यशवंतराव चव्हाण (22)

जिल्ह्यात पांडू मास्तरांचा लौकिक होता.  कामेरीहून मोर्चा पुढे सरकल्यावर इस्लामपूरच्या अलीकडेच पोलिसांनी गोळीबार करून लोकांना पांगविण्याची कारवाई केली.  पांडू मास्तर व त्यांच्या प्रमुख सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली.  गोळीबारामुळे लोक चिडून गेले आणि त्यांनी अधिक उत्साहाने काम करण्यास सुरुवात केली.  जनआंदोलनाच्या शक्तीचा प्रभाव किती असतो आणि सर्वसामान्य जनता त्यागाला, बलिदानाला कशी तयार होते याचा प्रत्यय ब्रिटिश अधिकार्‍यांना आला.  कराड, पाटण, वडूज, इस्लामपूर आदि ठिकाणचे मोर्चे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील सातारा जिल्ह्याचे सोनेही पान म्हणावे लागेल.

सातारा जिल्ह्यात कराड, कुंडल, सांगली ही चळवळीची केंद्रे होती.  नाना पाटील, जी. डी. पाटील, वसंतदादा पाटील आदि मंडळी लोकांना संघटित करून सरकारला त्राहि भगवान करून सोडीत होते.  वाळवे-शिराळा भाग बरडे गुरुजींनी पिंजून काढला होता.  ते त्यांच्या क्रांतिकारी पद्धतीने काम करीत होते.  कवठ्याचे किसन वीर हे प्रवासात असताना पुण्यात पोलिसांकडून पकडले गेले.  त्यांना येरवडा तुरुंगात डांबण्यात आले.  त्यांनी यशवंतरावांना निरोप पाठविला की, संधीची वाट पाहात आहोत, तुरुंग फोडून बाहेर येण्याची योजना आंखीत आहोत.  तीन महिने झाले आणि एके रात्री किसन वीर, छन्नूसिंग, पांडू मास्तर तुरुंग फोडून बाहेर पडले आणि कराडच्या आसपास यशवंतरावांना भेटले.  रेठरे (बुद्रुक) येथे ढवळ्यांच्या मळ्यात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक यशवंतरावांनी आयोजित केली होती.  तिला काशिनाथपंत देशमुख, कुर्‍हाडे, सांगलीचे धुळाप्पा नवले, वाळव्याचे बरडे गुरुजी, कासेगांवकर वैद्य, पाटणचे विठ्ठलराव घाडगे, कराडातील शांताराम इनामदार, सदाशिव पेंढारकर, व्यंकटराव माने, माधवराव जाधव आदि बरेच जण हजर होते.  मोर्चात लोक सहभागी होतात, सरकारविरुद्ध वातावरण तयार होते हे खरे असले तरी गोळीबारामुळे जीवितहानी होते, कार्यकर्ते गोळ्यांना बळी पडतात म्हणून मोर्चाचा कार्यक्रम बदलून दुसरा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरले.  युद्ध प्रयत्‍नांना खीळ घालावयाची असेल तर युद्धसाहित्य घेऊन जाणार्‍या मालगाड्या रोखून धराव्यात, रेल्वे लाईन नादुरुस्त करावी, रेल्वे स्टेशन्स जाळावीत अशा सूचना पुढे आल्या.  हे कार्यक्रम हाती घेण्यास संमती देण्यात आली.  या नवीन कार्यक्रमांबाबत यशवंतरावांनी ठिकठिकाणी कळविण्याची व्यवस्था केली.  यशवंतराव हे चळवळीची सूत्रे हलवितात म्हणून त्यांना पकडा असे पोलिसांना आदेश देण्यात आले.  चव्हाणांना पकडण्यासाठी सरकारने एक हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.  रेठरे येथील बैठक संपल्यानंतर साधारणपणे एके ठिकाणी एकदोन दिवसांपेक्षा जास्त राहावयाचे नाही असा नियम करून यशवंतराव सारखे स्थान बदल करीत होते.  कराडातही ते पाच-सहा ठिकाणी अदलून बदलून राहात असत.  नंतर त्यांनी कराड सोडले व पार्ले गांठले.  यशवंतराव पाटील पार्लेकर यांचेकडे दोन दिवस थांबले.  तेथून निघून मसूर-खराडे गांवच्या हद्दीतील दत्तोबा काटकर यांचेकडे गेले.  काटकरांनी उभ्या पिकात झोपडी बांधून देऊन यशवंतरावांची राहण्याची व्यवस्था केली.  या ठिकाणी कार्यकर्ते यशवंतरावांना भेटून त्यांचा सल्ला घेत.  संभाजीराव थोरात, आत्माराम बापू जाधव, माधवराव जाधव येऊन भेटत.  भूमिगत चळवळ आणि या चळवळीतील धामधुमीचे जीवन जगत असताना यशवंतरावांना खूप चांगले स्नेही व सहकारी मिळाले.  त्यांचा स्नेह नंतरही खूप वर्षे लाभला.  यशवंतरावांनीही या स्नेह्यांची, सहकार्‍यांची, कार्यकर्त्यांची शेवटपर्यंत आठवण ठेवली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org