यशवंतराव चव्हाण (51)

यशवंतरावांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यानंतर गुजरातचा दौरा केला आणि नंतर विदर्भाचा. या दौर्‍यात त्यांनी नव्या राज्याची भूमिका आणि हेतू विशद करून सांगितला. विदर्भातील दौरा खूपच गाजला. मुख्यमंत्री होण्यापूर्वी यशवंतराव विदर्भवासियांना माहीत नव्हते. एक तरुण, तडफदार नेता एवढेच लोकांना माहीत होते. आपल्या वक्तृत्वाने आणि विचारांनी यशवंतरावांनी पहिल्याच भेटीत विदर्भावर चांगलीच छाप पाडली. या दौर्‍यात अनंतराव पाटील पत्रकार म्हणून सामील झाले होते. वर्धा येथील सभेत भाषण करताना यशवंतराव म्हणाले. ''भारताच्या स्वातंत्र्याची जी वास्तू आपण दीर्घ प्रयत्‍नाने, झगड्याने, त्यागाने उभी केली आहे त्यामागे बंधुत्वाची भावना महत्त्वाची आहे. या देशात आपण सगळे भाऊभाऊ आहोत. राज्य कोणत्या तत्त्वाने चालवायचे, कम्युनिस्टांच्या की हिंदुसभेच्या की काँग्रेसच्या याबाबत मतभेद होऊ शकतील. तथापि भावाभावाप्रमाणे वागावे यात दुमत होण्याचे कारण नाही. या देशातील एकजण दुसर्‍याचा भाऊ आहे की जाणीव ज्या दिवशी नाहीशी होईल त्या दिवशी देशाचे स्वातंत्र्य, देशाचा गौरव, देशाचे तेज सारे काही नाहीसे होईल.''  'यशवंतरावजी भाषणात पुढे म्हणाले, ''माझ्या या भूमिकेबद्दल टीका करणारे आहेत याची जाणीव आहे. कानडी बोलणारांचे कर्नाटक राज्य, तामिळ बोलाणारांचे तामिळनाडू राज्य, मग मराठी व गुजराथी बोलणार्‍यांचे एकत्र राज्य कशासाठी असा प्रश्न विचारल जातो आहे. लोकमान्य टिळक आणि गांधीजी ज्या महाराष्ट्रात व गुजरातेत जन्माला आले त्यांनी एकत्र येऊन राज्य चालविले तर बिघडले कुठे ?  आपल्याला भूगोल मोठा करावयाचा नसून इतिहास मोठा करावयाचा आहे. त्यासाठी माणसात कर्तृत्व निर्माण करावयाचे आहे. आपली दृष्टी विशाल हवी. त्यासाठी विश्वासाची, सदिच्छेची आणि सहकार्याची गरज आहे. आपले राज्य आकाराने मोठे आहे. ते कर्तृत्वाने मोठे करावयाचे आहे. या राज्यातील लोक मनाने एक झालेले आहेत, विचारांनी एक झालेले आहेत, भावनेने एक झाले आहेत अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करावयाची आहे.''

''नव्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, अनेक पक्षांची मिळून एक मोट बांधण्यात आली आहे. असे सांगून यशवंतराव म्हणाले, निवडणुकीत विरोधी पक्ष जरूर असावेत. पण त्यांनी निवडणूक कार्यक्रमावर लढवायला हवी. कम्युनिस्ट आणि हिंदुसभा यांच्यात काय बरे साम्य आहे ?  काँग्रेसजवळ कार्यक्रम आहे. एकत्र आलेल्या विरोधकांजवळ कोणता कार्यक्रम आहे ?  कुणाला महाराष्ट्र हवा, कुणाला     गुजरात हवा हाच कार्यक्रम ना ?  या देशात कुणातरी राजांची राज्ये होती, घराण्याची राज्ये होती, जमातीची राज्ये होती. १४ ऑगस्ट, १९४७ च्या रात्री या देशात प्रथम लोकांचे राज्य जन्माला आले. हे राज्य चिरंतर राहावे, अखंड राहावे अशीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना असते. जोपर्यंत चंद्रसूर्य उगवत आहेत तोपर्यंत हे जनतेचे राज्य राहावे अशीच मी देवाजवळ करुणा भाकत असतो. महागुजरात परिषदेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन गुजरातचे वातावरण अशांत करण्याची मोहीम हाती घेतली होती. यशवंतरावांच्या अहमदाबाद भेटीच्या वेळी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. महागुजरातचे प्रश्नावर अशांतता कायम ठेवण्याचा परिषदेचा हा पूर्वनियोजित कट होता. अहमदाबाद शहर काँग्रेसच्या सभेत बोलताना यशवंतराव म्हणाले, ''विशाल द्विभाषिक राज्य स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात यांच्या मागण्या बव्हंशी मान्य झाल्या आहोत. महागुजरात मिळवावयाचा असेल तर लोकसभेतर्फेच मिळू शकेल. गुंडगिरीने, चळवळीने नव्हे.''  अहमदाबादला यशवंतरावांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या मोटारीवरील राष्ट्रध्वज काढून घेण्यात येऊन तो पायाखाली तुडविण्यात आला. वृत्तपत्रांनी या घटनेचा जोरदार निषेध केला. भाषिक राज्याचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे गोंधळ घालत होते. तरी यशवंतराव अडचणींना तोंड देऊन विशाल मुंबई राज्याचा जोरदार प्रचार करीत फिरत होते.   

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org