यशवंतराव चव्हाण (5)

:  १  :

यशवंतराव यांचा जन्म त्यांचे आजोळी देवराष्ट्र येथे १२ मार्च, १९१३ रोजी झाला.  देवराष्ट्र गांवाचा आसमंत ऐतिहासिक अवशेषांनी भरलेला.  गांवात लेणी व देवळे बरीच होती.  जुनी मंदिर म्हणजे सागरेश्वराचे.  त्याला 'सागरोबा' संबोधिले जाई.  देवराष्ट्र ही पूर्वी एका राजाची राजधानी होती.  यशवंतरावांचे बालपण देवराष्ट्रालाच गेले.  सागरोबा आणि सोनहिरा यांचे यशवंतरावांना बालपणापासून सान्निध्य लाभले.  सोनहिरा या छोट्या नदीच्या पाण्याने यशवंतरावांचा पिंड पोसला गेला.  त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील विटे.  वडील बळवंतराव चव्हाण यांचे विट्याला घर आणि छोटी शेती होती.  शेतीवर उपजीविका, तथापि उत्पन्न तुटपुंजे.  शेतीसाठी जनावरांचे गोठ्यात बैल होते आणि त्याचबरोबर दूधदुभत्यासाठी गाय-म्हैस पण होती.  खर्चाला हातभार म्हणून दुधाचे एक-दोन रतीब पण लावले होते.  त्यांपैकी एक रतीब होता एका जज्जांकडे.  विटे हे तालुक्याचे ठिकाण.  जज्जसाहेबांना बळवंतरावांनी एकदा विनंती केली की कुठेतरी नोकरी लावून द्या.  शिक्षण नव्हते म्हणून जज्जांनी आपल्या कोर्टात बेलिफाची नोकरी दिली.  विट्याला तीन-चार वर्षे नोकरी केल्यानंतर बळवंतरावांची बदली कराडला झाली.  पत्‍नी विठाबाई आणि ज्ञानोबा, राधाबाई, गणपतराव व यशवंतराव या मुलांसह बळवंतराव कराडला राहू लागले.  चव्हाण कुटुंब कराडला स्थिरस्थावर होते ना होते तेवढ्यात प्लेगची मोठी साथ सुरू झाली.  या साथीने बळवंतरावांचा बळी घेतला.  कुटुंबाचा आधार नाहीसा झाला.  कर्ता पुरुषच नाहीसा झाल्याने चव्हाण कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली.  ही घटना १९१७ मधील.

बळवंतरावांच्या निधानाचे वेळी थोरल्या ज्ञानोबाचे वय जेमतेम चौदा वर्षांचे, गणपतराव दहा वर्षाचे आणि यशवंतराव चार-पाच वर्षांचे होते.  या तिघा भावंडांना वडिलांच्या मायेचे छत्र अल्पकाळ लाभले.  आई विठाबाई मोठ्या धीराची बाई.  दुःखाची कुर्‍हाड कोसळली असताना तिने आपल्या मुलांना धीर देऊन त्यांचे संगोपन मोठ्या जिद्दीने केले.  ज्ञानोबा नोकरीच्या वयाचे झाल्यावर विठाबाई त्यांना बरोबर घेऊन डिस्ट्रिक्ट जज्जांना (जिल्हा न्यायाधीश) भेटण्यासाठी सातारला गेल्या.  कोरेगाव रेल्वे स्टेशन ते सातारा हा प्रवास त्यांनी बैलाच्या छकड्याने केला.  बरोबर वडिलांचे बेलीफ मित्र शिंगटे होते.  त्यांची खूप मदत झाली.  कराडला जे सबजज्ज होते ते सज्जन आणि दयाळू अंतःकरणाचे होते.  जिल्हा न्यायाधीश हे इंग्रज गृहस्थ होते.  सब जज्जांनी त्यांना सगळी हकीकत समजावून सांगून त्यांचे मन वळविले आणि ज्ञानोबांना कराडला बेलिफाची नोकरी देवविली.  मुलाला नोकरी मिळाली पण कराडसारख्या शहरात प्रपंचाचा गाडा कसा हाकायचा ही विठाबाईंची विवंचना दूर होऊ शकली नाही.  मुलाबाळांचे शिक्षण करावे, त्यांना पोटभर जेऊ-खाऊ घालावे, त्यांच्या अंगावर बर्‍यापैकी कपडे असावे ही मनीषा कशी पुरी करायची हा प्रश्न भेडसावत राहिला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org