यशवंतराव चव्हाण (43)

यशवंतराव भाषणात म्हणाले, ''मुंबई महाराष्ट्रात नको असे आपण कधीही म्हटलेले नाही. मुंबई मिळाली नाही याचे मला दुःख आहे. पण मुंबई मिळत नाही म्हणून देश जाळावयाचा आहे की काय ?  काँग्रेसबाहेर पडा आणि झगडा करा असे सांगण्यात येत आहे. झगडा कुणाशी करावयाचा ?  भावाशी कां !   झगड्याने, वैराने मुंबई मिळणार नाही. लढ्याची भाषा बंद झाली पाहिजे. साधनांचा स्वीकार विचार करून करावयाचा असतो. साध्याबरोबर साधनही महत्त्वाचे असते. गांधीजींनी हे आम्हांस शिकविले आहे. गांधी-नेहरूंना आम्ही मानतो, मोठे म्हणतो म्हणून काहींची तक्रार आहे. ज्यांनी मातीतून सोने काढले त्यांना मोठे कां म्हणू नको !  ज्यांनी स्वातंत्र्यदिनाचे दिवशी घरावर काळे झेंडे लावले त्यांना मोठे म्हणू ?  कणाकणाने राबून ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, शेवटी आपला प्राणही दिला त्यांना मी मानणार, मोठे म्हणणार. यासाठी कुणी ''सूर्याजी पिसाळ'' म्हणत असेल तर त्याची मला पर्वा नाही. मी सूर्याजी पिसाळ तर या प्रश्नात शिवाजी आणि औरंगजेब कोण !  शिवाजी काय काळी निशाणे घेऊन हिंडतो !  यशवंतराव चव्हाण पालापाचोळ्यासारखा राजकारणातून उडून जाणारा नाही. चव्हाणाचा पिंड कृष्णेच्या पाण्यावर आणि मातीवर वाढलेला आहे. चव्हाणाच्या कांही जीवननिष्ठा आहेत, कांही मूलभूत विचार आहेत.''

सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे बोलताना यशवंतराव म्हणाले, ''भारतनिष्ठा, काँग्रेसनिष्ठा आणि शांततेचा मार्ग या मी माझ्या तीन मर्यादा मानल्या आहेत. आईशी भांडण्याचा हक्क जरूर बजावा. पण एकदा आईने सांगितले की मार्ग हा आहे, त्यावेळी आईचे ऐकायला हवे. लढा, बंड, असहकाराची भाषा ऐकायला मिळते. दिल्लीशी दोन हात करायचे म्हणजे काय ?  कोण दिल्लीपती आणि कोण महाराष्ट्र !  'काँग्रेसपेक्षा देश मोठा आहे' ही माझी पूर्वीपासूनही भूमिका आजही कायम आहे. देवाजवळ मागताना मी सुराज्य मागतो. स्वातंत्र्य टिकावे असेही मागतो. काँग्रेसच जगावी असे मागत नाही. मन स्वच्छ असायला हवे. ''लढू या'' असे शब्द वापरून लोकांची फसवणूक कशाकरिता करायची ?  संयुक्त महाराष्ट्रासाठी ''रक्त द्या'' असे कोणीतरी म्हटले आहे. मी म्हणेन रक्त सांडण्याची गरज नाही, घाम गाळण्याची गरज आहे. जे राज्य मिळाले आहे ते अपूर्ण आहे. तथापि ते राज्य उत्तम रीतीने, नेकीने, कुशलतेने चालविण्यानेच आपण मुंबई मिळविणार आहोत. मुंबईवर महाराष्ट्र अवलंबून आहे आणि मुंबईवर सार्‍या देशांचे जीवन अवलंबून आहे. भौगोलिकदृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे मान्य केले गेले आहे. काळवेळ लागेल पण मुंबई महाराष्ट्राला मिळेलच. योग्य मार्गाने जाऊन आपण मुंबई मिळवू या. विरोधकांपैकी ज्यांनी मला शिव्या ऐकविल्या त्याचे मला वाईट वाटले नाही. मी मनाने निश्चित केले आहे की शिवीला शिवीने उत्तर द्यायचे नाही, त्याबद्दल तक्रार करायची नाही. विरोधकच कंटाळतील आणि त्यांना सुविचार सुचेल. माझे विचार कार्यकर्त्यांना पटलेले आहेत. कार्यकर्त्यांनी आता विचारांच्या प्रसाराचे काम करावयाचे आहे.''  यशवंतरावांनी सातारा जिल्ह्याचा चार दिवसांचा दौरा केला. कोरेगांवला सभा झाली, नंतर पुसेसावळी येथे. दोन्ही ठिकाणी निदर्शनाचा प्रयत्‍न झाला. गोळीबार करावयाचा नाही अशी ताकीद यशवंतरावांनी पोलिसांना देऊन ठेवलेली होती. त्यानंतर कराडला कार्यकर्त्यांची फार मोठी सभा झाली. फलटणच्या बैठकीतील आपली भूमिका त्यांनी सर्वांना पटेल या भाषेत समजावून दिली. लोकांनी मोठ्या संख्येने यशवंतरावांचे स्वागत केले आणि त्यांना निरोप दिला. विरोधकांची निदर्शने फुसकी ठरली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org