच आपल्याजवळ त्यांची इच्छा बोलून दाखविली असून आपल्याशी बोलण्याची विनंती केली आहे. त्यावर यशवंतराव चव्हाण नाईकांना म्हणाले, ''आता वेळ निघून गेली आहे. एक वेळ माझ्याही मनात जगजीवनराम यांचे नांव होते. तथापि पंतप्रधान इंदिराजींना ते मान्य नव्हते आता आपला नाईलाज आहे.''  फक्रुद्दिन अली अहमंद चव्हाणांना शामियान्यातच भेटले. त्यांनी जगजीवनराम यांच्या नावाला पाठिंबा द्यावा असे सुचविले. त्यावर चव्हाणांनी सांगितले की, रेड्डींना पाठिंबा देण्याबाबत आपण शब्द दिलेला असून तो बदलता येणार नाही. काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक तहकूब करून पुन्हा एकत्र बसता येईल कां आणि नांवाचा विचार करणे शक्य होईल कां ते पहावे. त्यावर फक्रुद्दिन अली म्हणाजे, ''पंतप्रधानांना जगजीवनरामच हवेत.''  यशवंतरावांनी बैठक तहकुबीबाबत पंतप्रधानांनी प्रयत्‍न करावा असे सुचविले. एकला पांच मिनिटे कमी असताना भेटीसाठी इंदिराजींचा यशवंतरावांना निरोप आला. यशवंतराव पंतप्रधानांच्या खोलीत गेले. तेथे फक्रुद्दिनअली बसलेले दिसले. बंगलोरमध्ये असे दुसर्‍यांदा घडले. यशवंतरावांनी संसदीय मंडळाची बैठक पुढे ढकलण्याबाबत सुचविले. दिल्लीत एकत्र बसून विचार करता येईल, मतभेद दूर करता येतील, असे त्यांनी इंदिराजींना सांगितले. त्यावर इंदिराजी म्हणाल्या, ''बैठक पुढे ढकलण्याबाबत आपण सांगणार नाही.''  त्यावर चव्हाणांनी सांगितले की, संजीव रेड्डींना आपण वचनबद्ध आहोत. दहा मिनिटांनी संसदीय मंडळाची बैठक सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून संजीव रेड्डी यांचे नांव सुचविले आणि स. का. पाटील यांनी अनुमोदन दिले. इंदिराजींनी सांगितले की, राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत इतर पक्षांचे काय मत आहे हे अजमावण्याकरिता आपणास वेळ हवाय. फक्रुद्दिनअली अहंमद उठले आणि त्यांनी जगजीवनराम यांचे नांव सुचविले. मतदानावर पाळी आली. कामराज, स. का. पाटील, मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांनी रेड्डींच्या नांवाला अनुकूलता दर्शविली. जगजीवनराम व निजलिंगप्पा तटस्थ राहिले. इंदिराजी आणि फक्रुद्दिनअली अहंमद हे दोघेच जगजीवनराम यांच्या बाजूला राहिले. चार विरुद्ध दोन अशा मतदानाने काँग्रेस संसदीय मंडळाने रेड्डी यांचे नांव संमत केले. अध्यक्ष निजलिंगप्पांनी रेड्डी यांचे नांव जाहीर करण्यापूर्वी इंदिरा गांधींशी बोलावे असे ठरले. इंदिराजींनी एकूण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून याचे परिणाम चांगले होणार नाहीत असे बजावले. निजलिंगप्पांनी पंतप्रधानांची भेट न घेता रेड्डी यांचे नांव जाहीर करून टाकले. यानंतर काही तासांतच श्री. व्ही. व्ही. गिरी यांनी दिल्लीत जाहीर करून टाकले की आपण स्वतंत्र म्हणून राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविणार आहोत. राष्ट्रपतिपदाची निवडणूक हा राजीय आखाडा बनविला जाऊ नये असेही त्यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेसच्या सभासदांत खळबळ उडाली. काहींना संसदीय मंडळाचा निर्णय पसंत होता, तर काहींना नापसंत. या निर्णयावर ए. आय. सी. सी.त चर्चा केली जावी अशी काहींनी मागणी केली. तथापि संसदीय मंडळाचा निर्णय हा अखेरचा असतो, त्यावर चर्चा करता येत नाही असे सांगण्यात येऊन चर्चेची मागणी फेटाळण्यात आली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org