यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८९

मंतरलेल्या भावभारलेपणातूनच हे संपूर्ण शब्दांकन झालेले असल्यामुळे ते मग केवळ एक यथातथ्य प्रवासचित्रण उरत नाही किंवा रूक्ष तपशीलाच्या शुष्क बारकाव्यांचे तटस्थ संकलनही ठरत नाही, तर लेखकाकडून वाचकाकडे एक जिवंत भावावस्थाच जणू संक्रमित होत राहते.  लढाईत ज्यांनी प्राण वेचले, त्यांचे वोल्गाच्या काठावर जे स्मारक आहे, त्याचेही असेच हृद्य वर्णन यशवंतरावांनी केले आहे.  सैनिकांच्या नावाने सामान्यतः दगडी खांब उभारण्याची सार्वत्रिक प्रथा पाहून अस्वस्थ झालेल्या यशवंतरावांना वोल्गातीरावरचे योद्धयांचे स्मारक फारच लोभस वाटले होते.

स्मारकाच्या रूपाने जणू एक निरंतर लढाईच ई. बुचेत्ख या कलावंताने 'ममई हिल्स'वर निर्माण केलेली आहे.  रणधुमाळी त्या वेळी झाली, तशीच्या तशी त्यांनी उभी केली आहे.  टेकड्या चढू लागताच प्रेक्षक रणधुमाळीच्या धुमश्चक्रीत शिरकाव करतो.  पुढचे वर्णन करताना यशवंतराव लिहितात,

''चिलखत घातलेले, संगिनी रोखलेले, रणगाडे पळवणारे, तोफा डागणारे, बॉम्ब फेकणारे, सरपटत जाऊन गोळ्या चालवणारे, एक ना दोन हजारो हात तिथे सज्ज दिसतात.  हजारो कलेवरे तिथे जमीनदोस्त होऊन पडली आहेत.  मूर्तिमंत भीती आणि भयानकता यांचेच हे चित्रण आहे.  पण एका महान कलावंताच्या कलावैभवाचे ते एक कोरीव लेणे बनले आहे.'' (कित्ता, १२५).

कलावंताला अशी उत्कट दाद हाडाचा कलावंतच देऊ शकतो.  यशवंतराव तिथे या कलावंताला भेटले.  तो केवळ कुंचला चालवणारा कलावंत नाही, तर स्वतः तो एक कुशल सैनिक आहे.  ज्या पोलादी हातांनी त्यांनी शत्रुसैनिक यमसदनी पाठवले, त्याच हातांनी 'करणी' करून तोच आज समरप्रसंगाचा इतिहास चितारीत आहे, हे यशवंतरावांना विशेष लक्षणीय वाटते.  सैनिकी वेषातल्या आपल्या तरण्याबांड लेकराचे कलेवर मांडीवर घेऊन बसलेल्या एका अधोवदना स्त्रीचे एक चित्र या अपंग चित्रकाराने काढले आहे.  यशवंतरावांनी त्या चित्राचे अत्यंत मार्मिक विश्लेषण केले आहे.

यशवंतराव परत जायला निघाले, तेव्हा त्या शूर कलावंताने त्यांच्या हातात वोल्गागार्डची आठवण म्हणून रक्तमांसात भिजलेली मूठभर माती ठेवली होती.  यशवंतरावांनी लिहिले आहे,

''शांततेच्या चित्तेतील ते भस्म, त्या कलावंताची ती देणगी मी स्वीकारली आहे.  हिमालयात भडकलेल्या चितेतील भस्म माझ्या संग्रही आहे, त्याच्याशी ही देणगी मिळतीजुळती आहे.  गिरीजा-शंकराला रोज ताज्या चिताभस्माची पूजा आवडते....वोल्गाची ती माती ते शांतिभस्म मी जपून ठेवले आहे.'' (कित्ता, १२७).

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org