यशवंतराव चव्हाण (113)

असे होते यशवंतराव !

यशवंतरावांच्याबद्दल स्वपक्षातील नेते-कार्यकर्ते अभिमानाने चांगले बोलायचेच पण त्याचबरोबर विरोधी पक्षातील कार्यकर्तेही आदराने आणि आपुलकीने बोलायचे. एस. एम. जोशी. ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, भाई माधवराव बागल, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, वि. स. पागे, अण्णासाहेब शिंदे, नरुभाई लिमये, संपादक गोविंदराव वळवलकर, दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार मो. ग. तपस्वी, निवृत्त लष्करी सेनापती ले. ज. एस. पी. थोरात, उद्योगपती नीलकंठराव कल्याणी, ह. भ. प. भास्करबुवा सातारकर आदि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यशवंतरावांच्याबद्दल ते हयात असताना आणि दिवंगत झाल्यावर जे गौरवोद्‍गार काढले ते संकलित करून येथे वाचकांसाठी थोडक्यात दिले आहेत. यशवंतरावांची थोरवी वाचल्यावर वाचकांच्या तोंडून उद्‍गार बाहेर पडतील, ''असे होते यशवंतराव'' !

''विशाल द्विभाषिकाच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी यशवंतरावांनी स्वीकारली त्यावेळी ते सत्तारूढ सरकारचे नेते आणि मी सरकार विरोधी आंदोलनाचा नेता असे संबंध होते. देव, हिरे, गाडगीळ यांनी आपल्याला विश्वासात न घेताच दिल्लीला विशाल द्विभाषिकाचा पर्याय ठेवला हे यशवंतरावांना रुचले नव्हते. समितीचा सरचिटणीस या नात्याने विरोधी पक्षनेत्यांबरोबर मलाही यशवंतरावांकडे जायला लागे. सर्व समस्यांची उकल शांततेने, सामंजस्याने व्हावी अशी आम्हा दोघांचीही भूमिका असल्याने, यशवंतरावांची आणि माझी 'वेव्हलेंग्थ' चांगली जुळली होती. खाजगी जीवनातही अगदी घरोबा असल्यागत आम्ही एकमेकांचे क्षेमकुशल विचारीत असू. त्यामुळे यशवंतरावांच्या स्नेहाला एक आगळेपणाची व आपलेपणाची किनार लाभली होती. विरोधकांना विश्वासात घेऊन पावले टाकण्याची त्यांची नीती होती. त्यामुळे विराधकांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटायचा.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये मी आजारी असताना यशवंतराव मला भेटायला मुद्दाम आले होते. मी त्यांना विचारले, 'चरित्राचा पुढचा भाग कधी लिहिणार ?'  त्यावर यशवंतराव म्हणाले, ''वेणूबाईंच्या आग्रहास्तव आत्मचरित्र लिहावयास घेतले. त्यांच्याच आग्रहामुळे ते घडले. पण आता वेणूबाई नाहीत. त्यामुळे निकड वाटत नाही. लिहिण्याचा मानस आहे पण फुरसद मिळायला हवी.''  आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीबद्दल यशवंतरावांकडून मिळणार्‍या अधिकृत माहितीला महाराष्ट्र आणि देशही वंचित राहिला. दुर्दैव असे की वेणूताई गेल्या आणि यशवंतराव पण गेले.

- एस. एम. जोशी
                           

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org