यशवंतराव चव्हाण (47)

महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, सामान्य जनता यांना यशवंतराव मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद वाटला. म्हणूनच सत्काराचा पहिला मान मुंबईमधील गोदी कामगारांनी मिळविला. २१ ऑक्टोबरला पुण्यात काँग्रेस-भवनवर सत्कार झाला आणि सातार्‍यातील कामगारांच्यावतीने २८ ऑक्टोबरला मुंबईत सत्कार झाला. या सर्व सत्कारप्रसंगी यशवंतरावांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. यशवंतराव म्हणाले, ''द्विभाषिक राज्य हे आव्हान असून महाराष्ट्र त्यात यशस्वी होईल अशी मी खात्री देतो. आपला सर्व कारभार स्वच्छ आणि खुला राहील. आंत एक, बाहेर एक अशी लपवाछपवी राहणार नाही. लोकांची सेवा करण्याचे साधन या दृष्टिकोनातून मी सत्तेकडे पाहतो. सेवेचे कंकण बांधून मी कामाला सुरुवात केली आहे. माझ्या कचेरीचा दरवाजा सर्वांना सतत खुला राहील. मी चुकतो आहे असे कोणाला वाटले तर त्याने हक्काने मला येऊन सांगावे. चूक असेल तर मी दुरुस्त करीन. मला सर्वांचे सहकार्य हवे आहे. मी शेतकर्‍यांच्या भल्यासाठी झटेन. खेड्यातील दारिद्र्याची आणि अंधःकाराची मला कल्पना आहे. ते कमी व्हावे यादृष्टीने माझे प्रयत्‍न राहतील.

नव्या मुंबई राज्याच्या उद्‍घाटन प्रसंगी जनतेला जो संदेश दिला त्या संदेशात यशवंतराव म्हणाले, ''आज दिवाळीचा सण आहे, म्हणूनच या दिवसाला मंगल स्वरूप प्राप्‍त झाले आहे. आपल्या नव्या राज्यात पांच कोटी लोकसंख्या असून १ लाख ९० हजार चौरस मैल प्रदेश आहे. क्षेत्रफळ, उत्पन्न आणि आर्थिक विकास क्षमता, औद्योगिक प्रगती याचा विचार केला तर आपल्या राज्याची इतर कोणतेही राज्य बरोबरी करीत नाही. सर्व मराठी आणि गुजराथी बांधव एकत्र आले आहेत आणि मुंबईसह या विशाल राज्याला आपण पुढे नेणार आहोत. लोकशाही समाजवादी समाजरचनेचे जे ध्येय साध्य करण्याचा भारताने निर्धार केला आहे, त्याला अनुसरूनच नव्या राज्याचा कारभार चालविला जाईल. या कामी विरोधी पक्षांचे सहकार्य मी घेऊ इच्छितो. उत्पादनवाढ, आर्थिक व सामाजिक समता, बेकारी निवारण आदि उद्दिष्टांचे पूर्ततेसाठी सर्व राजकीय पक्षांना सरकारशी सहकार्य करता येईल. लोकशाहीत हे गृहीत धरलेले आहे. सरकारवर चुकांबद्दल टीका जरूर व्हावी. तथापि त्या टीकेचे स्वरूप विधायक व तात्विक असावे, विघातक वा वैयक्तिक नसावे. वृत्तपत्रे ही मोठी शक्ती आहे.

त्यांनी सरकारला सहकार्य द्यावे असे मी त्यांना आवाहन करतो. लोकहिताच्या योजनांना जनतेची साथ मिळवून देण्याचे कामी वृत्तपत्रांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. नव्या राज्यात जात, धर्म, भाषा असा भेद न करता निःपक्षपातीपणे कारभार केला जाईल. झाले गेले विसरून निर्मळ मनाने आपण सर्वजण कामाला लागू या.''  यशवंतरावांनी जनतेशी हितगुज करताना आपली भूमिका, आपले धोरण आणि धारणा स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. थोरांचे आशीर्वाद मागितले. बरोबरीच्यांचे सहकार्य मागितले आणि लहानांचे साहाय्य अपेक्षिले. नवे राज्य यशस्वी करून दाखविण्याबाबत विश्वास व्यक्त केला. शेवटी परमेश्वराजवळ प्रार्थना केली की लोकांची अधिकाधिक सेवा करण्यासाठी शक्ती-बुद्धी दे !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org