यशवंतराव चव्हाण (66)

संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी श्री. चव्हाण दिल्लीत दाखल झाले होते, तथापि त्यांचा मंत्री म्हणून शपथविधी व्हायचा होता. चव्हाणांनी संरक्षण मंत्रिपद स्वीकारू नये अशी पटनाईकांची इच्छा होती. संरक्षणविषयक सल्लागार म्हणून संरक्षणखात्यात त्यांनी या अगोदरच लुडबूड सुरू केलेली होती. यशवंतरावांनी त्यांना उत्तर दिले, ''संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार करूनच आपण मुंबई सोडून दिल्लीला आलेलो आहोत. देशाकरिता जास्तीत जास्त श्रम करण्याचा माझा निश्चय आहे.''  हे उत्तर ऐकल्यावर पटनाईक मुकाट्याने उठले आणि निघून गेले. यशवंतरावांनी झोपायची तयारी केली. तथापि फोन परत खणखणला. पी.टी.आय. च्या कचेरीतून फोन आलेला होता. ''चीनने एकतर्फी युद्धसमाप्‍ती जाहीर केली आहे.''  बातमीदाराने बातमी सांगितली. ही वार्ता नेहरूंना आणि शास्त्रीजींना सकाळी समजली. योगायोग असा की ज्या दिवशी चव्हाण संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेणार, त्याच दिवशी चीनकडून युद्धसमाप्‍तीची एकतर्फी घोषणा !  ''यशवंतरावांचा पायगुण'' असे उद्‍गार अनेकांचे तोंडून बाहेर पडले. खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. बिजू पटनाईक आणि टी. टी. कृष्णम्माचारी या दोन व्यक्ती मात्र मनात अढी ठेवून होत्या. या दोघांनाही संरक्षणमंत्री व्हायचे होते. तथापि ते जमले नव्हते.

युद्ध थांबले म्हणून यशवंतराव स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी लडाख, नेफा युद्धभूमीला भेट देऊन युद्धोत्तर परिस्थितीची माहिती घेतली. काश्मीर व राजस्थानच्या सरहद्दीचा दौरा केला. आघाडीवर लढणार्‍या आणि सीमाहद्दीवर बंदोबस्तासाठी असलेल्या जवानांची - अधिकार्‍यांची विचारपूस करून त्यांचेशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. प्रशिक्षण केंद्रांना भेट देऊन जवानांशी गप्पागोष्टी केल्या, त्यांचेबरोबर जेवण पण घेतले. हेतू हा की जवानांचा आत्मविश्वास वाढावा. कृष्ण मेनन यांचे कारकिर्दीत वातावरण वेगळे होते. चव्हाण यांनी आपल्या धोरणाने त्याला कलाटणी देऊन मंत्रालय आणि सैन्य, अधिकारी आणि जवान यांच्यांत चैतन्य निर्माण केले,  विश्वासाचे वातावरण निर्माण केले. यशवंतरावांच्या प्रशासनाची हातोटी संबंधितांना अनुभवायला मिळाली. इतर मंत्रालयांपेक्षा संरक्षण मंत्रालयाच्या कामाची पद्धत अगदी वेगळी होती. यशवंतरावांच्या ध्यानात हे यायला वेळ लागला नाही. चव्हाण मंत्रालयात सकाळी ९-३० ला जाऊ लागले. तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घ्यायची, या बैठकीला संरक्षण खात्याचे सचिव आणि सहसचिव यांना पण बोलवायचे आणि संरक्षणविषयक प्रश्नावर चर्चा करायची असा पायंडा त्यांनी पाडला. रोज सकाळी एक तास होणार्‍या चर्चेमुळे सैन्याच्या दैनंदिन गरजा, त्यांना लागणारी शस्त्रे व दारूगोळा, इतर पुरवठा यांत कांही कमतरता आहे कां, उणिवा आहेत कां, गुंतागुंत आहे कां याची माहिती घेऊन चव्हाण आवश्यक त्या सूचना जागच्या जागी देऊ लागले. माजी मंत्री श्रीकृष्ण मेनन यांची पद्धत आणि यशवंतराव चव्हाण यांची कामाची पद्धत यांतील फरक जाणून अधिकारी व जवान जिद्दीने आपापली जबाबदारी पार पाडू लागले. त्यांच्यांतील चुरस, हेवेदावे कमी होऊन संरक्षणदल एकजीवाने काम करू लागले व त्याचे प्रत्यंतर प्रत्यक्षात येऊ लागले.

बिजू पटनाईक हे ओरिसाचे मुख्यमंत्री होते तरी त्यांचा मुक्काम दिल्लीत बराच असायचा. संरक्षण खाते कांही काळ नेहरूंच्याकडे होते. तेव्हा त्यांनी मदतनीस म्हणून पटनाईकांना जवळ केले होते. त्यांचेवर नेहरूंचा विशेष लोभ होता. त्यामुळे आपणच संरक्षण खात्याचे मंत्री आहोत अशा आविर्भावात पटनाईक वागायचे. पटनाईक यांनी चव्हाणांना पण सल्ला द्यावा असे नेहरूंनी सांगितले होते. तथापि बिजू हे आपण संरक्षणमंत्री आहेत अशा थाटात वागू लागले. यशवंतरावांनी पंडितजींच्या कानावर हे घातले. पण फारसा उपयोग झाला नाही. मग संरक्षणमंत्री म्हणून पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आणि त्यात विचारले की, ''आपण संपूर्ण
(पान नं. ११४ व ११५ नाही आहे.)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org