यशवंतराव चव्हाण (116)

महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात खुद्द यशवंतरावांनी किती महत्त्वाची कामगिरी बजावली होती, हे सर्वश्रुत आहे. त्या कामगिरीचे मूल्यमापन इतिहासच करील. महाराष्ट्र व गुजरात ही दोन वेगळी राज्ये अस्तित्वात येण्यापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती ती यशवंतरावांनी मोठ्या चातुर्याने व संयमाने हाताळली. कोणतीही बाब असो, कटुता निर्माण होऊ न देता, ती सामोपचाराने सोडविली जावी, अशी त्यांची भूमिका असे. विरोधकांशी सौजन्याने वागण्याची व त्यांच्या मतांचा योग्य तो आदर करण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखी होती. या वृत्तीमुळेच त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळची सारी परिस्थिती कुशलतेने हाताळली. त्यांच्यातील श्रेष्ठ शासकीय कौशल्य त्यावेळी पणाला लागले होते. महत्त्वाच्या प्रत्येक बाबतीत ते आपल्या सहकार्‍यांना विश्वासात घेत असत. सहकार्‍यांवर विश्वास टाकून आणि त्यांना वाढत्या जबाबदारीची कामे करण्याची संधी देऊन, त्यांच्यातील शासकीय आत्मविश्वास वाढीला लावण्याचे यशवंतरावांचे धोरण मला तरी फार महत्त्वाचे वाटते.

महाराष्ट्राच्या मातीवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, मराठी भाषेवर आणि मराठी जनतेवर त्यांचे अपरंपार प्रेम होते. हे प्रेम केवळ प्रांतीय स्वरूपाचे नव्हते. भारताला बलवान करावयाचे झाल्यास, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, अशी त्यांची निष्ठा होती. ही निष्ठा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नव्हे, तर भारतातील प्रत्येक घटक राज्याची एकत्रित शक्ती, हीच भारताची संघशक्ती, अशी त्यांची व्यापक धारणा होती. याच राष्ट्रीय दृष्टिकोनातून ते महाराष्ट्राकडेही पहात.

- वसंतराव नाईक
---------------------------

'महाराष्ट्र राज्याला मोठे करण्यासाठी यशवंतरावांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे केले आणि या कार्यकर्त्यांना कामाला लावून अनेक संस्था उभ्या केल्या. राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्याला संस्थेचा पाया असला पाहिजे असे ते म्हणत. यातूनच महाराष्ट्रात सहकारी, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्था उभ्या राहिल्या. लोकशाही समाजवादातील संकल्पना त्यांनी महाराष्ट्रापुढे आणि देशापुढे मांडली. सहकारी चळवळीत सर्वांचा सहभाग व सर्वांना समान अधिकार ही नीती सांगितली.  यशवंतराव समाजवाद केवळ बोलत नसत तर तो आचरणात आणावा यादृष्टीने प्रयत्‍नशील राहात. महाराष्ट्राने देशाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होऊ नये, त्या प्रवाहातच रहावे हा त्यांचा ठाम दृष्टीकोन होता आणि १९५६-५७ पासून १९८० पर्यंत त्यांनी तो अंमलात आणला. मध्यंतरी वर्ष-दीड वर्ष, इंदिरा काँग्रेसपासून ते दूर राहिले. पण त्यात त्यांना बेचैनी वाटत असायची आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला की, मुख्य प्रवाहात जाण्यासाठी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करावयाचा. साहेबांनी आपला निर्णय अंमलात आणला. तथापि इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळण्यासाठी त्यांना वर्ष-सहा महिने थांबावे लागले. काही मिळविण्यासाठी, मागण्यासाठी यशवंतराव इंदिरा काँग्रेसमध्ये गेले नव्हते. त्यांच्यासारखा कुशल प्रशासक, लोकप्रिय नेता, सन्मित्र, सहकारी विरळा !

- अण्णासाहेब शिंदे

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org