यशवंतराव चव्हाण (106)

:   १४   :

यशवंतराव ही निव्वळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता. तो जसा विचार होता तसाच तो एक आचार होता. किंबहुना ती एक आचारसंहिता होती. कर्तव्यदक्ष प्रशासक, चतुर आणि मुत्सद्दी राजकारणी, साहित्यप्रेमी, थोर ज्ञानपिपासू, रसिक नेता, कनवाळू माणूस अशा कितीतरी विविध पैलूंनी त्यांचे दर्शन महाराष्ट्राला आणि देशाला घडले आहे. शुद्ध देशभक्ती आणि विशुद्ध चरित्र आणि चारित्र्य हे यशवंतरावांचे वैशिष्ट्य. त्यांच्यावर वृत्तपत्रांतून, भाषणातून टीका झाली. तथापि हा माणूस भ्रष्ट आहे, चारित्र्यहीन आहे असे म्हणण्यास किंवा लिहिण्यास कोणीही धजले नाही. यशवंतराव पन्नास-पंचावन्न वर्षे सक्रीय राजकारणात होते. तीस वर्षांहून अधिक काळ सत्तेत उच्चस्थानी होते. त्यांच्या सरकारी आज्ञेने हजारो कोटी रुपयांच्या उलाढाली झाल्या. श्रीमंत, कारखानदार, व्यापारी त्यांच्या जवळ घुटमळले. तथापि साहेबांनी कुठल्या एका व्यवहारात व्यक्तिगत लाभ उठविला असे कोणीही म्हणू शकला नाही. देशातील कोणत्याही मोठ्या शहरात त्यांचा बंगला नाही की चाळी नाहीत. कराडमध्ये त्यांनी ''विरंगुळा'' या नांवाचे छोटे निवासस्थान तेवढे बांधले. शासकीय मोटारीखेरीज कुठलीही अलिशान गाडी घेतली नाही. साहेब गाडीत शेजारी असले तरच सौ. वेणूताई सरकारी लाल दिव्याच्या गाडीत बसायच्या. एवढे पथ्य पाळणार्‍या वेणूताईंसाठी यशवंतरावांनी एक देशी बनावटीची मोटार घेऊन दिली होती. ती त्यांनी वीस वर्षे वापरली. नंतर ती जुनी गाडी १९८५ मध्ये कराडात वेणूताई स्मारकात आणून ठेवण्यात आली. सौ. वेणूताई १९४४ पासून आजारी. तब्येत तोळामासा. अपत्य नाही. तरीही यशवंतरावांनी द्वितीय विवाहाचा विचार कधीही मनात आणला नाही. अखेरपर्यंत दोघेही एकमेकांसाठी जगले. चरित्र आणि चारित्र्य निर्लेप ठेवले. कनक-कांता यांचा मोह टाळून, त्यांना अस्पर्श मानून यशवंतरावांनी सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणार्‍या नेत्यांसमोर, कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श उभा केला. यशवंतरावांचे बोलणे, वागणे सारेच आगळे-वेगळे वाटायचे. राग नाही, लोभ नाही, द्वेष-मत्सर नाही. सर्वांवर प्रेम करावे, सांभाळून घ्यावे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य.

पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांच्या घोळक्यात बसून चकाट्या पिटण्यात किंवा गॉसिपिंग करण्यात त्यांनी कधीही वेळ घालविला नाही. इतरांनाही उत्तेजन दिले नाही. यशवंतराव पार्लमेंट सभागृहात वेळेवर यायचे, जरूर तेवढे बोलायचे. गृहात काम नसेल तेव्हा ते संसद भवनातील आपल्या कचेरीत बसून कामकाज करायचे. फावल्या वेळेचा उपयोग फायली पाहण्यासाठी करायचे. भेटीला येणार्‍यांनाही ते कचेरीत भेट द्यायचे, त्यांचे प्रश्न-अडचणी ऐकून घ्यायचे. आपल्या खात्याच्या राज्यमंत्र्यांशी चर्चा करून, त्यांना जरूर त्या सूचना देऊन गृहातील कामकाजाविषयी तत्पर, वाकबगार तयार करायचे. राज्यमंत्री विद्याचरण शुक्ला नेहमी म्हणायचे की, शिक्षक वा गुरु असावा तर चव्हाणांसारखा. के. सी. पंत, प्रकाशचंद्र सेठी यांच्यासारखे तरुण राज्यमंत्री सांगायचे की वरिष्ठ मंत्री असावा तर यशवंतरावांसारखा. विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना त्यांनी गृहातील सर्व बाजूंच्या खासदारांचे प्रेम संपादन केले. भाषणात ते कधी कुणाचा अनादर करायचे नाहीत की रागावून बोलायचे नाहीत. ''गृहावर प्रेम करायला शिका'' असे ते आपल्या ज्युनियर्सना नेहमी सांगायचे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org