यशवंतराव चव्हाण (28)

:   ४   :

खेरांच्या मंत्रिमंडळात मोरारजीभाई देसाई यांना गृहमंत्रिपद देण्यात आले होते. बाळासाहेब खेर यांना भेटावे म्हणून यशवंतराव गेले असताना मोरारजीभाईंची भेट झाली. त्यांनी यशवंतरावांची आस्थेने चौकशी करून गृहखात्याकडे पार्लमेंटरी सेक्रेटरीपद घ्याल कां असे त्यांना विचारले. यशवंतरावांनी मोरारजीभाईंना होकार दर्शविला. मोरारजीभाई पूर्वी सरकारी नोकरीत 'साहेब' होते. त्यांना प्रशासनाचा अनुभव होता. ते साहेब होते तरी त्यांनी यशवंतरावांशी संबंध ठेवताना साहेबीपणा कधी दर्शविला नाही. दोघांनाही एकमेकांच्या कर्तृत्वाचा चांगला अंदाज होता. आपल्याकडे आलेला कामाचा चोखपणे उरक करून यशवंतरावांनी मोरारजींचा विश्वास संपादन करण्यात अल्पकाळात यश मिळविले. १९४८-४९ च्या दरम्यान हिंदु-मुसलमानांत दंगे सुरू झाल्यावर नागरिकांच्या संरक्षणासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे हे यशवंतरावांनी हेरले. होमगार्ड संघटना उभी केल्यास तिचा चांगला उपयोग होईल असे त्यांच्या मनाने ठरविले. यासंबंधात एक योजना त्यांनी सादर केली. 'होमगार्ड'च्या रुपाने संरक्षणसिद्ध अशी नागरिकांची एक पलटणच उभी राहिली. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत जे गुन्हेगार शिरले होते, त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी यशवंतरावांवर सोपविण्यात आली. पुष्कळसे गुन्हेगार बाहेर आले. कित्येक पोलिसांच्या तावडीत सांपडले. कित्येक बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडले. सखाराम बारबटे याचे नांव वृत्तपत्रात खूप गाजले. वाळवे तालुक्यातील भाऊबंदकीने डोके वर काढले. आमदार चंद्रोजी पाटील यांच्या खुनाचा आळ कांही हितसंबंधी लोकांनी यशवंतरावांचे मित्र के. डी. पाटील यांच्यावर घातला. त्यांच्याविरुद्ध काहून उठवून यशवंतरावांनाही या प्रकरणी बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्‍न केला गेला. खरे तर चंद्रोजी पाटलांबद्दल यशवंतरावांना आदर होता आणि कारभारी चंद्रोजी यांचे पण यशवंतरावांवर मुलाप्रमाणे प्रेम होते. तथापि भाऊबंदकी, गांवातील मतभेद यातून प्रकरण उद्‍भवले. के. डी. पाटील हे तरुण वकील, आमदार, उमद्या मनाचे. त्यांच्या हातून असा प्रकार घडणे अशक्य असेच बहुसंख्यांचे मत होते. तथापि वाळवे तालुक्यातील कांही मंडळींनी विखारी प्रचार करून के. डी. पाटलांचा नाहक बळी घेतला. आपल्या निरपराध मित्राचा अमानुषपणे खून व्हावा याचे यशवंतरावांना अतोनात दुःख झाले.

खेर मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत दक्षिणी संस्थाने विलीन झाली. संस्थानी मुलुख मुंबई राज्यात सामील झाला. त्यामुळे त्या भागाला प्रतिनिधित्व मिळणे क्रमप्राप्‍त झाले. मंत्रिमंडळात वाढ करण्याची गरज निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण आणि डॉ. जीवराज मेहता यांची संभाव्य मंत्री म्हणून नांवे वृत्तपत्रातून झळकू लागली असताना वेगळेच घडले. सातारा जिल्ह्यातून फलटणचे राजेसाहेब मालोजीराव नाईक निंबाळकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यावेळी यशवंतरावांनी भूमिका मांडली की संस्थानातील प्रतिनिधी वाढल्यामुळे राजेसाहेबांना मंत्रिपण देणे सयुक्तिक ठरेल. गणपतराव तपासे आणि मालोजीराव नाईक निंबाळकर ही जोडी मोरारजींची पाठराखी आहे, पर्यायाने बाळासाहेब खेरांचीही ती माणसे आहेत अशी टीका त्यावेळी झाली. तथापि राजे नाईक निंबाळकरांनी यशवंतरावांना वेळोवेळी ज्या पद्धतीने पाठिंबा दिला, त्यांच्या पाठीशी राजेसाहेब उभे राहिले, त्याची अनेकांना कल्पना आली नाही. फलटणची गाजलेली सभा घेण्यात आणि प्रतापगडावरील पंडित नेहरूंची सभा आयोजण्यात मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. राजेसाहेब पुरोगामी विचारांचे होते. शेतकरीप्रेमी होते, बहुजन समाजाविषयी त्यांना कळवळा होता. खेरांच्या राजवटीत बहुजन समाजाची उपेक्षा केली जात होती, हितसंबंधियांचे कोडकौतुक केले जात होते. बाळासाहेब खेर सांगूनही ऐकत नाहीत अशा आमदारांच्या तक्रारी सुरू झाल्या असेंब्लीतील ७५-८० आमदार एकत्र येऊन मुंबईत पाठोपाठ दोन बैठका घेण्यात आल्या. एका बैठकीचे अध्यक्ष होते यशवंतराव आणि दुसरीचे शंकरराव मोरे. भाऊसाहेब राऊत यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली, त्या बैठकीत काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार गट स्थान करण्याचे ठरले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org