यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९७

जीवनभाष्य

समर्पित जीवन हा यशवंतरावांचा आदर्श होता.  कारण-

''जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते जीर्ण होत नाही.  चंद्र कधी जुना होत नाही, सूर्याला म्हातारपण येत नाही, दर्या कधी संकोचत नाही.  यांतील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे.  पण अनंतयुगे लोटली, तरी विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही.  काळाने त्यांना घेरलेले नाही.  त्यांचा कधी कायापालट नाही.  स्थित्यंतर नाही.  ते निष्वसन अखंड आहे.'' ('ॠणानुबंध', १२२).

''हे जग कलात्मक आनंदाकरताच निर्माण करण्यात आलेली शक्ती आहे.  या कलेत स्फूर्ती आहे, माणुसकी आहे.  केवळ वैज्ञानिक हिशोब म्हणजे जग नव्हे.  कला आणि पावित्र्य यांचा हा सुरेख संगम आहे.'' (कित्ता, १२३).  अशी कलासक्त धारणा मनात बाळगून जगणारे यशवंतराव सतत मीपण विसरून स्वर्गीय आनंद देणा-या प्रसंगांच्या अखंड शोधात असायचे.  असा क्षण मिळणे हाच त्यांना विरंगुळा वाटायचा.  असे क्षण जेवढे जास्त मिळतील, तेवढे जीवन सुखी अशी त्यांची धारणा होती.  सुखाच्या या क्षणांचे वर्णन ते करतात :

''जीवनात सुखाचे क्षण येतात, ते सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे सोनेरी व सतेज असतात.  ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात.  परंतु ज्या वेळी हे किरण कोवळे दिसतात, त्या वेळी त्यांचे ते तेज, ते रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते.  नदीच्या खोल डोहात दगड टाकला, की पाण्यावर तरंग उठतात, एकातून एक अशी वर्तुळे उठतात आणि पाहणा-याला मोठी मजा वाटते.  जंगलातल्या वाटेने जात असताना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला, की त्याचे पाणी पिताना केवढा आनंद होतो.... ओढ्याच्या काठी भरगच्च जांभळांनी भरलेल्या झाडाची चार जांभळे तोंडात टाकली की, ती किती गोड लागतात... जीवनामधील आनंदाचे क्षण हे असे असतात.'' ('सह्याद्रीचे वारे', ३१४).

यशवंतरावांचे हे जीवनभाष्य म्हणजे नितांत रमणीय काव्य आहे.  आपल्या स्मरणसारणीत अशा सुखाच्या क्षणांची इतकी भरगच्च बांधी यशवंतरावांनी करून ठेवली होती, की राजकीय धकाधक असो, की राजकीय विजनवास, कपटकारस्थानांनी वेढले असो, की आव्हानांनी त्रस्त केलेले असो, यशवंतरावांचे मानसिक संतुलन कधीच डळमळले नाही, कारण त्यांचा हा आंतरिक आनंदाचा झरा कधीच आटणारा नव्हता, कुणाला तो हिरावून घेणेही सर्वथैव अशक्य होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org