यशवंतराव चव्हाण (11)

कराड शहरातील प्रमुख ठिकाणी तारीख २५ ला रात्री झेंडे लावायचे, कायदेभंगासंबंधीची पत्रके वाटायची असे यशवंतराव आणि त्यांच्या मित्रांनी ठरविले.  म्युनिसिपालिटीच्या कचेरीवर आणि हायस्कूलच्या प्रांगणातील झाडावरही झेंडा लावायचाही निर्णय घेण्यात आला.  रात्री कामाला सुरुवात करण्यात आली.  दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजला शाळेच्या आवारातील झाडावर झेंडा रोवून ध्वजवंदन करण्यात आले.  'वंदेमातरम' च्या घोषणा देण्यात आल्या.  राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला.  हे सारे शिक्षणाधिकार्‍याने पाहिले.  डोईफोडेला अटक करण्यात आली.  सकाळी अकराला यशवंतराव शाळेत गेल्यावर पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना वर्गातून बाहेर बोलावून अटक केली.  कराडच्या जेलमध्ये बंद करण्यात आले.  जेलमधील त्यांच्या कोठडीत शिक्षा झालेला एक कैदी होता.  सहा फूट उंची, गोरापान, तरतरीत नाक, डोळे लखलखणारे, दाढी वाढलेली. हातापायात बेड्या असणारा हा कैदी दुसरा-तिसरा कोणी नव्हता, तर तुरतीचा कृष्णा धनगर होता.

थोड्या दिवसांनी यशवंतरावांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले.  आरोप वाचून दाखविण्यात आले.  गुन्हा कबूल करण्यात आला.  अठरा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली.  शिक्षा झालेला पक्का कैदी म्हणून पुन्हा कराड जेलमध्ये नेण्यात आले.  दुसर्‍या दिवशी यशवंतरावांना भेटण्यासाठी मातोश्री विठाबाई, घरची मंडळी व शाळेतील शिक्षक तुरुंगात गेले.  फौजदाराचे उपस्थितीत भेट झाली.  मास्तर म्हणाले, ''यशवंता, फौजदारी दयाळू आहेत, माफी मागितलीस तर सोडून देतील.''  त्यावर विठाबाई म्हणाल्या, ''मास्तर, काय बोलताय !  माफीबिफी मागायची नाही.  यशवंता तब्येतीची काळजी घे, देव आपल्या पाठीशी आहे.''  समजासेवक बाबूराव गोखलेही जेलमध्ये होते.  एके दिवशी पोलिस पहार्‍यात यशवंतराव व बाबूराव गोखल्यांना रेल्वेने पुण्याला नेण्यात आले.  बाबुरावांना 'बी' क्लास असल्यामुळे येरवडा तुरुंगात ठेवले आणि यशवंतरावांना कॅम्प जेलमध्ये पाठविण्यात आले.  तारेचे वर्तुळाकार कुंपण घालून, त्यात तंबूच्या बराकी उभारून, हा कॅम्प जेल तयार करण्यात आला होता.  हजारावर राजबंदी कैदी राहतील एवढा मोठा होता.  यशवंतरावांनी फेब्रुवारी १९३२ मध्ये या जेलमध्ये प्रवेश केला.  सव्वा वर्षांनी मे १९३३ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.  नंबर बारा या बराकीत निवडक शंभर राजबंदी होते.  हायस्कूल विद्यार्थी असल्याने यशवंतरावांचा या बराकीत नंबर लागला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org