यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९३

''मला आपल्या या सगळ्या प्रेमाला पोचविण्याचे श्रेय माझ्या अशिक्षित आईला आहे.  आज दुनियेमध्ये काय चालले आहे, ह्याचे तिला फारसे ज्ञान नाही.  मी तिचा धोकटा मुलगा मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री म्हणजे काय, हे आजही तिला माहीत नाही.... तिची पुण्याई, तिचा साधेपणा, तिचे प्रेम, तिने शिकविलेले लहानपणचे चारदोन छोटे छोटे गुण हेच मला माझ्या जीवनामध्ये उपयोगी पडले आहेत.'' (सह्याद्रीचे वारे, १९७).

आजूबाजूच्या ग्रामीण गरीब शेतकरी कुटुंबासारखेच यशवंतरावांचेही कुटुंब होते.  घरची शेती असली, तरी अर्धपोटी राहण्याइतपतच होती.  वेगळेपण जर काही असेलच, तर ते संस्कारांमध्ये होते आणि ते संस्कार करण्यात आईचा वाटा सर्वाधिक मोठा होता.

''संपत्तीने नसली, तरी संस्काराने आई श्रीमंत होती आणि ती श्रीमंती आम्हां मुलांपर्यंत पोचवण्याचा तिचा सतत प्रयत्न होता.'' (ॠणानुबंध, ३८) हे यशवंतराव आवर्जून सांगतात.

तिच्या जात्यावरच्या ओव्यांमधून त्यांना पृथ्वीमोलाचा संदेश मिळाला होता.  तुरुंगात यशवंतरावांना भेटायला आलेल्या त्या माउलीने सोबतच्या गुरुजींनी केलेली माफी मागण्याची सूचना साफ उडवून लावून यशवंतरावांवर स्वाभिमानाचा व ध्येयनिष्ठेचा खोल संस्कार केला होता.  १९६५ च्या युद्धाच्या धुमश्चक्रीत आईचे निधन झाले.  तिच्या अस्थी गंगेत टाकताना 'भूतकाळाचा एकमेव धागा झटकन् तुटला', असे यशवंतरावांना वाटले.  

माता आणि माती यांच्याविषयी अपार ओढ असलेल्या या राजकारणी कलावंताला जनतेच्या ठायीही जणू मातेचेच दर्शन होत असे.  संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी मराठी जनतेच्या त्यांच्यावर कमालीचा रोष ओढवला होता, पण संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याच जनतेने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षावही तितक्याच उत्कटतेने केला.  या रागालोभाचा पोत मातृवत्सल यशवंतरावांना थेट आईच्या रागालोभाशी मिळताजुळता वाटला.  ते म्हणतात,

''मुलाला मारण्याचा अधिकार सख्ख्या आईलाच असला पाहिजे.  ...कारण कधी मारलाच पाठीवर एखादा धपाटा, तर दुस-याच क्षणी ज्याला लागले, त्याच्यापेखा जिने मारले, तिच्याच डोळ्यातून पाणी येते आणि ती आपल्या मुलाला पोटाशी धरते.  हा आईचा धर्म आहे.  तीच गोष्ट जनतेची आहे.'' ('सह्याद्रीचे वारे', ३२).

मराठवाड्यात प्रवास करताना कुणी जख्ख म्हातारा एकेक रुपयांच्या दहापाच नोटांचा हार आपल्या थरथरत्या हातात घेऊन चव्हाणांच्या मोटारीला सामोरा आला.  म्हणाला,

''तुझ्यासारख्या पुत्र व्हावा अशी इच्छा होती, तुला खाऊला हे पैसे आणले आहेत.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org