यशवंतराव चव्हाण (79)

त्यानंतर १९५१ मध्ये पुरुषोत्तमदास टंडन अध्यक्ष झाले. त्यांचे आणि नेहरूंचे पटले नाही. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे पक्षसंघटनेला जबाबदार असल्याने पक्षाने ठरविलेली धोरणे त्यांनी राबवायला हवीत असा टंडन यांचा आग्रह असायचा. नेहरूंना हे मान्य नव्हते. त्यांनी एके दिवशी कार्यकारिणीचा राजीनामा पाठवून दिला. त्यासरशी काँग्रेसच्या बहुसंख्य खासदारांनी नेहरूंच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचा ठराव केला. त्यावर टंडन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाचे अध्यक्षपद नेहरूंनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे पक्ष आणि सरकारात मतभेद राहण्याचे फारसे कारण उरले नाही. नेहरूंची तब्येत ढासळू लागल्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत चिंता निर्माण झाली. त्यातच लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. कृपलानी, मसानी, डॉ. लोहिया हे काँग्रेस उमेदवारांचा पराभव करून लोकसभेवर निवडून आले. काँग्रेसच्या नेत्यांना धक्का बसला. अखिल भारतीय काँग्रेसच्या खास अधिवेशनाची मागणी करण्यात आली. त्यानुसार अधिवेशन भरले. पराभवाची मीमांसा झाली. या मीमांसेनुसार एका नव्याच योजनेला जन्म देण्यात आला. ती योजना म्हणजे 'कामराज प्लॅन'. हा प्लॅन खूपच गाजला. त्याच्या अंमलबजावणीने काँग्रेस पक्षात फूट पडण्यास सुरुवात केली.

कामराज मद्रास राज्याचे मुख्यमंत्री होते. काँग्रेस पक्षात जे आघाडीचे नेते आहेत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन संघटनेच्या कामाला वाहून घ्यावे, संघटना मजबूत करावी असा त्यांच्या प्लॅनचा मतितार्थ होता. त्यानुसार मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री, स. का. पाटील, जगजीवनराम या केंद्रीय मंत्र्यांनी आणि ओरिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक आणि काश्मिरचे मुख्यमंत्री बक्षी गुलाम महंमद यांनी मंत्रिपदाचे राजीनामे सादर केले. काँग्रेस पक्षात थोडी खळबळ माजली. आपल्याला हटविण्यासाठी 'कामराज प्लॅन' ची आंखणी केली गेली आहे असे स. का. पाटील आणि मोरारजीभाई देसाई यांनी उघडपणे बोलून दाखविले. त्यानंतर या दोघांनी पुढाकार घेऊन 'सिंडिकेट' या नांवाने काँग्रेसमध्ये आपला गट स्थापन केला. कामराज, एस. निजलिंगप्पा, नीलम संजीव रेड्डी. अतुल्य घोष, मल्या यांनी तिरूपतीला एक बैठक घेऊन तीत काँग्रेसच्या भावी अध्यक्षाबाबत खल केला. या बैठकीला पाटील हजर नव्हते. लालबहादूर शास्त्रींचे नाव निश्चित करण्यात आले. पण त्यांनी स्पष्ट नकार दर्शविला. मोरारजींची इच्छा होती पण ती फलद्रुप होऊ शकली नाही. सिंडिकेटच्या पाठिंब्याने आणि नेहरूंच्या अनुकूलतेने कामराज हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. जयपूरच्या काँग्रेसच्या अधिवेधनात सिंडिकेटचे नेते जोरात होते. त्यांनी असा ठराव मंजूर करून घेतला की पंतप्रधानांनी वेळोवेळी काँग्रेस अध्यक्षांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. नेहरूंच्यावर एक प्रकारे अंकूश ठेवण्याचा हा प्रयत्‍न होता. भुवनेश्वर काँग्रेसनंतर नेहरूंना अर्धांगवायूचा झटका आला आणि काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. नेहरूंच्या नंतर कोण, त्यांचा वारस कोण, यावर खलबते सुरू झाली. मोरारजींनी स्वतःसाठी प्रयत्‍न सुरू केले. तथापि कामराज यांनी यशवंतराव चव्हाणांना आपल्या बाजूला वळवून मुत्सद्दीपणे पावले टाकून मोरारजींना बाजूला टाकले आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपविली. इंदिरा गांधी, गुलझारीलाल नंदा हे पण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. तथापि त्यांना सिंडिकेटचा पाठिंबा नव्हता. २ जून १९६४ रोजी संसदीय काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी शास्त्रीजींची एकमताने निवड करण्यात आली. या सार्‍या घडामोडीत यशवंतरावांचा पाठिंबा मोलाचा ठरला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org