यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९

देशात वेगाने घडामोडी घडत होत्या.  क्रांतिकारकांच्या चळवळी उग्र होऊ लागल्या होत्या.  सरकारी दमनसत्रही तीव्र होऊ लागले होते.  अनेक क्रांतिकारकांना तुरुंगांत डांबून सरकार त्यांचे अनन्वित छळ करीत होते.  यशवंतराव या काळात मनाने अस्वस्थ होते.  

संवेदनक्षम मन आणि मनमिळाऊ स्वभाव या दोन गोष्टींचा चव्हाणांच्या नेतृत्वाच्या उभारणीत फार मोठा वाटा आहे.  त्यांचा मूळ पिंड आंदोलनात उडी टाकून पुरुषार्थ करण्याचा कधीच नव्हता, किंबहुना तो काहीसा अंतर्मुख, चिंतनशील व एकांतप्रिय असाच होता.  सार्वजनिक जीवनात पाय ठेवतानाची त्यांची प्रेरणा भावनावेगापेक्षा बौद्धिक जाणिवेचीच होती.  भोवतालच्या परिस्थितीचे यथार्थ भान आणि ती बदलायलाच पाहिजे, ही जिद्दही त्यामागे होती.  ही परिस्थिती केवळ बहुजन-समाजापुरती आणि तीसुद्धा फक्त मराठी प्रदेशापुरती मर्यादित चळवळ करून बदलता येणे त्यांना दूरापास्त वाटल्यामुळेच अधिक व्यापक चळवळींचा मागोवा त्यांचे मन घेत होते.  मात्र क्रांतिकारकांच्या मार्गांशी एकरूप होण्यालाही त्यांचा स्वभाव अनुकूल नव्हता.  त्यामुळे या काळात त्यांची काहीशी कोंडी झाली होती.

ती कोंडी फुटण्यास एक घटना कारणीभूत झाली.  ती घटना म्हणजे यतींद्रनाथ दास यांनी तुरुंगात सुरू केलेले आमरण उपोषण.  १९२० च्या असहकाराच्या चळवळीत यतींद्रनाथांनी भाग घेतल्यामुळे सरकारचा त्यांच्यावर रोष होता.  पाच वर्षांत चार वेळा त्यांना तुरुंगात डांबले होते.  अतोनात छळामुळे बेभान होऊन जेल सुपरिंटेंडेंटवर त्यांनी हात उगारल्याबद्दल त्यांना अंधारकोठडीची कडक शिक्षा दिली गेली होती.  राजकीय कैद्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जाते, याचा संताप येऊन यतींद्रनाथ आमरण उपोषणास बसले होते.  त्यांच्या दिवसेंदिवस खालावणा-या प्रकृतीमुळे सबंध देशभर अस्वस्थता पसरली होती.  अखेर एक दिवस यतींद्रनाथ लाहोरच्या तुरुंगात मरण पावल्याची बातमी आली.  ती ऐकून यशवंतराव बेचैन झाले.  'आपल्या भावविश्वात क्रांती करणारी एक घटना' असे या घटनेचे वर्णन करू यशवंतराव लिहितात :

''या घटनेमुळे माझ्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल झाला.  देशात घडणा-या घटनांचे अर्थ समजावून घेण्याच्या मनःस्थितीपर्यंत मी पोहोचलो.  जातीय विचारांच्या संकुचित कोंडवाड्यातून बाहेर पडण्याचा माझा विचार पक्का झाला.  आपण आपले जीवन देशकार्यालाच वाहायचे, हा निर्णय माझ्या मनाने घेतला.'' (कित्ता, ४४)

राष्ट्रव्यापी प्रश्नांसाठी खटपट करणा-या चळवळीचा एक सामान्य सैनिक होण्याचे यशवंतरावांनी ठरवले आणि या आपल्या निर्धाराशी ते तहहयात प्रामाणिक राहिले.  त्यावेळी त्यांनी आपल्या निष्ठार्पणासाठी जी भारतीय राष्ट्रसभेची (इंडियन नॅशनल काँग्रेस) निवड केली, ती त्यांनी आयुष्यभर निभावली.  हातचे काहीही न राखता ते त्या संस्थेला समर्पित झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org