यशवंतराव चव्हाण (49)

१९४६ पासून यशवंतरावांचा अनंतरावांच्यावर लोभ आणि विश्वास. 'सकाळ' मध्ये जेष्ठता प्राप्‍त केलेला हा पत्रकार 'सकाळ' सोडून नवी जबाबदारी घेईल का असा विकल्प क्षणभर यशवंतरावांच्या मनात आला. पण तो न दर्शविता यशवंतराव म्हणाले, ''अनंतराव नव्या पत्राची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा आहे, तुमच्याखेरीज दुसरा विश्वासू काँग्रेसजन मला दिसत नाही.''  अनंतरावांच्या पुढे प्रश्न उभा राहिला. यशवंतरावांच्या इच्छेला मान द्यायचा की नम्र नकार दर्शवायचा. अनंतराव म्हणाले, ''साहेब, तुमच्या शब्दाखातर अंधारात उडी मारायलाही मी तयार आहे. अट फक्त एकच - यशवंतराव चव्हाणांच्या धोरणांना, निर्णयांना वृत्तपत्रातून मी उचलून धरीन. काँग्रेसच्या धोरण-निर्णयांना पाठिंबा देण्यास मी बांधील राहणार नाही. मला काँग्रेसच्या नेत्यांचा, आमदार, खासदार, मंत्र्यांचा हस्तक्षेप चालणार नाही. माझे सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य द्या, मी दैनिक वृत्तपत्र यशस्वीपणे चालवून दाखवीन.''

दैनिक वृत्तपत्र म्हटले की जागा, छापखाना, माणसे, पैसे आदि जुळवाजुळव आलीच. यशवंतरावांनी हे काम नाईक-निंबाळकर आणि अनंतराव पाटील यांचेवर सोपविले. मालोजीराजे यांनी बडोदे नरेश फत्तेसिंह महाराज गायकवाड यांच्याकडून एक लक्ष रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून मिळविले. सुरुवातीला चित्रशाळा प्रेसमध्ये वृत्तपत्राच्या छपाईची व्यवस्था करण्यात येऊन त्यांचेकडूनच कचेरीला जागा मिळविण्यात आली. संपादकीय, व्यवस्थापकीय खात्यातील सहकार्‍यांची जुळवाजुळव, संपादक अनंतराव पाटील यांनी केली. तत्पूर्वी 'सकाळ' मधील सहसंपादकपदाचा राजीनामा त्यांनी दिला. प्रथम दैनिकाच्या नांवाचे दृष्टीने, रजिस्टेशनच्या दृष्टीने कामाला जुंपून घेतले. दैनिकाचा पहिला अंक दिनांक ३० मे रोजी प्रकाशित व्हावा अशी सूचना त्यांना देण्यात आली होती. ''सह्याद्रि'' हे नांव यशवंतरावांनी पसंत केले होते. त्याप्रमाणे अर्जही करण्यात आला. तथापि केसरी-मराठा संस्थेचे 'सह्याद्रि' नांवाचे मासिक अधूनमधून निघत होते म्हणून त्यांनी हरकत घेतली. यातून मार्ग काढण्याकरिता सह्याद्रिच्या मागे विशाल हा शब्द टाकून ''विशाल सह्याद्रि'' नांवाला परवानगी मिळविण्यात आली. पहिल्या संपादकीय मजकुरात पत्राच्या ध्येय-धोरण-कार्यक्रमाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. मतपत्राऐवजी वृत्तपत्र यावर अधिकाधिक भर दिला जाईल अशी ग्वाही देण्यात आली होती. थोड्याच दिवसांत ''विशाल सह्याद्रि ट्रस्ट'' नांवाची विश्वस्त संस्था स्थापन करण्यात येऊन या संस्थेकडे पत्राची मालकी-व्यवस्थापन देण्यात आले. विश्वस्त पत्र तयार करून ते नोंदविण्याचे कामी माजी लीगल रिमेम्ब्ररन्स श्री. धुरंधर यांनी खूप मदत केली. पहिल्या विश्वस्तांमध्ये फत्तेसिंह गायकवाड, मालोजीराजे नाईक-निंबाळकर, के. के. शहा आणि रा. ब. उर्फ बाबासाहेब घोरपडे या चौघांचा समावेश करण्यात येऊन गायकवाड महाराजांना चेअरमन आणि घोरपडे यांना सेक्रेटरी करण्यात आले. वर्षभराने चित्रशाळा प्रेसमधून दैनिक हलवून भावे स्कूलनजीकच्या पेंडसे यांचे जागेत नेण्यात आले. तेथे स्वतःच्या मालकीची शेड उभारून छपाईची यंत्रसामुग्री बसविण्यात आली. १९६१ मधील पानशेत धरणफुटीने पुराचे पाणी प्रेसमध्ये-कचेरीत शिरून अतोनात नुकसान झाले. यशवंतरावजींच्या समवेत पंतप्रधान नेहरूंनी प्रेसला भेट दिली, नुकसानीची पाहणी केली. विश्वस्तांना आणि संपादकांना धीराचे दोन शब्द सांगून 'आगे बढो' हा संदेश दिला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org