यशवंतराव चव्हाण (18)

लोकल बोर्डाची निवडणूक जिंकण्यास तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसला चांगली मदत केली.  या निवडणुकीत यशवंतरावांनी पुढाकार घेऊन के. डी. पाटील, किसन वीर, बाबासाहेब शिंदे (आखाडकर) आदी सहकारर्‍यांची मदत घेऊन काँग्रेस पक्षाला विजयी केले.  सातारा जिल्हा लोकल बोर्ड काँग्रेसच्या ताब्यात आले.  बाबासाहेब शिंदे हे जुने, निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते होते.  त्यांना जिल्ह्यात मान होता.  अध्यक्षपदाच्या लढतीत आनंदराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई हे दोन तरुण वकील उतरले.  आनंदरावांना कूपर गटातील लोकांनी पाठिंबा दर्शविला.  बाळासाहेब देसाईंना पाठिंबा देऊन निवडून आणावयाचे असे यशवंतरावांनी ठरविले.  देसाई निवडून आले.  कूपर गट पराभूत झाला.  या निवडणुकीपासून चव्हाण-देसाई खूप जवळ आले, त्यांचा स्नेह जडला आणि तो बरीच वर्षे टिकला.  आनंदराव चव्हाण मात्र निष्कारण दुखावले गेले.  या निवडणुकीत यशवंतराव चव्हाणांनी जीवाचे रान करून काँग्रेसचा प्रचार केला.  'लोकक्रांती' नांवाचे साप्‍ताहिक चालवून निवडणूक प्रचाराला मोलाचा हातभार लावला.  या साप्‍ताहिकातील लेखन यशवंतरावच करीत.  निवडणूक प्रचारात त्यांना आत्माराम पाटील यांची विशेष मदत झाली.

१९३८-३९ च्या दरम्यान महाराष्ट्रातील बुद्धिवादी तरुणांची संघटना बांधण्याचा प्रयत्‍न झाला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींनी त्यात पुढाकार घेतला होता.  या मंडळींवर बंगालमधील क्रांतिकारकांची छाप पडलेली होती.  ते सशस्त्र क्रांतीचा विचार करीत होते आणि तेवढ्यासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्‍न करीत होते.  यांपैकी काहीजण स्वतःला रॉयवादी म्हणवून घेत होते. रॉय गटाकडे यशवंतराव आकर्षित झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, जी. डी. पारीख. ह. रा. महाजनी, बॅरिस्टर वि. म. तारकुंडे आदि रॉयवादी कार्यकर्त्यांशी यशवंतराव चर्चा करीत. रॉय यांच्या विचारांशी आपली तार जुळते असे त्यांना मनोमनी वाटू लागले होते. आत्मारामबापू पाटील हे पूर्णतया रॉयवादी झाले होते.  यशवंतरावांनीही रॉय यांचे विचार स्वीकारून रॉयवादी व्हावे असा आत्मारामबापूंनी प्रयत्‍न करून पाहिला.  तथापि काँग्रेस सोडण्यास यशवंतरावांचे मन तयार होत नव्हते.  समाजवादी विचारसरणी त्यांना मान्य होती.  तथापि देशातील कोट्यवधी शेतकरी व कामगार यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नाची तड लावणे हे बिकट काम फक्त काँग्रेस संघटनाच करू शकेल असा विश्वास त्यांना वाटत होता.  गांधी-नेहरू हेच आपले नेते आहेत हे त्यांनी रॉयवाद्यांना स्पष्टपणे सांगितले होते.

१९३९ मध्ये तासगांवला परिषद घेण्यात यशवंतरावांनी पुढाकार घेतला. या परिषदेत मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात येऊन त्यांचा दौरा आंखण्याचा निर्णय घेण्यात आला. रॉय यांना नेते मानून रॉयवादी व्हावे की महात्मा गांधींच्या काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ते व्हावे यासंबंधी यशवंतराव मनाशी सारासार विचार करीत असतानाच दुसरे महायुद्ध सुरू झाले. रॉयवाद्यांनी ब्रिटिश सरकारशी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. रॉय गट काँग्रेसपासून दूर झाला आणि यशवंतराव हे रॉय गटापासून दूर झाले.  हिटलरच्या हुकूमशाहीचा पाडाव केल्यानंतर ब्रिटिश सरकार आपल्या हाती आपोआप स्वातंत्र्य देईल अशी रॉयवाद्यांनी भूमिका मांडावयास सुरुवात करताच, ब्रिटिशांशी लढा दिल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळायचे नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली. यशवंतरावांनी बुद्धीचा निकष लावला आणि जाहीर केले की काँग्रेसचीच भूमिका बरोबर आहे. साम्राज्यशाहीशी युद्धात सहकार्य केल्याने आपला कसलाच फायदा होणार नाही.  ब्रिटिश सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवणे हिताचे ठरणार नाही. काँग्रेसने यानंतर तीन वर्षांनी १९४२ साली सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व सातारा जिल्ह्यात यशवंतरावांकडे आले आणि त्यांनी आपण समर्थ नेतृत्व देऊ शकतो हे दाखवून दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org