यशवंतराव चव्हाण (39)

शंकरराव देव यांनी पांच दिवसांचे उपोषण समाप्‍त केल्यावर (नोव्हेंबर २६) श्री. हिरे यांच्या समवेत दिल्लीला प्रयाण केले. पंडित पंत यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी जात आहोत असे त्यांनी आपल्या निकटवर्तियांना सांगितले होते. देवांच्या दिल्लीतील मुक्कामात महाराष्ट्र काँग्रेसमधील मतभेदाचा स्फोट करण्यात आला. सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने फलटणला एक सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेला यशवंतराव चव्हाण, नाईक-निंबाळकर आणि गणपतराव तपासे हे तिन्ही मंत्री उपस्थित होते. मोरारजींनी त्रि-राज्य योजना असेंब्लीत मांडली तेव्हा राजीनामा कां दिला नाही हे कार्यकर्त्यांना समजावून सांगावे हा हेतू फलटणच्या सभेच्या मागे होता. या सभेत शंकरराव देवांवर प्रखर हल्ला करण्यात आला. भाऊसाहेब हिरे यांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे करण्यात आला. काँग्रेस पक्षाचा आदेश नसताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आमदारांकडून राजीनामे घेण्याचे पाऊल उचलणे योग्य नव्हे असे सांगून यशवंतराव चव्हाण म्हणाले, ''राजीनामे, संप, उपोषण अशा प्रकारच्या दबाव तंत्राचा काहीही उपयोग होणार नाही. देवांनी काँग्रेसचे नांव घेऊन हे तंत्र वापरू नये, कारण ते काँग्रेसचे सभासद नाहीत.''  फलटणच्या सभेत यशवंतरावांनी केलेल्या आणखी एका विधानाबद्दल खूपच गदारोळ झाला. ''संयुक्त महाराष्ट्र की नेहरू असे मला कोणी विचारले तर ती नेहरूंच्या बाजूने कौल देईन'' हे ते विधान होय. नेहरूंच्या धोरणाचा पाठपुरावा म्हणजे महाराष्ट्र विरोधी धोरणाचा पाठपुरावा चव्हाण करीत आहेत अशी टीका सुरू झाली. यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राची व मुंबई शहराची मागणी सोडून दिलेली नव्हती आणि त्याचा निर्वाळा फलटणच्या सभेत दिलेला होता. र. के. खाडिलकर, माधवराव बागल आदींनी चव्हाणांच्यावर कडाडून हल्ला चढविला. हिरे यांचे नेतृत्व चव्हाणांनी झुगारून दिले याबद्दल बागलांनी विशेष दुःख प्रगट केले. यशवंतरावांची भूमिका हिरे नेतृत्वाचे विरोधी नव्हती किंवा संयुक्त महाराष्ट्र विरोधी पण नव्हती. आपली मागणी न्याय्य आहे हे राष्ट्रीय पुढार्‍यांना पटवून द्यायला हवे, तसेच मुंबई महाराष्ट्रात घातल्याने कुणी धास्ती बाळगण्याचे कारण नाही याचीही खात्री पटवून द्यायला हवी अशी त्यांची भूमिका होती. त्रि-राज्य योजना फेटाळणे म्हणजे महाराष्ट्राच्या जवळ येत असलेल्या विदर्भास दूर ढकलणे असे होईल. विरोधकांचे मार्ग वेगळे आहेत. त्या मार्गाने महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने जाणे हिताचे ठरणार नाही असेही यशवंतरावांनी स्पष्ट केले.

यशवंतरावांची लोकशाहीवर नितांत निष्ठा होती. मतस्वातंत्र्याबाबत आणि निर्भयपणे मतप्रदर्शन करण्याबाबत ते आग्रही होते. त्यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्यांच्यावर ते कधी तुटून पडले नाहीत. त्यांचा संयम दांडगा होता. हिरे आणि चव्हाण यांच्यात शंकरराव देवांमुळे जो दुरावा निर्माण झाला होता त्याचे शल्य यशवंतरावांना अधिक जाणवत होते. हिरे यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना, ग्रामीण भागातील जनतेला, शेतकर्‍यांना अधिक उपयुक्त ठरू शकेल अशी त्यांची धारणा होती. हिरे आणि चव्हाण यांच्यात एकोपा राहणे हे महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने आवश्यक आहे हे जाणून उभयतांतील दुवा म्हणून वसंतदादा पाटील आणि नरुभाऊ लिमये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नरुभाऊ हे भाऊसाहेब हिरे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाऊ लागले होते. तथापि नरुभाऊंनी यशवंतरावांना भेटण्याची, त्यांची आणि भाऊसाहेबांची दिलजमाई घडवून आणण्याची खटपट चालू ठेवली होती. अमूक हिरे गटाचा, तमूक चव्हाण गटाचा ही भाषा यशवंतरावांना आवडायची नाही. ते म्हणायचे, मतभेद म्हणजे गट नव्हेत. लिमये, वसंतदादा आणि मंडळींनी यशवंतराव आणि भाऊसाहेबांची भेट एके दिवशी घडवून आणली. दोघांना एका खोलीत बसवून चर्चा करावयास लावली तासाभराने ते दोघेजण हातात हात घालून हसत खोलीच्या बाहेर आले. कार्यकर्त्यांना आनंद वाटला. मने स्वच्छ असल्यावर असे घडणारच याचा दादांना आणि नरुभाऊंना विश्वास वाटत होता आणि तो खराही ठरला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org