यशवंतराव चव्हाण (57)

समितीच्या नेत्यांनी यशवंतरावांचा वेळोवेळी उपमर्द केलेला होता, तरी त्याबद्दल मनात राग न ठेवता यशवंतरावांनी समितीच्या सदस्यांना प्रेमाची वागणूक दिली. समिती हा पक्ष नव्हता, समितीजवळ कार्यक्रम नव्हता तरी यशवंतरावांनी समितीला विरोधी पक्षाचे स्थान दिले. गृहात विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली. 'प्रभात'चे संपादक वालचंद कोठारींवर हक्कभंगाबद्दल शिक्षेची शिफारस झाली असताना यशवंतरावांनी शिक्षेचे प्रमाण सौम्य करून माफी मागण्यावर ते प्रकरण मिटविले. विरोधकांना त्यांनी प्रेमाने जिंकले आणि विरोधकांनीही यशवंतरावांचे अभिनंदन केले. कल्याणकारी राज्याची कल्पना डोळ्यासमोर ठेऊन यशवंतराव धोरणे आंखीत होते आणि भूमिका पार पाडीत होते. लोकशाही समाजवादाचे ध्येय प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्‍न कसोशीने करीत होते. कराड मतदार संघातील यशवंतरावांचे यश समितीवाल्यांना खूपच झोंबले होते. म्हणून 'प्रभात'चे वालचंद कोठारी यांचेपासून कम्युनिस्ट नेते भाई डांगे यांच्यापर्यंत कित्येकांनी खोट्या कंड्या पिकविण्याचा, खोटारडे आरोप करण्याचा धंदा सुरू केला होता. तथापि जनतेवर त्याचा कसलाही परिणाम होऊ शकला नाही. 'लोकसत्ता' करांनी आणि 'सकाळ' कारांनी यशवंतरावांचे निवडणुकीतल यश खुल्या दिलाने मान्य न करणार्‍या समितीवाल्यांचे वृत्तपत्रातून वाभाडे काढण्यास मागेपुढे पाहिले नाही. यशवंतरावांचे निवडणुकीतील यश म्हणजे द्विभाषिक राज्याचे बाजूने मिळालेला कौल मानायला हवा असेही या वृत्तपत्रातून जाहीरपणे सांगायला मागेपुढे पाहिले नाही.

विशाल द्विभाषिकाचा कारभार यशवंतरावांनी उत्तम प्रकारे सांभाळला आणि गुजराथ, विदर्भ, मराठवाड्यासह सर्व भागांतील आमदारांची, मंत्र्यांची आणि जनतेची मने जिंकली. त्यांना प्रश्नांची जाण होती. कोणते प्रश्न अग्रक्रम देऊन सोडवायचे हे त्यांनी मनाशी ठरवून ठेवले होते. अधिकार्‍यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडून लोकांची कामे करून घ्यायची, कामचुकारांचे पदरात त्यांची चूक घालायची, पोलिसांसह इतर खात्यांतील भ्रष्टाचाराला आळा घालायचा, सरकारी सेवक जनतेचे सेवक आहेत ही जाण त्यांना करून द्यायची, या कामी यशवंतरावांनी विशेष लक्ष घातले आणि त्यात चांगले यश मिळविले. मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशीही ते मित्रत्वाने वागत, त्यांना जरूर ते सहकार्य, मदत करीत. त्यामुळे गुजराती आणि मराठी मंत्री असा फरक कधी जाणवला नाही की कुरबूर कधी झाली नाही. कलेक्टरांनी परिषद बोलाविणे, कमिशनरांना एकत्र आणणे, पोलिस अधिकार्‍यांशी संवाद करणे याबाबत यशवंतरावांनी कधीही कंटाळा केला नाही की अळंटळं केली नाही. ते अधिकार्‍यांना आवर्जून सांगायचे की कलेक्टर, आमदार आणि संबंधित लोक यांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करायला हवी आणि एकमेकांच्या सहकार्याने लोकांचे प्रश्न सोडवायला हवेत. अन्नधान्य उत्पादनात वाढ, शिक्षण, शेती, सहकार यावर भर देण्याबाबत यशवंतरावांचा कटाक्ष असायचा.

द्विभाषिक यशस्वी केल्यावर दिल्लीचे नेतृत्व संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला फारशी खळखळ करणार नाही, गुजराती बांधवही आपल्याला स्वतंत्र गुजरात राज्य मिळावे म्हणून द्विभाषिक तोडण्यास तयार होतील असा अंदाज वृत्तपत्रेही व्यक्त करू लागली होती. पंडित नेहरूंनी औरंगाबाद दौर्‍यात चव्हाणांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला होता. द्विभाषिकाचा फेरविचार दिल्लीत होत असल्याचे समजताच महाराष्ट्रात आनंदी वातावरण पसरले. गुजरातेत मात्र कांही हितसंबंधी अस्वस्थ बनले होते. मुंबईत स. का. पाटीलही विचाराने बदलले होते. त्यांच्यासमोर १९६२ च्या सर्वत्रिक निवडणुका काँग्रेसने जिंकण्याचा प्रश्न उभा होता. महाराष्ट्रातील काही विघ्नसंतोषी आणि चव्हाण विरोधी मंडळी वेगळ्याच कारवायांत मग्न होती. भाऊसाहेब हिरे यांनी गोविंदराव देशपांडे यांना पुढे करून द्विभाषिकाचे दोन तुकडे करून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन वेगळी राज्ये निर्माण करावीत अशी मागणी करणारे पत्रक काढावयास लावले. त्याला प्रसिद्धीही भपरूर मिळवून दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org