यशवंतराव चव्हाण (52)

विदर्भात नागपूर व अकोला येथील त्यांच्या सभा गाजल्या. नंतर पुण्यात नागरिकांच्या वतीने फुले मार्केटमध्ये महापौर बाबुराव सणस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक फार मोठ्या संख्येने हजर होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लोकांनी आरडाओरडीचा, सभा उधळण्याचा प्रयत्‍न करून पाहिला. तथापि सभेतील कांही लोकांनी उसाची दांडकी करून निदर्शकांना पिटाळून लावले. ओरड करणार्‍यांना उद्देशून यशवंतराव आपल्या भाषणात म्हणाले, ''आरडाओरड, गोंधळ अशा प्रकारांना घाबरून जाण्याइतका मी लेचापेचा नाही. विचारांची मक्तेदारी फक्त पुणेकरांकडे आहे असा अहंकार बाळगू नका. माझे विचार ऐकण्यास घाबरायचे कारण काय ?  माझा लोकशाहीवर विश्वास आहे आणि लोकशाही मार्गानेच मी माझे विचार जनतेला पटवून देत आहे. निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्‍न करतील.
त्यामागे जनतेच्या सेवेची व हिताची कळकळ मुळीच नाही. जवळ नाही नेतृत्व आणि निष्ठा. तसेच एक विचाराची एकसंध संघटना नाही. या खिचडीपक्षाने का जनतेचे पोट भरणार आहे ?  काँग्रेसजवळ कार्यक्रम आहे, नेतृत्व आहे, जनहिताची कळकळ आहे. म्हणूनच लोक काँग्रेसला निवडून देणार आहेत.''

उमेदवारांचे निवडीबाबत समितीमधील विविध पक्षांच्या नेत्यांत बराच मतभेद झाला. फेब्रुवारी संपत आला तरी आपापसात खटके उडतच होते. मराठवाडा आणि विदर्भात समितीचा प्रभाव यथातथाच होता. गुजरातमध्येही महागुजरात समितीचा प्रभाव तीन-चार जिल्ह्यांतच होता. सौराष्ट्र, कच्छ भाग द्विभाषिकाबाबत समाधानी होता. पश्चिम महाराष्ट्रात मात्र समितीचा जोर होता. पंडित नेहरू, पंडित पंत, जगजीवनराम यांच्यासारखे थोर नेते काँग्रेसच्या प्रचारासाठी येऊन गेले. दुय्यम पातळीवरील नेत्यांनीही प्रचाराची पराकाष्ठा केली. यशवंतराव 'कराड' या मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यांचे निवडणुकीबद्दल महाराष्ट्रात आणि दिल्लीत कुतूहल दिसून येत होते. समितीने या मतदारसंघात प्रचाराची पराकाष्ठा करून रणधुमाळी माजविली होती. केशवराव पवार वकील हे समितीचे उमेदवार होते. १९५७ च्या मार्चच्चा पहिल्या आठवड्यात मतदान झाले. मतमोजणीचे वेळी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते दुपारपर्यंत काळजीत होते. केशवराव पवारांचे मताधिक्य वाढत होते. अखेर कराड शहराची मतमोजणी सुरू झाली. तेथे यशवंतराव लीड घेतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. या अपेक्षेप्रमाणे केशवराव पवारांची लीड तोडून यशवंतराव ६०० मतांच्या फरकाने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. दैवाने खैर केली. सरदारगृहाचे उपाध्ये यांनी दीड महिन्यापूर्वी एक पाकिट बंद करून सौ. वेणूताईंच्या हवाली केले होते. त्यात त्यांनी निवडणुकीचे भविष्य वर्तविले होते आणि यशवंतरावांना मतदान कसे होईल याचा अंदाज वर्तविला होता. यशवंतराव ६०० ते ७०० मतांनी निवडून येतील असे पाध्ये यांनी आपल्या पाकिटातील मजकुरात म्हटले होते. त्यांचे भविष्य तंतोतंत खरे ठरले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org