शवंतराव चव्हाण (111)

ज्या राष्ट्राला वा शहरांना यशवंतरावांनी भेटी दिल्या तेथील इतिहास, भूगोल, ऐतिहासिक स्थळे, कलादालने, वस्तुसंग्रहालये, शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, वैज्ञानिक संस्था यांची माहिती आहे. तेथील कारखानदारी, विद्यापीठे, सांस्कृतिक जीवन, लोकजीवन, निसर्ग, डोंगर-किल्ले, प्रसार-माध्यमे असे जे जे पाहिले ते ते यशवंतरावांनी पत्रांतून शब्दबद्ध केले आहे. हा पत्रव्यवहार पति-पत्‍नीमधील असला तरी त्याचा संदर्भ व्यक्तीपुरता मर्यादित नाही. संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, विदेश मंत्री या नात्याने काम करीत असताना स्वतंत्र भारताच्या विशिष्ट काळात जी परिस्थिती होती तिचे, त्याचबरोबर विकसनशील देशांच्या भूमिकांचे विश्लेषण या पत्रांत असल्याने ते सर्वांकरिता विचारधन बनले आहे. आशिया-आफ्रिकेतील विकसनशील देश आणि विकसित देश यांच्यातील कोणते प्रश्न सुटण्यासारखे आहेत, कोणते नाहीत याचे सखोल विवेचन यशवंतरावांच्या पत्रांतून आढळून येते. त्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींशी निव्वळ परिचय करून न घेता त्याचे रूपांतर मैत्रीत करण्याची यशवंतरावांची हातोटी विलक्षण म्हणावी लागेल. जागतिक बँकेचे अध्यक्ष मॅक्नमारा (अमेरिका) आणि पट्टीचे राजकारणी व मुत्सद्दी किसिंजर यांच्याशी मैत्रीसंबंध जोडणे ही सोपी गोष्ट नव्हती. यशवंतरावांनी ती साध्य केली. आठव्या हेन्रीच्या राजवाड्याचे वर्णन आणि इंडोनेशियाच्या बाली बेटाचे वर्णन करताना रसिक, साहित्यिक, तसेच हिंदू संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगणारे यशवंतराव दिसून येतात.

हेन्रीच्या राजवाड्यासंबंधी यशवंतरावांनी एका पत्रात लिहिले आहे, ''पंधराव्या शतकातील आठवे हेन्री म्हणजे एक विलक्षण प्रकरण होते. त्यांनी अनेक लग्ने केली, अनेकांच्या इस्टेटी हडपल्या. हेन्री फार लहरी होते. त्यांच्या मर्जीतून एखादी व्यक्ती उतरली की त्याचे घरदार, जमीन जुमला हेन्री स्वतःकडे घ्यायचे. राजवाड्यात प्रचंड मोठी अशी लागोपाठ तीन प्रांगणे, एक कलापूर्ण दिवाणखाना, जुन्या शस्त्रांनी सजविलेल्या राजवाड्याच्या भिंती, रेखीव सुंदर बाग, सारे काही अजुनही नीटनेटके ठेवण्यात आले आहे.

काबूल शहराबद्दल यशवंतरावांनी लिहिले आहे, ''दहा लाख वस्तीचे हे शहर विस्तृत क्षेत्रफळात पसरलेले आहे. नवे विभाग आधुनिक आणि जुने काबूल तसेच जुने आहे. इंटर काँटिनेन्टलच्या खैबर सूटमधून काबूल शहराकडे दृष्टी टाकली तेव्हां एक विलक्षण, शांत, सुंदर, मनोहारी दृष्य दिसले. भारतीय शास्त्रीय संगीत काबूलमध्ये फार लोकप्रिय आहे. 'बामीयान'ला गेलो तर तेथे भगवान बुद्धाचे पंधराशे-सोळाशे वर्षापूर्वीचे दोन भव्य पुतळे पाहावयास मिळाले. डोंगरकपारीत असंख्य लेणी पाहिली. बुद्ध धर्माचा प्रसार येथपर्यंत झाला होता हे स्पष्टपणे दिसून आले. बामियानच्या खोर्‍यात करुणामूर्ती भगवान बुद्धही आहेत आणि चेंगीजखानाचे क्रौर्यही शेजारीच उभे आहे. इतिहासात क्रौर्य आणि करुणा यांची स्पर्धा सुरू आहे.

बाली बेटाबद्दल यशवंतरावांनी लिहिले आहे, ''ज्या बेटासंबंधी वर्षानुवर्षे ऐकले होते ते बाली बेट आज पाहिले. बेटावरील हिंदू संस्कृतीही पाहिली. महाभारतकालीन हिंदूंचा पेहराव करून दोन तरुणांनी हातात छत्र-चामरे घेऊन राजस्वागत केले. कपाळावर कुंकू लावलेल्या, गौरवर्णीय कांती असलेल्या, हातात पुष्पमाला घेतलेल्या दोन प्रौढ कुमारी सामोर्‍या आल्या. क्षणभर वाटले की आपण महाभारताच्या काळातच आहोत. येथील नागरिक शेकडो वर्षे हिंदू संस्कृतीचे जतन करीत असल्याने हा हिंदूंचा मुलूख वाटतो. बेट फारच सुंदर आहे. केरळ-कोकणसारखी गर्द झाडी, जमीन उत्तम, शेती उत्तम, लोक उद्योगी, कलेचे चाहते. म्हणूनच येथे नृत्य, कला, चित्रकला बहरलेली आढळते.''  कॅलिफोर्नियातील निसर्गसौंदर्याबद्दलही यशवंतरावांनी आपल्या एका पत्रात बहारदार वर्णन केलेले आहे. ही पत्रे वाचताना त्यांच्या रसिकतेचे, साहित्यिक भाषाशैलीचे दर्शन घडते.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org