यशवंतराव चव्हाण (60)

:   ७   :

संयुक्त महाराष्ट्र राज्याचे उद्‍घाटन ३० एप्रिल, १९६० ला रात्री १२ वाजून १ मिनिटांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मुंबईत झाले. हा समारंभ राजभवनाच्या पटांगणात भव्य स्वरूपात झाला. संयुक्त महाराष्ट्राचा नवा नकाशा तयार करण्यात आलेला होता. विद्युतदीपांनी चमचमणार्‍या या नकाशावरील रेशमी आवरण पंडितजींनी बाजूला केले आणि टाळ्यांच्या गजराने भव्य शामियाना निनादून गेला. पंडितजींना आणि उपस्थितांना नव्या महाराष्ट्राचे दर्शन घडले. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती गांधी याही उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या सदिच्छा यशवंतरावांजवळ व्यकत केल्या. उपस्थित निमंत्रितांच्या आनंदाला उधाण आले आणि सारे वातावरण आनंदमय बनले. महाराष्ट्र गीत कानी पडावे अशी व्यवस्था करण्यात आली होती. लता मंगेशकरांनी भूपाळ्या म्हटल्या आणि कार्यक्रमाची सांगता ज्ञानदेवांच्या पसायदानाने झाली. यशवंतरावांनी 'पसायदान' व त्याचा अर्थ नेहरूंना समजावून दिला. लताजींच्या आवाजातील पसायदानाने पंडितजी देखील आनंदित झाले. 'दुरितांचे तिमिर जावो ।  विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।  जो जो वांच्छिल तो ते लाहो ।  प्राणिजात ॥ याचा अर्थ आणि मराठी संतांची समतेची शिकवण ऐकल्यावर पंडितजी सुखावले. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या उद्‍घाटनाचा राजभवनातील हा समारंभ निमंत्रितांसाठी होता. आम जनतेसाठी शिवाजी पार्क मैदानावर १ मे रोजी दुपारी समारंभ ठेवण्यात आला होता. लक्षावधी लोक या समारंभासाठी उपस्थित होते. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद व समाधान ओसंडून चालल्याचे दिसत होते. राष्ट्रीय ध्वज, मंगलवाद्ये, लोकांचा उत्साह यामुळे वातावरण भारून गेले होते. पंडितजींचे भाषण, यशवंतरावांचे आभार प्रदर्शन सारे काही आगळे-वेगळे वाटण्यासारखे झाले. त्याच दिवशी म्हणजे १ मे, १९६० रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी आणि नंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यशवंतराव द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते ते आता नव्या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. गेल्या चार वर्षांतील धोरणे पुढे चालविण्याची तसेच हाती घेतलेल्या कार्यक्रमांची पूर्तता करण्याची संधी त्यांना पुन्हा लाभली.

नव्या सरकारचे धोरण म्हणून ज्या गोष्टी यशवंतरावांनी घोषित केल्या, जी आश्वासने दिली त्यातून त्यांचा राज्याविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट झाला. शेती, उद्योग व शिक्षण यावर भर देण्याचे त्यांनी स्पष्ट केलेच पण त्याचबरोबर हेही सांगून टाकले की, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जो वारसा आपल्या हाती दिला आहे तो अमोल ठेवा समजून महाराष्ट्राची व देशाची सेवा करण्याचे व्रत आपण सर्वजण घेऊ या. राज्य हे साध्य नसून साधन आहे असे मानूनच शेती-उद्योगावर आधारित समाजव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्‍न करू या. महाराष्ट्राचा जगन्नाथाचा रथ चालविण्यासाठी सर्वांचा हातभार लागावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता राज्यभर संचार सुरू केला. या संचारात त्यांनी शेती-उद्योग-शिक्षण यावर भर दिला. उद्योगात, कारखानदारीत मराठी तरुणांनी दुसर्‍याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःच उद्योगधंद्यात पडावे, स्वतःचे कारखाने चालवावेत असे आवाहन केले. शेती हा ग्रामीण विकासाचा गाभा आहे हे पटवून देऊन शेतीला उद्योगधंद्याची जोड देण्याबाबत सर्वतोपरी उत्तेजन दिले. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्युतीकरणाला प्राधान्य दिले. शेती, सहकार, उद्योग, शिक्षण या विषयावर परिसंवाद घडवून आणले. साहित्य-नाट्यसंमेलनांना प्रोत्साहन दिले. पत्रकारांच्या शिक्षणास जरूर ते सहकार्य दिले. काँग्रेसची शिबिरे भरविली, कार्यकर्त्यांना त्यांतून शिक्षण दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org