यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९८

शब्दसामर्थ्यावर व सौंदर्यावर विश्वास आणि भाषेचे प्रेम

ललितलेखनासाठी आवश्यक असणा-या पर्यावरणापेक्षा सपशेल वेगळ्या पर्यावरणात हयातभर वावरत असूनही यशवंतराव आपल्यातला ललितलेखक विनासायात जिवंत ठेवू शकले, याचे मुख्य कारण त्यांना शब्दांचे सामर्थ्य व महत्त्व पटलेले होते, भाषेवर त्यांचे अतोनात प्रेम होते आणि भाषेचे त्यांना जागते भान होते.  शब्दाच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर असलेला आपला विश्वास यशवंतरावांनी अनेकदा व्यक्त केला आहे.  'दोन ध्रुव' या खांडेकरांच्या शब्दांचे उदाहरण देऊन त्यांचा सामाजिक आशय आणि त्यातून सूचित होणारी नवी जाणीव ते उकलून दाखवतात.  आणि म्हणतात,

''मी शब्दांना फार मानतो.  त्यांच्यात अस्त्रांचे सामर्थ्य आहे, तसेच प्रकाशाचे तेज आहे.  एखादा शब्द कोणी अशा वेळी उच्चारतो, की त्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येते'' ('ॠणानुबंध', २४८).

'गांधींच्या छोडो भारत' शब्दांचे उदाहरणही त्यांनी या संदर्भात दिले आहे.  त्यांच्या मते,

''नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य जसे शब्द करतात, तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे.  कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे'' (कित्ता, ७).

शब्द हेच ज्यांचे प्रमुख माध्यम व शस्त्र आहे, असे साहित्यिक आणि राजकारणी हे त्यांना शब्दबंधू वाटतात.

''मराठी भाषेला इतिहासाने वस्त्र दिले, तर भूगोलाने ते शिवून मराठी भाषेच्या अंगावर घातले व तिच्या रूपात भर घातली ('ॠणानुबंध', १९८).  मराठी भाषेची वाटचाल अशी सूचित करणा-या यशवंतरावांना उत्तर व दक्षिणेकडील विचारप्रवाहांनी आणि पश्चिम किना-यावरच्या सागरी वाहतुकीच्या वर्दळीने मराठी भाषेवर केलेल्या विविध संस्कारांचे महत्त्व जाणवले आहे.  परिणामी मराठीला जे सर्वांगीण सर्वसंग्राहक स्वरूप प्राप्त झाले, त्याचा यशवंतरावांना रास्त अभिमान वाटत होता, साधुसंतांच्या हातून उपदेशाचे आर्जव, युद्धातील सैनिकांच्या तोंडून शत्रूला ललकारणारे आव्हान, एकीकडे कल्पनातीत कोमलता आणि दुस-या बाजूने वज्राची कठोरता, यादव कुळात व मराठा युगात वीररसप्रधान, पेशवाईत लावणीचा शृंगार, तर आता अवघे लोकजीवन व्यापणारी सर्वंकष अशी परिस्थितीसापेक्षता ही मराठी भाषेची वैशिष्टये त्यांनी अचूक टिपली आहेत.

यशवंतराव महाराष्ट्र राज्याचे स्वप्न जेव्हा मनाशी रेखाटीत, तेव्हा मराठी जनता नव्हे, तर मराठी भाषाच त्यांना सिंहासनारूढ झालेली दिसायची.  मराठी ही राजभाषा व्हावी.  लोकजीवन समृद्ध करण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरावी. तिच्या माध्यमातून सर्व अभ्यासक्षेत्रांतील विचारसंपदा अभिव्यक्त व्हावी आणि त्यायोगे तिची विचारवहनाची क्षमता वृद्धिंगत व्हावी, असा ध्यास त्यांना लागून होता.  ज्ञानविज्ञानाचे मूलभूत संशोधन मराठीतून व्हावे आणि एकूणच सर्व संशोधन समाजाभिमुख व्हावे, असा त्यांचा आग्रह होता.  साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करण्यामागे मराठी भाषेतून अभिजात ग्रंथांची उपलब्धी व्हावी, हाच त्यांचा मूळ हेतू होता, भाषाभिवृद्धीला ते सांस्कृतिक विकासाचे एक गमक मानीत.  रवींद्रनाथांनी शिवचरित्र बंगाली भाषेत नेल्याबद्दल भारावून बोलणारे यशवंतराव रवींद्रांचे जीवनकाव्य मराठीत यथोचित प्रमाणात न आल्याबद्दल व्यथित काढीत असत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org