यशवंतराव चव्हाण (58)

यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाला धक्का द्यायचा हा या पत्रकामागील उद्देश असावा असे कार्यकर्ते जेव्हा बोलून दाखवू लागले, तेव्हा देशपांडे पत्रकाबाबत चर्चा करण्याकरिता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली. हिरे बैठकीला हजर होते, पण ते कांहीही बोलले नाहीत. वि. स. पागे, देवकीनंदन नारायण, नाईक-निंबाळकर, यांनी चर्चेत भाग घेऊन यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली द्विभाषिक राज्य स्थिर होत आहे, यशस्वी होत आहे असा अभिप्राय व्यक्त केला. चव्हाणांचे हात बळकट करायला हवेत असेही मत व्यक्त करण्यात आले. तिकडे दिल्लीत गृहमंत्री पंत यांनी महाराष्ट्र आणि गुजरातच्या प्रतिनिधींच्या मनाचा कानोसा घेतल्यावर त्यांना हे जाणवले की संयुक्त महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन वेगळ्या राज्याबाबत लोकांची इच्छा फार प्रबळ असून ती फार काळ डावलून चालणार नाही. समितीच्या लोकांनी दिल्लीत संसदभवनासमोर निदर्शने केल्यानंतर आणि लोकसभेत तहकुबीद्वारे चर्चा घडवून आणल्यानंतर पं. पंतांच्या वेगळ्या विचारांना त्यामुळे गती प्राप्‍त झाली. त्यात भर पडली ती मुंबईचे राज्यपाल श्री. श्रीप्रकाश यांनी राज्यपालांचे परिषदेत केलेल्या भाषणाने. पंतांनी याबाबत नेहरूंशी चर्चा केली. नेहरूही बदलत चालले आहेत हे पंतांच्या लक्षात आले. काकासाहेब गाडगीळांनी या बदलाची जाणीव यशवंतरावांना आणि नाईक-निंबाळकरांना दिली आणि निर्माण झालेल्या नामी संधीचा उपयोग करून घ्यावा, असे सुचविले.

श्रीमती गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी पंडित नेहरू आणि पंडित पंत यांचेशी द्विभाषिकाच्या भवितव्याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचेशीही चर्चा केली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचेशीही चर्चा केली. यशवंतरावांनी श्रीमती गांधी यांना महाराष्ट्र भेटीची निमंत्रण दिले. इंदिराजींनी महाराष्ट्राचा दौना करून जनतेचे मत जाणून घ्यावे अशी विनंतीही यशवंतरावांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना केली. नेहरू आणि पंत यांनी इंदिराजींच्या दौर्‍याला संमती दर्शविली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत इंदिराजी अनुकूल अभिप्राय देतील याची खात्री वाटल्यामुळेच दौर्‍याचे प्रयोजन करण्यात आले होते. इंदिराजी दिल्लीहून विमानाने मुंबईला आल्या आणि मोटारने त्यांनी आपला प्रवास सुरू केला. ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक या जिल्ह्यांना इंदिराजींनी भेट द्यावी असाच दौर्‍याचा कार्यक्रम आंखण्यात आला होता. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षांबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हणजे मालोजीराव नाईक-निंबाळकरांनी राहावे, कोकण दौर्‍यात मंत्री पी. के. सावंत यांनी त्यांच्या समवेत असावे अशा सूचना यशवंतरावांनी दिल्या होत्या. पत्रकार या नात्याने 'विशाल सह्याद्रि' चे संपादक अनंतराव पाटील दौर्‍यात सहभागी होतील असेही नाईक-निंबाळकरांना सांगून ठेवले होते. इंदिराजी मुंबईहून निघून ठाणेमार्गे महाडला पोहोचतील आणि चिपळूणला मुक्काम करतील असे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आले होते. अनंतराव पाटील ठाण्याला जाण्याऐवजी महाडला दौर्‍यात सामील झाले. नाशिकच्या शेवटच्या सभेपर्यंत ते इंदिराजींबरोबर होते. त्यांनी जागजागची भाषणे ऐकणे एवढाच मर्यादित उद्देश न ठवेता अनंतरावांनी मुक्कामाचे ठिकाणी इंदिराजींशी चर्चा करण्याची संधी साधली आणि त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्‍न केला. मार्गात आणखीही दोन-चार पत्रकार दौर्‍यात सामील झाले. त्यात टाईम्सचे बाळ अभ्यंकर आणि पी. टी. आय. चे दिनू महात्मे पण होते. उन्हातान्हात प्रवास करताना इंदिराजी किती काटक आहेत, निग्रही आहेत याची कल्पना पत्रकारांना येऊन चुकली. त्याचबरोबर मराठी माणसाच्या चेहर्‍यावरील भाव ओळखून, महाराष्ट्र निर्मितीबद्दल त्या कशा अनुकूल आहेत हेही पत्रकारांच्या लक्षात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org