यशवंतराव चव्हाण (73)

:   ९   :

नक्षलवाद्यांचा उठाव आणि संस्थानिकांचा तनखा-खास सवलती या दोन जटिल प्रश्नांना तोंड देण्यात यशवंतरावांनी जो कणखरपणा दाखविला त्यामुळे त्यांची प्रतिमा अधिक उंचावली. एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन कारणपरंपरा शोधायची, सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी हे प्रश्न निगडित आहेत कां याची तपासणी करायची आणि मग धोरण आंखायचे हा त्यांचा पिंड बनून गेला होता. प्रत्येक बाबतीत कायदा, बडगा, दडपादडपी यांचा अवलंब करण्यास ते नाखूप असत. प. बंगालमधील सिलिगुडी भागात १९६७ मध्ये कम्युनिस्टांनी उचल खाल्ली. शेतकर्‍यांच्या पाठीशी आपण उभे आहोत हे दाखविण्याकरिता आंदोलन सुरू केले. विधिमंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळू न शकल्याने कम्युनिस्टांबरोबर संमिश्र सरकार राज्यात बनवावे लागले होते. या घटनेमुळे डाव्या कम्युनिस्टांनी जोर धरला. त्यातल्या जहालांनी स्वतःला ''नक्षलवादी'' म्हणवून घेऊन सशस्त्र उठावाचा प्रयत्‍न केला. त्यांनी चीनशी संपर्क साधला आणि शस्त्रे मिळविली. भारत-चीन सीमेलगतच्या दार्जिलिंग जिल्ह्यात भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांची जमिनदार पिळवणूक करीत. आदिवासींनी मेहनत करून पिकविलेले अन्नधान्य जमिनदारच लाटीत. याला प्रतिबंध म्हणून नक्षलवाद्यांनी, भूमिहीन शेतकर्‍यांचा प्रश्न हाती घेतला आणि जमिनदारांकडील जमीन काढून घेऊन शेतकर्‍यांना वाटायला सुरुवात केली. कनु संन्याल नांवाचा जहाल नक्षलवादी या चळवळीचा नेता बनला. पोलिस आणि शेतमजुरांच्यात चकमकी झडू लागल्या. दोन्ही बाजूंनी मनुष्यहानी होऊ लागली. नक्षलवादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला. नक्षलवाद्यांचा उपद्रव सुरू झाल्यावर लोकसभेच्या माध्यमातून देशातील जनतेला यशवंतरावांनी स्पष्टपणे कल्पना दिली की चीनच्या माओच्या चिथावणीने भारतात क्रांती घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्‍न सुरू झाला आहे. 'सशस्त्र उठाव करून क्रांती करण्याचे स्वप्न कोणी पाहत असतील तर सरकार ते प्रयत्‍न धुळीस मिळविल्याशिवाय राहणार नाही' असा इशाराही त्यांनी दिला. या इशार्‍यानंतर निव्वळ पोलीस शक्तीचा वापर न करता चव्हाणांनी भूमिहीनांच्या - आदिवासींच्या दुरावस्थेचे सामाजिक-आर्थिक विषमतेचे कारण दूर करण्यावर भर दिला. नेमके याचवेळी कम्युनिस्टात फुटीला सुरुवात झाली. कनु संन्याल यांनी आपला सवतासुभा उभा केला. तथापि चीनने नक्षलवाद्यांचे अपेक्षेप्रमाणे मदत पाठविण्याबाबतचा हात आंखडता घेतला. मग गुंडगिरी, दडपशाही आदि मार्गाचा अवलंब करण्याचा, विद्यार्थ्यांना, कामगारांना भडकविण्याचा नक्षलवाद्यांनी प्रयत्‍न करून पाहिला. तथापि त्यात यश न येता शेकडो नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागून कोठडीत डांबले गेले. नक्षलवाद्यांकडून डावे कम्युनिस्ट मारले गेले. उजव्या कम्युनिस्टांना मात्र त्यांनी आपले लक्ष्य बनविले नाही. नक्षलवादी चळवळीचा ढाचा माओच्या तंत्रासारखा होता. ग्रामीण भागावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. एका बाजूला नेपाळ, दुसर्‍या बाजूला पाकिस्तान आणि लगत चीनची हद्द अशा मोक्याचे ठिकाणी नक्षलवादी जोर पकडून होते. काँग्रेसने पुरोगामी धोरण स्वीकारून असंतोषाची कारणे दूर केली तर नक्षलवादी चळवळ आपोआप बारगळेल हा गृहमंत्री चव्हाणांचा होरा खरा ठरला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org