यशवंतराव चव्हाण (63)

पुराच्या दुसर्‍या दिवशी पूरग्रस्त भागात हिंडून हानीची पाहणी करून मातीचे ढीग, घाण काढण्यासाठी लष्कराची मदत बोलावली. कॉलरा प्रतिबंधक लस टोचण्याचे काम सुरू केले. मदत केंद्रे उभारण्याचे प्रयत्‍न केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधीचे आवाहन केले. मदतीचा ओघ सुरू झाला. धान्य, साखरेच्या पोत्यांच्या राशी उभ्या राहिल्या. रोज ४०-५० हजार भाकरी तयार करून पूरग्रस्तांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कॉन्टिजन्सी फंडामध्ये पांच कोटी रुपये जमले. पंतप्रधान पंडित नेहरूंनी एक लक्ष रुपये पाठवून दिले आणि ते हानी पाहण्यासाठी स्वतः पुण्यात आले. यशवंतरावांच्या बरोबर त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. राज्य सरकारने तांतडीने केलेल्या निवारण व्यवस्थेची वाखाणणी केली. केंद्र सरकार तीन कोटींची मदत पाठवेल असा दिलासा पण दिला. 'सकाळ' आणि 'विशाल सह्याद्रि' या दोन दैनिकांची पुराने जी हानी झाली होती ती पंडितजींनी स्वतः पाहिली आणि संपादकांना, व्यवस्थापकांना धीर दिला. यशवंतरावांच्या या सार्‍या धांवपळीचे लोकांनी कौतुक केले. तथापि विरोधक धरण फुटीबद्दल सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात मशगुल राहिले. सरकारने त्वरित न्यायमूर्ती बावडेकर यांचे चौकशीमंडळ नियुक्त केले. रीतसर चौकशी करून सरकारकडे अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी पानशेत चौकशीचे काम सुरू केले. तथापि एके दिवशी डॉ. बावडेकरांनी आपल्या निवासस्थानाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. विरोधी पक्षांनी याचे भांडवल करण्याचा प्रयत्‍न केला. सरकारने न्यायमूर्ती व्ही. एन. नाईक यांचे नवे कमिशन त्वरित नियुक्त केले. नाईकांनी रीतसर चौकशी करून सरकारकडे अहवाल सादर केला. यशवंतरावांनी ज्या पद्धतीने पानशेत धरणफुटीची आणि न्या. बावडेकर आत्महत्येची आपत्ती हाताळली त्याबद्दल चिंतामणराव देशमुखांसह मोठमोठ्या मंडळींनी त्यांचे कौतुक केले.

पानशेत पुराच्या संकटाशी मुकाबला केल्यानंतर थोडी उसंत मिळते न मिळते तोच १९६२ च्या निवडणुकी येऊन ठेपल्या आणि उमेदवार निवडीच्या तयारीला लागावे लागले. ही धामधूम सुरू असतानाच भाऊसाहेब हिरे यांचे दुखःद निधन झाले. (६ ऑक्टोबर १९६१). एक जुना स्नेही व सहकारी गमावण्याचा धक्का यशवंतरावांना सहन करावा लागला. १९५२ व १९५७ च्या निवडणुकीत चव्हाण-हिरे या जोडीने सारा महाराष्ट्र ढवळून काढून काँग्रेसला सत्ता प्राप्‍त करून दिली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाचे वेळी दोघांत मतभेद झाले होते, तथापि तेढ निर्माण झालेली नव्हती. यशवंतरावांनी भाऊसाहेबांना शेवटपर्यंत आपला नेता मानले होते. स्वतःचा उत्तर कराड मतदार संघ सांभाळून काँग्रेसला मोठा विजय मिळवून देण्याची जबाबदारी यशवंतरावांनी आपल्या अंगावर घेतली आणि ती यशस्वी करून दाखविली. विधिमंडळाच्या एकूण २६५ जागांपैकी २१४ जागा काँग्रेस पक्षाने जिंकून प्रचंड विजय मिळविला. १९५७ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात जे अपयश पदरी पडले होते ते धुवून काढले. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून यशवंतरावांची एकमताने निवड केली. मंत्रिमंडळाचा शपथविधी ९ मार्च, १९६२ रोजी झाला. मंत्रिमंडळात एकूण ४० जणांना स्थान दिले गेले. मंत्रिमंडळ अस्तित्वात येताच यशवंतरावांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती पंचायत राज्याचा कारभार सुरू करण्याची. राजस्थान व आंध्रने आपल्या राज्यात यासंबंधीचा प्रयोग सुरू केला होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org