यशवंतराव चव्हाण (19)

:  ३  :

१९४० मध्ये काँग्रेसने वैयक्तिक सत्याग्रहाचा निर्णय घेतला आणि देशातील वातावरणाला कलाटणी मिळाली.  काँग्रेसभवनवर जाऊन कार्यकर्ते सत्याग्रहासाठी आपली नांवे नोंदवू लागले.  श्री. काकासाहेब गाडगीळ व केशवराव जेधे यांनी सत्याग्रहाचा दिवसही निश्चित केला.  महायुद्धाला मदत करायची नाही, लष्करात भरती व्हायचे नाही, ब्रिटिशांचे बाजूने लढण्यासाठी एकही माणूस मिळू द्यायचा नाही, अशी घोषणा केली की, पोलिस सत्याग्रहींना पकडू लागले.  पुणे, ठाणे, नाशिक आदि ठिकाणचे तुरुंग राजबंद्यांनी भरून गेले.  या धामधुमीत यशवंतराव पुण्यात लॉ कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास करीत होते.  फर्स्ट एलएल. बी. परीक्षा उत्तीर्ण झाले होते आणि सेकंड एलएल.बी. चा विचार करीत होते.  सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळावी असा सातारच्या कार्यकर्त्यांनी आग्रह सुरू केला आणि यशवंतराव राजी झाले.  अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून त्यांनी सेकंड एलएल.बी. ची परीक्षा दिली.  परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते १९४१ मध्ये वकील झाले.  या सुमारास जर्मनीने रशियावर स्वारी केल्यामुळे युद्धाला गंभीर वळण लागले.  जपानने पूर्वेकडे ब्रिटिशांची लष्करी ठाणी उद्ध्वस्त करून सिलोन ब्रह्मदेशपर्यंत मुसंडी मारली.  १९४२ सालात काय होणार याकडे भारतीय जनतेचे लक्ष लागले.  सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी करून ब्रह्मदेशमार्गे भारताच्या सरहद्दीपर्यंत मजल मारली.  ''चलो दिल्ली'' ही गर्जना आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल भारतीय जनतेला दिलासा देऊ लागली.  काँग्रेसचे नेते आपापसात चर्चा करू लागले.  काँग्रेस कार्यकारिणीची बैठक वर्धा येथे भरून सुमारे आठ तास चर्चा, विचारविनिमय झाला.  ब्रिटिश साम्राज्यशाहीला शेवचा धक्का देण्याचे निश्चित करण्यात आले.  तसा ठरावही करण्यात आला.  अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाची तारीखही निश्चित करण्यात आली.  मुंबईत हे अधिवेशन ऑगस्टच्या ७ व ८ तारखेला भरेल असे जाहीर करण्यात आल्यावर ब्रिटिश सरकार अस्वस्थ झाले.  अधिवेशनापूर्वीच काँग्रेसला चिरडून टाकण्याचे मनसुबे इंग्रज सरकार रचू लागले.  तिकडे इंग्लंडमधील ब्रिटिश सरकार भारताला कांहीतरी आश्वासन देऊन अंतिम लढा टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करू लागले.  तथापि सरदार पटेलांनी जाहीरपणे सांगून टाकले की, काँग्रेसचा हा शेवटचा लढा असेल.  यात ब्रिटिशांचा शेवट होईल किंवा काँग्रेसचा.  ब्रिटिशांना या देशातून हुसकावून लावून आम्ही भारताला स्वतंत्र करणारच अशी गर्जना सरदारांनी केली.

१९४२ च्या प्रारंभी सर स्टॅफर्ड क्रिप्स कांही राजकीय सुधारणा घेऊन भारतात आले.  त्यांनी गांधीजी, बॅरिस्टर जिना, डॉ. आंबेडकर यांचेशी वेगवेगळी चर्चा केली.  तथापि कुणालाही क्रिप्स योजना मान्य झाली नाही.  अमान्यतेला एम. एन. रॉय हे एकटेच अपवाद होते.  क्रिप्स अपयश घेऊन मायदेशी परतले.  भारतात असंतोषाचे वातावरण वाढू लागले.  गांधीजींचे ''हरिजन'' पत्रातील लेख जहाल बनू लागले.  जपानने पूर्वेकडे अधिक आक्रमक पवित्रा घेताच गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला खणखणीत इशारा दिला की ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.  १९४२ च्या एप्रिल महिन्यात काँग्रेस वगि कमिटीची मिटिंग अलाहाबाद येथे झाली.  गांधीजींनी स्वच्छ शब्दांत कार्यकारिणीला कळविले की, ब्रिटिशांनी ताबडतोब भारत सोडून जावे, जपानचे काय करावयाचे ते आम्ही बघून घेऊ.  गांधीजी वर्धा येथे मुक्कामाला होते.  त्यांचे मन जाणून घेण्यासाठी नेत्यांची तिकडे रीघ लागली होती.  जुलैत वर्ध्यालाच वगि कमिटीची बैठक घेण्याचे ठरले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org