यशवंतराव चव्हाण (20)

गांधीजी या बैठकीला हजर राहिले आणि त्यांनी चर्चेत भाग घेतला.  गांधीजींच्या भूमिकेला नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आणि ठराव एकमताने करण्यात आला.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक मुंबईत ७ ऑगस्टला बोलावण्यात आली.  या बैठकीतील निर्णयाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फार मोठे कुतूहल निर्माण झाले होते.  यशवंतरावांनी आपल्या मित्रांसमवेत मुंबईला जाण्याचे ठरविले.  के. डी. पाटील, चंद्रोजी पाटील, तात्यासाहेब कोरे आदींच्या समवेत यशवंतराव मुंबईला गेले.  विवाह होऊन अवघा महिना दीड महिना लोटलेला होता.  राजकारणातील सहभागाची पत्‍नीला त्यांनी फारशी कल्पना दिलेली नव्हती.  मुंबईला प्रयाण करण्यापूर्वी बंधू गणपतरावांना मात्र कल्पना दिली होती.  

अखिल भारतीय काँग्रेसची बैठक ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईला गवालिया टॅन्क मैदानावर झाली.  जनतेची अलोट गर्दी जमली होती. लोकांचे कुतुहल आणि उत्साह ओसंडून जात होता.  पंडित जवाहरलाल नेहरूंनी ''भारत छोडो''चा ठराव मांडला.  त्यावर प्रदीर्ष भाषण करून ठरावामागील भूमिका स्पष्ट केली.  ''करेंगे या मरेंगे'' (करू अथवा मरू) असा निर्धार व्यक्त करण्यात येऊन लढ्याचे आवाहन करण्यात आले.  गांधीजींचेही भाषण झाले.  त्यांनी सांगितले की आजपासून तुम्ही स्वतंत्र झाला आहात असे समजून कामास लागा.  हा अखेरचा लढा असून ''करू किंवा मरू'' हा या स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र आहे समजा.  दुसर्‍या दिवशी ९ ऑगस्टची पहाट उजाडताच लोकांना समजले की, गांधी, नेहरू, पटेल, आझाद आदि नेत्यांची सरकारने रात्रीच धरपकड केली असून त्यांना पुण्याकडे नेले आहे.  जनता रस्त्यावर आली.  हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांनी मुंबई शहर दणाणून गेले.  दगडफेक, लाठीमार, अश्रुधूर हे प्रकार ठिकठिकाणी सुरू झाले.  ब्रिटिशांनी दडपशाहीचा वरवंटा फिरविण्यास सुरुवात केली.  यशवंतरावांनी मित्रांशी चर्चा केली.  मुंबई शहर सर्वांनी एकत्रपणे सोडून न जाता आपापल्या पद्धतीने गांवी परतायचे, पोलिसांच्या हाती सांपडायचे नाही, असे ठरविण्यात आले.  यशवंतराव मुंबईत एक दिवस मागे राहिले आणि दहा ऑगस्टला रात्री पुण्यास पोहोचले.  पुण्यातही निदर्शने, मोर्चे, मिरवणुका आदि कार्यक्रमामुळे वातावरण तंग झाले होते.  यशवंतरावांनी रात्री रेल्वे पकडली आणि तिसर्‍या वर्गाच्या गर्दीच्या डब्यात बसून कराडच्या दिशेने प्रयाण केले.  कराडला उतरण्यात धोका आहे हे जाणून अलीकडच्या शिरवडे स्टेशनावर ते गाडीतून उतरले आणि मसूरच्या दिशेने पायी चालू लागले.  पहाट झाली होती.  रस्त्यात त्यांना कळले की, मसूरमध्ये बरीच धरपकड झाली आहे.  मसूरची वाट सोडून यशवंतराव इंदोलीच्या रस्त्याला हातात बॅग घेऊन पायी चालू लागले.  एक अनोळखी माणूस भेटला.  त्याचे समवेत यशवंतराव कृष्णा नदी ओलांडून इंदोलीच्या आसमंतात पोहोचले.  दिनकरराव निकमांना निरोप पाठवून बोलावून घेतले.  निकम हे एक कार्यकर्ते आणि पुढारी होते.  त्यांनी गांवाबाहेरच थांबून पुढे काय करावयाचे याबाबत यशवंतरावांशी चर्चा केली.  पोलिसांचे हाती सांपडायचे नाही हे चर्चेत ठरले.  एक दिवस इंदोलीत काढल्यावर यशवंतराव कराडला गेले.  तथापि आपल्या घरी न जाता स्नेही नारायणराव घाडगे यांचे घरी गेले व तेथे त्यांनी मुक्काम केला.  घाडगे मंडळींनी गणपतरावांना निरोप दिला.  थोड्या विश्रांतीनंतर पुढील कामाची आंखणी सुरू झाली.  शांताराम इनामदार व इतर कार्यकर्त्यांना एकत्र येण्याबाबत निरोप दिले.  विंगकरांच्या मोठ्या वाड्याच्या माडीवर सर्वजण एकत्र जमले, बोलणी झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org